Home > Max Woman Blog > मित्रांनो, अरे प्रेमाचा अर्थ तरी समजून घ्या रे.

मित्रांनो, अरे प्रेमाचा अर्थ तरी समजून घ्या रे.

प्रेम कसं मिळवावं? तिने त्याला आणि त्याने तिला मिळवणंच म्हणजेच सर्व काही असतं का? आजच्या तरूणाईच्या मते प्रेम म्हणजे काय? एकतर्फी प्रेम हे खरंच ‘प्रेम’ असतं का? आजच्या तरुणाईला प्रेमाची परिभाषा समजावून देण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे ? जाणून घेण्यासाठी वाचा सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांचा महत्त्वपूर्ण लेख...

मित्रांनो, अरे प्रेमाचा अर्थ तरी समजून घ्या रे.
X

आज पुन्हा एका शाळकरी मुलीला जबरदस्ती जीवनातून उठवलं गेलंय. आयुष्यात काही तरी करुन दाखवण्याची जिद्द बाळगणाऱ्या एका सावित्रीच्या लेकीची ती जिद्द उध्वस्त केली गेलीय. उमलत्या कळीची स्वप्ने चुरगाळली गेलीत. क्षितिजा व्यवहारे या तेरा वर्षांच्या कबड्डीपटूची तिच्यावर प्रेम करतो (?) असं सांगणाऱ्या शुभम भागवत नावाच्या मुलाने अक्षरशः कोयत्याने मानेवर वार करुन हत्या केल्याची बातमी माध्यमांनी दिलीय. या घटनेची बातमी देताना माध्यमांनी "एकतर्फी प्रेमातून हत्या" असा विसंगत शब्द पुन्हा एकदा वापरलाय. आपल्याला हवी असणारी वस्तू जर आपल्याला मिळणारच नसेल तर मग ती वस्तू एखाद्या खेळण्यासारखी तोडून मोडून टाकण्याच्या पुरुषी लालसेबरोबर प्रेम हा शब्द कसा जोडता येईल? या घटनेत सामील शुभम आणि त्याच्या साथीदारांना प्रेम काय असतं हे तरी समजलय का?

स्त्री-पुरुष देहाचे चोवीस तास बाजारु प्रदर्शन मांडणाऱ्या विविध वाहिन्या सतत मानवी मनाला चेतवण्यात, उद्दिपीत करण्यात व्यग्र आहेत. लैंगिक संबंधांबद्दल अत्यंत अशास्त्रीय आणि बाजारु माहिती समाजमाध्यमांवर सतत प्रसारित होत असते. अशा बकाल सांस्कृतिक वातावरणात आजच्या तरुणाईची प्रेम आणि लैंगिक संबंधांबद्दलची धारणा बनत असते. अचानक असे काही धक्के बसल्यावर आपल्या पाल्यांविषयी दुसऱ्या टोकाची अतिरेकी सावधानता बाळगणारे अनेक पालक स्वतःला तरी या मोहमयी जगापासून दूर ठेऊ शकतात का? अशा बकाल सांस्कृतिक वातावरणात ही तरुणाई खऱ्या प्रेमाच्या, सकस आणि समंजस सहजीवनाच्या अनुभुतीपासून तर दूर आहेच पण ही संकल्पनाही त्यांना नीट समजणार नाही असच वातावरण आज आहे. "तु हां कर या ना कर, तु है मेरी किरण" अशी स्त्री शरीरावर मालकी हक्क दाखवणारी गाणी ज्या समाजात प्रसिध्दी पावतात, खुले आम वाजवली जातात त्या समाजात स्त्रीचं मन ओळखून ते मन जिंकण्यासाठी करावयाचं प्रियाराधन कसं रुजणार? ज्या शरीराच्या आकर्षणाने तुम्ही दुराग्रही, लालसी बनता त्याच शरीराच्या आत एक मन असत आणि शरीर राजी होण्याआधी ते मन राजी व्हाव लागतं ही भावना कशी रुजणार? आपल्यापैकी अनेकांच्या घरा-दारात, चित्रपट नाटकात, जाहिरातीत स्त्री देहाकडे केवळ उपभोगाची वस्तू, वंशसातत्य टिकविण्यासाठी मुलं जन्माला घालणार मशीन असा दृष्टीकोन आपल्या बोलण्या-वागण्यातून सतत रुजवला जात असताना स्त्री-पुरुष संबंधातली सकस सहजीवनाची संकल्पना या तरुणाईला समजावून सांगण्यासाठी आपल्याला खूप काम करावं लागणार आहे.

छोट्या कुटुंबातील एक किंवा जास्तीत जास्त दोन मुलग्यांचे ज्या पध्दतीने फालतू लाड केले जातात त्या कुटुंबात नकार पचविण्याची सवय या मुलग्यांना लावलीच जात नाहीये. वंशाच्या कुलदिपकांनी काही मागितलं की ऐपत नसताना ती वस्तु उपलब्ध करुन देण्यासाठी धडपडणाऱ्या आई-वडीलांना हे ही समजून सांगायची गरज आहे की आर्थिक ऐपत असली तरी मागितलेली प्रत्येक वस्तू मुलांना लगेच उपलब्ध करुन द्यायची नसते. हे मानसशास्त्र अनेक पालकांना शिकवाव लागेल.

स्त्री-पुरुष संबंधातला गोडवा अनुभवण्यासाठी दोन शरीराच्या मिलनाआधी दोन मनांचे मिलन ही पुर्वअट असते. आपल्या सुख दुःखात सहभागी होणारा जोडीदार, आपली वेदना आणि आपला आनंद आपल्या बरोबरीने ज्याच्या मनाला भिडतो असा जोडीदार मिळाला की दोघांच्या आयुष्याचे सोने होते. मनोमिलन झालेल्या दोन शरीरांच्या मिलनात दोन्ही बाजूंनी जी समर्पण भावना व्यक्त होत असते त्यातून मिळणाऱ्या सर्वोच्च सुखाला असं ओरबाडून कधीही मिळवता येत नसते हे आजच्या तरुणाईला खरोखर समजावून देण्याची गरज आहे. आज काही संस्था आणि कार्यकर्ते प्रेम, सहजीवन, स्त्री-पुरुषांच्या शरीरांची शास्त्रीय ओळख आणि लैंगिक संबंधांबद्दल तरुणाईशी संवाद साधणाऱ्या कार्यशाळांचे आयोजन करतात. यातून अनेकांच्या आयुष्याला विवेकी, आनंदी वळण लागतय, पण हे प्रयत्न अपुरे आहेत. संस्थांच्या, कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा आहेत. हे काम शाळा-महाविद्यालयांनाच मोठ्या प्रमाणावर करावे लागणार आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमात अधिकृतपणे अशा विषयांचा समावेश करावा लागणार आहे. असे विषय हाताळण्यासाठी शिक्षकांचा दृष्टिकोन विकसित करावा लागेल. आधी शिक्षकांचे प्रशिक्षण करावे लागणार आहे. हा विषय लांबणीवर न टाकता प्राधान्याने हाताळण्याची तातडी शिक्षण विभागाला पटवून द्यावी लागणार आहे.

समाजात कायद्याच्या यंत्रणेचा धाक उरलेला नाही. सेलिब्रिटींची सुरक्षा सांभाळण्यात आणि राजकीय नेत्यांचे कलगीतुरे नियंत्रणाबाहेर जाऊ न देण्यातच गुंतलेल्या पोलीसांना गुन्हे घडूच नयेत यासाठीची यंत्रणा व सामाजिक मानसिकता बनविण्यासाठी राबवायच्या उपक्रमांकरिता वेळ मिळणच शक्य नाही. गुन्हा घडतो त्या प्रत्येक ठिकाणी पोलीस उपस्थित राहू शकत नाहीत हे खरेच पण अशा प्रत्येक ठिकाणी पोलीस यंत्रणेचा धाक व दरारा नक्कीच उपस्थित असू शकतो. पण मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमविरसिंग आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात पोलीस यंत्रणा आणि गृहखात्याच्या अब्रुची जी लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत ती पहाता या यंत्रणेचा धाक आणि दरारा गुन्हेगारांवरती असण्याची शक्यताच उरलेली नाही. क्षितिजाचा बळी त्या यंत्रणेचे डोळे उघडवील अशी आशा करुया.

एका उमलत्या कळीला निर्घुणपणे खुडलं गेलय. या घटनेवर केवळ निषेध नोंदवून चालणार नाही. सोशल मिडीयावर अश्रु ढाळून उपयोग नाही. मन सुन्न करणाऱ्या अशा घटना पुन्हा ऐकाव्या लागू नयेत यासाठी, प्रत्येक कळीला उमलण्यासाठी सुरक्षितता आणि तसा अवकाश उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शक्यतेएवढं योगदान जरी दिलं तर ती क्षितिजाला खरी आदरांजली ठरेल.

- सुभाष वारे, सामाजिक कार्यकर्ते

Updated : 14 Oct 2021 7:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top