टाळ-मृदंगाच्या गजरातून गवसलेली 'माणूसकीची वारी'
अशोक देशमाने यांच्या कार्यावरील वारकरी संस्कारांचा प्रभाव
X
महाराष्ट्राची ओळख संतांची भूमी म्हणून आहे. या भूमीने जगाला 'परोपकार' आणि 'मानवता' हे दोन मोठे विचार दिले. पण हे विचार केवळ पोथी-पुराणापुरते मर्यादित न ठेवता, ते प्रत्यक्ष जगण्यात उतरवणारी माणसं विरळाच असतात. अशोक देशमाने हे त्यांपैकीच एक नाव. आज जेव्हा आपण त्यांच्या 'स्नेहवन' या संस्थेच्या कार्याकडे पाहतो, तेव्हा आपल्याला केवळ एक आयटी इंजिनिअर दिसत नाही, तर त्यामागे शेकडो वर्षांची वारकरी परंपरा आणि त्या परंपरेने दिलेले संस्कार दिसतात. अशोकजींचा हा प्रवास भक्तीकडून शक्तीकडे आणि स्वार्थाकडून परमार्थाकडे जाणारा आहे.
अशोक देशमाने यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील एका छोट्या गावात, एका वारकरी कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या घरात विठ्ठलाची भक्ती रक्तामासात होती. आई-वडील दोघेही दरवर्षी न चुकता पंढरीची वारी करायचे. घरात गरिबी होती, पण विठ्ठलाच्या नामाचा आणि संतांच्या अभंगांचा मोठा आधार होता. अशोक यांनी बालपणापासूनच पाहिलं होतं की, घरात पसाभर धान्य असलं तरी कुणी गरजू दारी आला तर आई त्याला रिकाम्या हाताने जाऊ देत नसे. "दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याचं मन व्याकुळ होतं, तोच खरा माणूस" ही शिकवण त्यांना कोणत्याही विद्यापीठात नाही, तर त्यांच्या घरातल्या भजनांतून मिळाली.
वडील भजनात तल्लीन होऊन जेव्हा "तुका म्हणे होय मनाचा पालट" असं म्हणायचे, तेव्हा त्या शब्दांचे अर्थ अशोक यांच्या बालमनावर कोरल जायचे. पुढे जेव्हा ते पुण्यात मोठ्या पगाराची नोकरी करू लागले, तेव्हा भौतिक सुख तर मिळालं पण वारकरी संस्कारांची 'शिदोरी' त्यांना स्वस्थ बसू देईना. वारीमध्ये जसा एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याचा हात पकडून त्याला विठ्ठलाच्या दर्शनापर्यंत पोहोचवतो, तसाच आपणही समाजातील अनाथ आणि उपेक्षित मुलांचा हात पकडून त्यांना यशाच्या शिखरापर्यंत का नेऊ नये? हा प्रश्न त्यांच्या मनात वारंवार येत होता.
अशोकजींनी जेव्हा 'स्नेहवन'ची स्थापना केली, तेव्हा त्यांनी तिथे केवळ आधुनिक शिक्षणच आणलं नाही, तर वारकरी संस्कारांची शिस्तही लावली. स्नेहवनमध्ये राहणाऱ्या प्रत्येक मुलाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक सात्विक दिनचर्या पाळावी लागते. तिथे केवळ पुस्तकी ज्ञान दिलं जात नाही, तर दररोज सकाळी सामूहिक प्रार्थना आणि संध्याकाळी हरिपठण होतं. अशोकजींच्या मते, "संस्कारांशिवाय दिलेलं शिक्षण हे केवळ पोट भरण्याचं साधन बनतं, पण संस्कारांसह दिलेलं शिक्षण हे जग बदलण्याचं शस्त्र बनतं." ज्या मुलांनी आपल्या बापाला आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटनेत गमावलं आहे, त्यांच्या मनावर झालेले आघात पुसण्यासाठी भक्ती आणि नामस्मरण हे औषधासारखं काम करतं.
वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा विचार म्हणजे 'समता'. वारीत राजा आणि रंक एकाच रांगेत उभे असतात. हाच समतेचा विचार स्नेहवनमध्ये पाहायला मिळतो. तिथे कोण कुठल्या जातीचा आहे किंवा कोण कुठल्या जिल्ह्यातून आलाय याला महत्त्व नसतं. सर्व मुले एकत्र बसून भोजन करतात, एकत्र प्रार्थना करतात आणि एकत्र राहतात. अशोकजींनी या मुलांना हे शिकवलं की, आपण सर्वजण एकाच विठ्ठलाची लेकुरं आहोत. ही जाणीव मुलांमधील न्यूनगंड दूर करण्यास मदत करते.
अशोकजींच्या जीवनावर संतांच्या विचारांचा इतका पगडा आहे की, त्यांनी आपल्या कार्याला कधीही 'व्यावसायिक' स्वरूप दिलं नाही. वारकरी जसा विठ्ठलाकडे काहीही मागायला जात नाही, तर केवळ प्रेमापोटी वारी करतो, तसंच अशोकजींनी हे कार्य केवळ प्रेमापोटी सुरू केलं. त्यांनी आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला मुरड घातली. परदेशात जाण्याची संधी त्यांनी का नाकारली? कारण त्यांना वाटलं की, जर मी तिथं गेलो तर माझ्या संतांनी मला दिलेला 'सेवेचा' संदेश अपूर्ण राहील.
आज स्नेहवनमध्ये जी मुलं शिकत आहेत, त्यांच्यात अशोकजींना आपला विठ्ठल दिसतो. "जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले" या ओळींचा खरा अर्थ जर कोणाला समजून घ्यायचा असेल, तर त्यांनी एकदा स्नेहवनला नक्की भेट द्यावी. वारकरी परंपरेतून आलेली ही सेवेची प्रेरणा आज शेकडो मुलांच्या आयुष्यातील अंधार दूर करत आहे. अशोक देशमाने यांनी ही सिद्ध केलं आहे की, जर तुमच्या पाठीशी भक्कम संस्कारांची शिदोरी असेल, तर तुम्ही जगातील कोणत्याही संकटावर मात करून एक नवा इतिहास घडवू शकता. ही वारी आता थांबणारी नाही, तर ती पिढ्यानपिढ्या माणुसकीचा हा संदेश पोहोचवत राहणार आहे.






