Home > Max Woman Blog > आठवणीतील व. पु. काळे

आठवणीतील व. पु. काळे

आठवणीतील व. पु. काळे
X

मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकारिता अभ्यासक्रम सुरू असतो. तिथे मी व्याख्यान देण्यासाठी जात असतो. तिथे पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर यांची ओळख झाली. इतकी वर्षे पोलीस खात्यात राहूनही त्यांनी आपलं वेगळेपण, नैसर्गिक व्यक्तिमत्त्व जपलंय, हे विशेष. त्यांच्या लेखनास मनःपूर्वक शुभेच्छा - देवेंद्र भुजबळ.

(खालील पोस्ट देवेंद्र भुजबळ यांच्या फेसबुक वॉलवरुन घेण्यात आली आहे)

पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर

धावपळीच्या पोलीस खात्यात काम करताना कधी खूप समर प्रसंगांना तोंड द्यावे लागते. तर कधी खूप सुखद अनुभव पण येतात. असाच माझा एक अविस्मरणीय अनुभव आहे तो म्हणजे प्रख्यात लोकप्रिय लेखक व पु काळे यांचा.

कोरोनामुळे देश भर लॉकडाऊन आहे. त्यामुळे मी सध्या कार्यरत असलेले जिल्हा जात पडताळणी कार्यालय बंद आहे. गेल्या ३३ वर्षात कधी मिळाला नाही, तसा निवांत वेळ मिळत आहे.

घरी बसल्या बसल्या अल्बम चाळता चाळता अविनाश व माझ्या लग्नाच्या अल्बममधील एका फोटो वर माझी नजर खिळली. मन भूतकाळात अगदी २४/२५ वर्षें मागे गेलं

हे ही वाचा...

माझी नेमणूक तेव्हा वांद्रे पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून होती. एकदा माझे तक्रारी लिहून घेणे चालू होते. अचानक माझे लक्ष ठाणे अंमलदार कक्षात प्रवेश केलेल्या व्यक्तिकडे गेले. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. माझे अत्यंत आवडते लेखक साक्षात व.पु काळे माझ्यासमोर उभे होते.

मी त्यांना बसायची विनंती केली. हातातले काम आटोपून भारावलेल्या स्थितीत त्यांना येण्याचे प्रयोजन विचारले. त्यांना भेटून खूप आनंद झाल्याचे सांगीतले. तक्रारीच्या संदर्भात त्त्यांची व माझी चांगलीच ओळख झाली.

माझे वरिष्ठ अधिकारी विजय पवार मला म्हणाले मॅडम मी ही व. पु. चा फॅन आहे. माझी देखील त्यांच्याशी ओळख करून द्या. मी व. पु. सरांना तसे सांगीतले. ते दुसऱ्या दिवशी परत पोलीस ठाण्यात आले. मला अजूनही स्पष्ट आठवते त्यांची आणि पवार साहेबांची भेट झाल्यावर पवार साहेब खूप भारावून गेले होते.

दरम्यान व. पु. सरांनी पोलिस ठाण्यात येवून मला दोन पुस्तके भेट दिली. त्यापैकी एक होते "आय डेअर' हे आदरणीय किरण बेदी मॅडमचे पुस्तक.

त्यावर व. पु. सरांनी "महाराष्ट्राच्या भावी किरण बेदीला"असा संदेश लिहून स्वाक्षरी करून भेट दिलेले पुस्तक. दुसरे "वाट पाहणारे दार" हे त्यांनी पत्नीवर लिहिलेलं पुस्तक आहे, ज्यावर व. पु. सरांनी "सुनिता कुलकर्णी ह्या मार्दवशील व्यक्तीला, नव्हे एक नवीन आप्त आयुष्य संपता संपता भेटली तिला" असा शेरा लिहून ते, अशी दोन पुस्तके भेट दिली. पैकी किरण बेदीचे पुस्तक मी लोणावळा येथे ट्रेनिंग स्कूलला घेवून गेले असता एका कलीगने नेले, ते अद्याप परत केले नाही.

दुसरे पुस्तक मात्र मी अजून जपून ठेवले आहे. मन भूतकाळातून वर्तमानात आले. पण मन मात्र खिन्न झाले. कारण ज्यांनी मला आप्ताचा दर्जा दिला त्यांच्या अंत दर्शनाला ड्युटीमुळे जाता आले नाही. ते शल्य कायमचे मनात आहे. पुढेही राहील. व. पु. सरांच्या विनम्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली.

सुनीता नाशिककर, पोलीस उपायुक्त,जिल्हा जात पडताळणी कार्यालय, मुंबई.

Updated : 6 May 2020 4:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top