सुट्टीत मुलांना फोनपासून दूर ठेवण्यासाठी ५ मजेदार खेळ
स्क्रीनपासून दूर राहून मजा करा, कल्पकता वाढावा आणि आठवणी बनवा.
आजच्या डिजिटल युगात मुलं सुट्टी लागली की सर्वात आधी फोन हातात घेतात. ऑनलाइन गेम्स, व्हिडीओ, रील्स यांच्यात वेळ कसा जातो ते कळतच नाही. त्यामुळे पालकांची चिंता वाढते. मुलांनी प्रत्यक्ष खेळावं, क्रिएटिव्ह व्हावं असं त्यांना वाटत.. पण हे होणार तरी कसं? यासाठीच सुट्टीत मुलांना फोनपासून दूर ठेवण्यासाठी काही आकर्षक, मन गुंतवून टाकणारे आणि घरच्या घरी सहज खेळता येणारे खेळ आहोत. हे खेळ मुलांच्या कल्पनाशक्तीला, विचारशक्तीला आणि टीमवर्कला चालना देतील.
१) ‘खजिना शोधा’ - रोमांचक ट्रेझर
मुलांना कुतूहल निर्माण करणारे खेळ खेळण्याची फारच आवड असते आणि ‘खजिना शोधा’ हा खेळ त्यासाठी अगदी परफेक्ट. घरातील वेगवेगळ्या ठिकाणी क्ल्यू लपवून ठेवायचे – उशाखाली, फ्रीजजवळ, पुस्तकांच्या रॅकमध्ये किंवा टेबलखाली. प्रत्येक क्ल्यू पुढच्या क्ल्यूकडे नेतो आणि शेवटी एक छोटं गिफ्ट, चॉकलेट किंवा स्टिकर्सचा खजिना मुलांची वाट बघत असतो.
या खेळाचं खास वैशिष्ट्य म्हणजे मुलं विचार करतात, धावतात, शोधतात आणि प्रत्येक क्ल्यू सापडताच त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसतो. हा खेळ केवळ मनोरंजनासाठी नसून मुलांमध्ये समस्या सोडवण्याची क्षमता आणि टीमवर्कचे गुण वाढवतो.
२) ‘पेपर गेम चॅलेंज’ – फक्त कागदातून अमर्याद मजा
हा खेळ अत्यंत सोपा, स्वस्त आणि मुलांना तासन्तास व्यस्त ठेवणारा आहे. त्यांना वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगांचे कागद द्या आणि छोट्या चॅलेंजेस द्या.
- सर्वात लांब कागदाची साखळी तयार करा
- वेगवेगळ्या आकारांचे विमान बनवा आणि कोणते जास्त लांब उडते ते बघा
- कागदाचा बॉल बनवून बास्केटमध्ये टाकायची स्पर्धा
- ओरिगामी: बोट, मांजर, फुलं, टोपी
कागद हातात आला की मुलं स्वतःच नवीन कल्पना आणतात. हा खेळ पूर्णपणे सुरक्षित आणि अगदी छोट्या मुलांसाठीही सोपा आहे.
३) ‘किचन मिनी शेफ’ – मुलांसाठी छोट्या, नॉन-फायर रेसिपीज
सुट्टीत मुलांना स्वयंपाकाची ओळख करून द्यायला हा खेळ एकदम मजेशीर. त्यांना छोट्या, नॉन-फायर रेसिपीज बनवायला द्या – फ्रूट सॅलड, बिस्किट सँडविच, कॉर्न भेल, चॉकलेट डिप, व्हेज रोल्स किंवा डेकोरेटेड कपकेक्स.
मुलांना स्वतः काहीतरी तयार करताना मिळणारा आनंद वेगळाच असतो. त्यातून त्यांचं आत्मविश्वास वाढतो आणि कौशल्य देखील. शिवाय आई-बाबांबरोबर स्वयंपाक करणं हा एक सुंदर कौटुंबिक अनुभव ठरतो.
४) ‘स्टोरी मेकर गेम’ – कल्पनांना नवे पंख
कथाकथन हा सगळ्यात सुंदर बौद्धिक खेळ. मुलांना एक सुरुवात द्या आणि कथा त्यांनी वाढवायची. तुम्ही प्रत्येकजण एक वाक्य बोलू शकता किंवा चित्र कार्ड्स देऊन त्यावर कथा तयार करायला सांगू शकता.
ही क्रिया मुलांची भाषा, विचार, भावना व्यक्त करण्याची क्षमता आणि कल्पनाशक्ती अप्रतिम वाढवते. अनेकदा मुलं स्वतःच छोट्या गोष्टी लिहायला सुरू करतात आणि फोन बाजूला जातो.
५) ‘नेचर हंट’ – बाहेरच्या जगाशी मैत्री
सुट्टीत मुलांना निसर्गाशी जोडणारा हा एक अद्भुत, खेळता-खेळता शिकवणारा उपक्रम. पार्क, बाग, अंगण किंवा परिसरात फिरताना त्यांना शोधायच्या गोष्टींची यादी द्या. वेगवेगळी पाने, दगड, फुले, इ.
यामुळे मुलांची निरीक्षणशक्ती वाढते आणि निसर्गाशी नाळ जोडली जाते. बाहेरची धावपळ, हवा आणि माती यामुळे त्यांना स्क्रीन जवळ जाण्याची इच्छा कमी होते.
मुलांना फोनपासून दूर ठेवणे हे कठीण काम नाही. फक्त त्यांना अधिक आकर्षक आणि सहभागी करून घेणारे पर्याय देणे गरजेचे आहे. कागदाचे खेळ, शब्दांची मजा किंवा घरातील छोट्या स्पोर्ट्स स्पर्धा हे सोपे खेळ मुलांच्या कल्पनाशक्तीला, ऊर्जा वापराला आणि कौटुंबिक नात्यांना नवी उभारी देतात. सुट्टी म्हणजे केवळ आराम नाही तर ती शिकण्याची, खेळण्याची आणि आठवणी बनवण्याची एक संधी आहे. स्वतःच्या कल्पनांच्या, शोधांच्या आणि आनंदाच्या जगात हरवून जाणे मुलांसाठी खऱ्या अर्थाने खास बनते.