विद्याताई आणि ‘साथसाथ’ विवाह मंडळ

Update: 2020-01-31 15:13 GMT

नव्वदच्या दशकात आपल्या देशातल्या राजकीय,आर्थिक बदलानंतर अनेक सांस्कृतिक बदल वेगानं होऊ लागले. त्या बरोबर तरुण मंडळींच्या जीवनमानात,शिक्षण-व्यवसाय-नातेसंबंध यांत खूप बदल घडायला लागले. विद्याताईंच्या सामाजिक कामा दरम्यान जे तरुण संपर्कात येत होते. ते आणि त्यांच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहणारे इतरही तरुण लोक यांना विवाहविषयक नवे प्रश्न पडू लागले. ते विद्याताईं पर्यंत पोहोचत होते.

त्या तरुणांच्या विद्याताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर अनौपचारिक चर्चा घडू लागल्या. गटाला साथसाथ विवाह अभ्यासमंडळ असं नाव दिलं गेलं. त्यात नियमितता आली. या चर्चांचं आणि मार्गदर्शनाचं महत्व लक्षात आलं तेव्हा विद्याताईंना आणि इतरांनाही त्या उपक्रमाला औपचारिक ट्रस्टचं स्वरुप द्याव असं वाटलं. म्हणून साथसाथ ट्रस्टची स्थापना झाली.

चांगले कार्यकर्ते मिळवणं आणि त्यांच्याशी संवाद साधून कामाला प्रवृत्त करणं हा विद्याताईंचा हातखंडा. त्यामुळे साथसाथचं काम जोमात सुरू झालं.

विवाहेच्छूंची एकमेकांशी ओळख होणं, स्वतःच्या विवाहाचा डोळसपणे विचार करणं, तज्ञांचं विवाहविषयक मार्दगर्शन मिळणं अशा पातळ्यांवर काम सुरू झालं. मग विद्याताई नियमित कामात प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या. पण कार्यकर्त्यांना सतत त्यांचा आधार लागायचा. आणि त्याही सल्ला-मार्गदर्नासाठी उपलब्ध असायच्या.

कुठलीही नवी कल्पना त्यांना सुचली, कुणी साथसाथला उपयुक्त ठरेल असे व्याख्याते, ट्रेनर आढळले तर तशी माहिती सातत्यानं देत असत. अधून मधून जेंडर, आंतरजातीय विवाह, विवाहाचं आजचं स्वरूप अशा विषयांवर मार्गदर्शन करायलाही त्या येत असत. साथसाथचे विवाहेच्छू सदस्य स्वतंत्रपणेही गप्पांसाठी,मार्गदर्शनासाठी त्यांना भेटत असत.

साथसाथला पक्की जागा नव्हती. परिचयातल्या अनेक लोकांनी आपल्या जागा वापरायला दिल्या. पण त्या वरचेवर बदलायला लागल्या. तेव्हा विद्याताईंच्या शब्दाखातर मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजने एक वर्ग गुरुवार, रविवार असा वापरायला दिला. त्यामुळे कार्यक्रम योजायची चांगली सोय झाली. काही कार्यक्रमांना, ट्रस्टच्या मीटिंगनाही कधी बोलावलं तर त्या आवर्जून येत असत.

काही नवे उपक्रम घ्यायचे ठरले तर त्यांची चर्चाही विद्याताईंशी होत असे. कुणा व्यक्तीला, संस्थेला काही कामासाठी अप्रोच व्हायला लागलं की, ही संस्था विद्या बाळांनी सुरू केलीय असं कार्यकर्त्यांनी सांगितलं की समोरच्यांची नजर आदर युक्त होत असे. विद्याताईंच्या विपुल जनसंपर्काचा, आदरणीय व्यक्तिमत्वाचा असा प्रभाव दिसत असे. त्याचा फायदा साथसाथला नक्की झाला.

काही अडचणी आल्या तर त्या सोडविण्यासाठीही विद्याताई मदतीला तत्परतेनं येत. कुटुंबातल्या वडीलधाऱ्याचा जसा आधार वाटतो तसा आधार साथसाथ कार्यकर्त्यांना विद्याताईंचा होता. त्या आता नसल्या तरी त्यांनी पेरून ठेवलेले काळाबरोबर बदलणारे विचार आणि न बदलणारी मूलभूत मूल्यं मात्र साथसाथ बरोबर राहतील. विवाह व्यवस्था अधिक समतावादी, मानवतावादी होण्यासाठीचं कार्य अजूनही करत रहायला हवंय. ते करत राहणं ही विद्याताईंना आदरांजली.

-सुषमा दातार

Similar News