दिखावू डबलस्टॅन्डर्ड, आणि टॉर्चर

Update: 2020-12-25 08:30 GMT

करोना काळामध्ये भेदाभेदाची अनेक रुपं दिसून आली. अगदी छोट्यामोठ्या गोष्टीमध्येही केवळ स्त्री आहे , मुलगी आहे म्हणून तिला बाजूला काढण्याचे प्रकारही घडले. अनेकदा घरात वाद नको म्हणून महिला, मुली बोलत नाहीत. त्यांना चालतंय हे असा समज होतो व हा त्रास होत राहतो. मुलग्यांच्या, नवऱ्याच्या आधी जेऊ नये, सामाजिक वैयक्तिक पातळ्यांवरचे निर्णय स्वतः घेऊ नयेत, कुटुंबातल्या इतर बाबींमध्ये मतप्रदर्शन करू नये असे असा आग्रह अनेक कुटुंबामधून दिसून येतो.

लस घेण्याची इच्छा आहे, पण घरातले घेऊ देत नाहीत. नवऱ्याने लस घेतली, भावानेही घेतली पण तु कशाला घेतेस, असं सांगण्यात आलं. सुरवातीला वाटलं की काळजी पोटी सांगतात, नंतर कळलं की तुला काही झालं तर घरातलं काम कोण करणार..क़ॉलेजमध्ये सगळ्या अॅक्टीव्हीटीमध्ये टॉपला असलेली ही मैत्रीण सांगत होती.

करोना मधून ती बरी झालीय, एकादशीला अंड खाल्लं तर घऱातल्यांनी पुन्हा करोना होईल पाप लागेल म्हणून बवाल केलाय. ती सांगत होती चहामध्ये साखर घालताना, खोबरं किसताना एखादा चमचा खावासा वाटतो. आईकडची आठवण येते या छोटयाशा कृतीने

रांधते हीच, तरी चोरून खाते म्हणून किती कल्ला केला..

महिन्याला लाखभर रुपये कमावणारी व सढळ हाताने घरासाठी खर्च करणाऱ्या तिला जेवताना घरातले टोकत राहतात, खाखा अजून वजन वाढेल, आधीच दिव्य त्यात वजनाची भर... उत्सुकतेने तिच्या ह्यांचा फोटो पाहिला तर साहेब तब्येतीतले.. हे असले टॉर्चर कसे सुचतात ! #डबलस्टॅन्डर्ड

तुम्हीही असे अनुभव ऐकले आहेत, हा अनुभव तुम्हालाही आलाय..?

- शर्मिला कलगुटकर

(लेखिका महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात पत्रकार आहेत)

Tags:    

Similar News