आठवणींचा रंकाळा... 2021 via 2005

सध्या कोसळणाऱ्या पावसाने अनेकांची धडकी भरली आहे. मात्र, कोसळणारा पाऊस बदललाय की आपण? एखाद्या निसर्गरम्य ठिकाणाचा मुमुराद आनंद घेताना, कधी ट्रेकींग ला जाताना आपल्या मनाला हा प्रश्न कधी पडला आहे का? कोल्हापूरच्या रंकाळ्याचा अविस्मरणीय क्षणाची आठवण सांगताना निसर्ग जपण्याची जबाबादारी सांगणारा दिपाली पाटील यांचा अनुभव नक्की वाचा...

Update: 2021-07-24 19:56 GMT

तो 26 जुलै 2005 चा दिवस होता.....

शिये येथील वर्गमित्र संदीपच्या घरी आम्हाला आखाड पार्टीसाठी जेवायला बोलावलं होतं. हा जेवणाचा कार्यक्रम आमच्या संपूर्ण ग्रुपसाठी 8 दिवसापूर्वीच ठरला होता. 26 जुलै च्या दिवशी मी आणि माझी मैत्रीण आरती, कविताला स्वयंपाकात मदत म्हणून सकाळी 9 लाच घरातून बाहेर पडणार होतो. मागच्या दोन दिवसांपासून कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता. तरीही आम्ही शियाला जाण्यासाठी निघालो होतो. बाहेर प्रचंड पाऊस कोसळतोय, त्यामुळे जाऊ नका असं आईने सांगितलं. बस मधूनच जाणार आहोत आणि कोल्हापूर ते शिये अंतर काही फार नाही अशी त्यांची समजूत घालून आम्ही गेलो.

संदीप आणि कविताने जेवणाचा उत्तम बेत केला होता. दहा-बारा जणांच्या ग्रुपने त्या आषाढी पावसाच्या जोरदार सरीमध्ये जेवणाचा पुरेपूर आस्वाद घेतला. जेवन आणि गप्पांमध्ये आम्ही रंगून गेलो होतो आणि बाहेरचा पाऊस कोल्हापूरला अक्षरश: झोडपत होता. शेवटी जेवण झाल्यानंतर पुलावर पाणी यायला लागले आहे. अशी बातमी घेऊन कोणीतरी घरी आलं.

तेव्हा मात्र आम्ही ताबडतोब निघालो. शिये ते भवानी मंडप अशी बस होती. बसच्या खिडक्यांमधून पावसाचे टपोरे थेंब आत येत होते, आम्ही दोघीही नखशिखांत भिजलो होतो. बसमध्येच कोणीतरी रंकाळा भरून व्हायला लागलाय असं सांगितलं. मंडपामध्ये आम्ही उतरलो. मी आरतीला म्हटलं, आपण रंकाळा बघायला जाऊया....

आरतीने खूप समजावलं.. आता आपण घरी जाणं गरजेचं आहे, घरातले सगळे वाट बघत असतील. किमान एक फोन तरी करून कल्पना देऊया.

पण मला तो ओसंडून वाहणारा रंकाळा खुणावत होता. घरी फोन करून सांगितलं, तर काळजीने पोखरलेल्या आईच्या मनानं पहिला घरी येण्याची गळ घातली असती आणि मग ती ओलांडून पुढे जाताच आलं नसतं. म्हणून आरतीचा विरोध न जुमानता मी तिला रंकाळयाकडे घेऊन गेले. भवानी मंडप ते रंकाळा आम्ही चालत गेलो. पाउस तुफान कोसळत होता. रंकाळ्याचे विलोभनीय दृश्य बघण्यासाठी बरेच लोक निघाले होते.

दुधडी भरून वाहणाऱ्या रंकाळ्याचे हे वेगळे रूप पाहून मात्र, मी अवाक झाले. पुढचा कितीतरी वेळ फक्त शांतपणे, एकाग्रचित्ताने रंकाळ्याचे ते वेगळेच, आतापर्यंत कधीही न पाहिलेले विलोभनीय दृश्य पाहत होते. पंधरा दिवसातून एकदा आमची रंकाळ्यावरची फेरी ठरलेली असायची. पण असा रंकाळा पूर्वी कधीच पाहिला नव्हता. मंत्रमुग्ध करून टाकणारा सोहळा होता तो निसर्गाचा...

धो - धो कोसळणारा पाऊस, निसर्गाबरोबरच प्रत्येक वास्तूचे पालटलेलं रूप बघायला मला मनापासून आवडतं. तो सगळा नयनरम्य सोहळा डोळ्यात आजही साठलेला आहे.

काल 16 वर्षानंतर पुन्हा एकदा रंकाळा असाच दुधडी भरून वाहू लागला. कोल्हापुरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं रंकाळ्याशी एक वेगळं, जिव्हाळ्याच नातं आहे.

कोल्हापूरची व्यक्ती जगात कुठेही असली तरी रंकाळ्याचे कालचे व्हिडिओ, फोटो पाहून निश्चितच नॉस्टॅल्जिक झालेली असेल.

माझंही अगदी तसंच झालं. कोल्हापुरातील वेगवेगळ्या ग्रुप वरून येणारे फोटो, व्हिडिओ बघून सोळा वर्षांपूर्वीचा पावसाच्या धारांमुळे भरून वाहणारा रंकाळा नजरेसमोर दिसत होता. सध्या कोल्हापूर बाहेर असल्यामुळे कालचा नजारा प्रत्यक्ष पाहता आला नाही. ते दृश्य मिस केलच. निसर्गाचा हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवणं आणि फोटोत पाहणं यामध्ये जमीन-अस्मानाचे अंतर आहेच.

पण 16 वर्षांपूर्वीचा भरुन वाहणारा रंकाळा, फक्त "तो मला प्रचंड आवडतो" याच नजरेने बघितला होता, कालचा रंकाळा पाहताना मात्र मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. निसर्ग कोपतो आहे की आपण त्याला कोपायला भाग पाडतो आहे?

पावसावर कितीही प्रेम असलं तरी, त्यानं कुणाचं नुकसान करू नये, कुणाला हानी पोहोचवू नये एवढं मात्र, आवर्जून वाटतं. यंदाच्या पावसाळ्यात कोल्हापुरात आत्तापर्यंत फक्त सरासरीच्या पंचवीस ते तीस टक्के पाऊस झालाय. रंकाळया प्रमाणे पंचगंगेने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आहे. 2019 प्रमाणे पुन्हा नॅशनल हायवे बंद करावा लागला आहे.

कुठं तरी आपण या गोष्टींचे चिंतन करणे गरजेचे आहे. वाढणारे प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास, नद्या, तलावात साठणारा कचरा, गाळ, सिमेंटची जंगले हे सर्वच घटक धावणारी शहर अचानक बंद करायला कारणीभूत ठरत आहेत.

पाऊस तोच आहे, वर्षानुवर्षे तो पडतो आहे. पण त्याला मुरु देण्यासाठी, पसरू देण्यासाठी आपण जागा शिल्लक ठेवलेली नाही. मग तो वाट मिळेल तसा आपली जागा शोधतो आहे.

थोडसं थांबूया...विचार करूया...

आपली जबाबदारी ओळखून या नैसर्गिक घटकांना कुठेही हात न लावता आपल्या विकासासाठी नवीन मार्ग शोधूया....

दिपाली पाटील

Tags:    

Similar News