खराब रस्त्यामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू

प्रगतशील समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना घडली आहे. खराब रस्त्यामुळे गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.

Update: 2022-04-12 12:30 GMT

 बाळंतपणासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना खराब रस्त्यामुळे एका महिलेला जीव गमवावा लागला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही महिला बाळंतपणासाठी आपल्या माहेरी आली होती. आज त्यांना यवतमाळ जिल्यातील ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला आहे. नताशा अविनाश ढोके (वय 30) असे मृत महिलेचे नाव आहे.

गर्भवती महिलेला प्रसूती वेदना होत असल्याने नातेवाईक खासगी वाहनाने प्राथमिक आरोग्य केंद्रात येण्यासाठी निघालेत होते. मात्र, रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय असल्याने रुग्णालयात पोहोचण्यास विलंब झाला. खराब रस्त्यामुळे दवाखान्यात पोहोचू न शकलेल्या महिलेचा वेदना होऊन गाडीतच मृत्यू झाला. या घटनेला सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनास जबाबदार असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

काही दिवसांपूर्वीच ढाणकी-बिटरगाव या रस्त्याच्या मागणीसाठी बंदीभागातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. आंदोलन करून काही दिवस होतात न होतात तोपर्यंत ही घटना घडली आहे.

यापूर्वीही या रस्त्याने तीन ते चार जणांचे बळी घेतले आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांना जाग आली नाही. प्रशासन आणखी किती गर्भवती महिलांच्या मृत्यूची वाट बघणार, असा संतप्त प्रश्‍नही आता उपस्थित केला जात आहे. बंदीभागात आरोग्यसेवा आधीच कमकुवत आहेत. त्यांना ढाणकी किंवा तालुक्याच्या ठिकाणी रात्री-अपरात्री धाव घ्यावी लागते. मात्र, खराब रस्त्यांमुळे आपला रुग्ण वेळेत दवाखान्यात पोहोचेल, याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही. त्यामुळे वेळेत उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्णांनी याच रस्त्यावर आपले प्राण सोडले तर, काही गरोदर मातांनी रस्त्यातच बाळांना जन्म दिला.

विकासाच्या गप्पा हाकल्या जात असताना बंदीभागातील नागरिकांना अजूनही रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. वारंवार आंदोलन, निवेदने देऊनही रस्त्याचा प्रश्‍न निकाली निघत नाही, यासाठी जबाबदार कोण, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

Tags:    

Similar News