Home > रिपोर्ट > "भाइयों और बहनो.." बोलून काहीच फरक पडणार नाही- रुपाली चाकणकर

"भाइयों और बहनो.." बोलून काहीच फरक पडणार नाही- रुपाली चाकणकर

भाइयों और बहनो.. बोलून काहीच फरक पडणार नाही- रुपाली चाकणकर
X

देशात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. बहुतांशी राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं असून संचारबंदी करण्यात आलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देशाच्या जनतेला संबोधित करणार आहेत. या निमित्ताने कोरोनावर मात करण्यासाठी "भाइयों और बहनो.." बोलून काहीच फरक पडणार नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

आपल्या रोखठोक वक्तव्य आणि ट्वीट्समुळे रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) नेहमीच चर्चेत असतात. यावेळी त्यांनी थेट पंतप्रधानांवर निशाणा साधलाय. नुकत्याच पार पडलेल्या जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. नागरिकांनी घरातून टाळ्या, घंटानाद आणि थाळीनाद करून आपल्यासाठी खंबीरपणे काम करणाऱ्या डॉक्टर, पोलिस आणि सफाई कर्मचाऱ्यांचे आभार मानले तर काही भागात जनता कर्फ्यूच्या नावावर जल्लोष साजरा करत मुळ संकल्पनेलाच छेद देण्यात आला.

"माननीय पंतप्रधान महोदय आज आपण आठ वाजता पुन्हा देशाला संबोधित करणार... पण काळजी वाटते की आपण गंभीरता न दाखवता..एक एव्हेंट म्हणून काहीही करायला लावताल...याचा परिणाम कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे हे कदाचित आपल्या लक्षात येत नाही." असं ट्वीट केलं आहे.

आता कोरोनावर मात करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी काही ठोस पाऊलं उचलावी या उद्देशाने "भाइयों और बहनो.." बोलून काही फरक पडणार नाही,अन् देश बदल रहा है.. असं तर अजिबात बोलू नका..६० वर्षात काय झालं अन काही नाही याचं दळण दळत नका बसू... असं रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्वीटर हॅंडलवर म्हटलं आहे.

सोबतच रुपाली चाकणकर यांनी “कोरोनाच्या आलेल्या संकटावर काय उपाययोजना करणार आहात? आरोग्यसेवा किती सक्षम करणार आहात? राज्यांना आर्थिक मदत करणार आहात का? असे सवाल उपस्थित केले आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी “यावर बोलावं अशी अपेक्षा करते.. आणि जनता खुप खंबीरपणे कोरोनाशी दोन हात करत आहे. आपण मात्र भावनिक होऊन अश्रू गाळून वैगेरे जनतेला फसवू नका.. प्लीज. वरना जनता माफ नहीं करेगी..” असा जोरदार टोला लगावलाय.

Updated : 24 March 2020 1:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top