Home > Max Woman Blog > माझे स्वयंपाक्याचे प्रयोग

माझे स्वयंपाक्याचे प्रयोग

माझे स्वयंपाक्याचे प्रयोग
X

करोना विषाणूने बाहेर ख्यालीपणा सुरूकेल्याने आमच्यासारख्या म्हणजे खरंतर महिनाभर घरात बसूनही रोजच्या जेवणाची भ्रांत करावी लागत नाहीअश्या – लोकांनी सरकारी लॉकडाउनची वाट न बघता लगेचच घरात राहणं आणि घरातून ऑफिसचं काम करणं सुरू ही केलं. मला घर बंद होऊन चारआठवड्यांहून अधिक काळ झाला आहे. घरी रहायच्या पहिल्याच दोन दिवसांत, सतत घरात राहून निर्माण होणाऱ्या करोना व्यतिरिक्त इतर प्रश्नांची जाणीव झाल्याने,आम्ही लगेच घरातल्याघरात आमच्या कामांचं वाटप केलं. ही जाणीव अर्थातच आमच्या हुशारी मुळे होती, अशी कितीही बढाई मारली तरी खरं कारण,आम्हाला स्वयंपाक रांधायची पूर्व तयारी करणाऱ्या, घराची आणि भांड्यांची स्वच्छता करणाऱ्या अशा दोन्ही मावशी सुट्टीवर गेल्याने जबरदस्तीने आलेलं हे शहाणपण होतं. या वाटपात, मी एक वेळचे जेवण रांधण्याची 'जबाबदारी' स्वीकारली. त्यातून सुरू झाले 'माझे स्वयंपाक्याचे प्रयोग'! या प्रयोगादरम्यान मी काही निरीक्षणे केली, काही स्वतःबद्दल, काही कुटुंबाबद्दल तर काही एकूण समाजाबद्दल नव्याने शिकलो, काही गोष्टी पुन्हा अधोरेखित झाल्या. या सगळ्या निरीक्षणांचा हा लेखाजोखा मांडतो आहे.

जेव्हा मी जबाबदारी घेतली म्हणतो त्याचा अर्थ केवळ तो पदार्थ घरातील स्त्रियांना मदत म्हणून रांधण्यापेक्षा मुळातून वेगळी कृती मी करू इच्छितो. जबाबदारी घेण्यात कधी काय करायचं याचं नियोजन, त्यासाठी गरजेचं साहित्यघरात आहेत का याची खातरजमा आणि नसल्या सत्याची खरेदी/पर्यायाची तजवीज,आवश्यक ती पूर्वतयारी करणे, प्रत्यक्ष घरातल्यांच्या भुकेचा अंदाज घेऊन योग्य त्याप्रमाणात रांधणे, जेवणानंतर उरलेल्या अन्नाची योग्य ती काळजी/विल्हेवाट/प्रक्रियाकरणे, ओट्याची व शिजवलेल्या भांड्यांची स्वच्छता हे सगळे घटक येतात. आणि हे एकदाच नाही तर दररोजच्या वारंवारितेने करणे हे सुद्धा यात अंतर्भूत आहे.

हे ही वाचा

लॉकडाऊन : मासे विक्रेत्या महिलांचा कठीण काळ

Lockdown : सोन्याचे उच्चांकी भाव, सोनं घेतंय कोण?

मी स्वतः लिंगभाव निरपेक्षतेचा समर्थक आहे. माझे कुटुंब बऱ्यापैकी मोकळ्याविचारांचेआहे. घरकामात पुरुषांनी सहभागी असावे हे काही माझ्या घरच्यांना नवे नाही. माझे वडील घरकामात मदत करताहेत, कित्येक कामांची जबाबदारी घेताहेत, हे मी लहानपणापासून पाहत आलो आहे. पण असे असूनही यात ही अपवाद होता स्वयंपाक घर. चहा करणे, कधीतरी एखाद्या पदार्थावर प्रयोग करणे, भेळ वगैरे सोप्यागोष्टी सगळ्यांसाठी करणे इत्यादी गोष्टी बाबा करायचे. ते इतर मार्गांनी घरकामात मदत करायचे पण आई नोकरी करणारी असून सुद्धातिनेच स्वयंपाकघरआणि नोकरी दोन्ही सांभाळले. अर्थात तत्कालीन पुरुषांशी तुलना करता ते बरेच पुढे होते म्हणावे लागेल. मी स्वतः घराबाहेर राहिलो असताना रोज जेवण करीत असे, पण तेव्हा पूर्व तयारी आणि नंतरची उस्तवार इतर मित्रांकडे असे. पुढे घरी राहू लागल्यावर आठवड्यातून एखादवेळी काहीतरी 'पेश्शल' बनवतआलोय. पण वर म्हटलं आहेत शी खाण्याची जबाबदारी घेऊन पदार्थ रांधण्याचे धाडस दाखवू शकलो नव्हतो. लॉकडाऊन एका अर्थाने हे करून बघायची संधी होती. ऑफिस/शाळा वगैरे चालू असताना रांधण्या इतकंच, वेळेत रांधणं महत्त्वाचं असतं. आता थोडं पुढे मागे चालणार होतं. शिवाय प्रवासातील वाचणारा वेळ हाताशी असल्याने मी हे करायचं ठरवलं. या प्रवासात कित्येक गोष्टी वाटल्या होत्या त्याहून सोप्या गेल्यातर का ही वाटल्या होत्या त्याहून जड

माझ्या कुटुंबात ५ व्यक्ती राहतात. माझे आई-वडील, मी, बायको आणि मुलगी. मला सर्वाधिक काळजी होती, योग्य प्रमाणात गोष्टी रांधण्याची. फार उरू ही नये आणि कमीही पडू नये इतक्या चमात्रेत अन्न रांधलं तर फार कोणाला शिळंही खावं लागणार नाही आणि सध्याच्या काळात प्रत्येक भाजी/ऐवज आवश्यक तितकाच वापरला जाईल असाही दृष्टिकोन त्यात होता. प्रत्यक्षात मात्र माझ्या अंदाजापेक्षा हे सोपं गेलं. भात वगैरे गोष्टींचा अंदाज लगेच आला. आणि भाज्यासुद्धा फार उरल्या किंवा कमी पडल्या असे कधी झाले नाही. अर्थात यात माझा पूर्वानुभव उपयोगी पडला असणार.

दुसरी एक गोष्ट मला जड जाईल वाटली होती ती म्हणजे पूर्वतयारी. वेळच्या वेळी गोष्टी चिरणे, वाटाणे, भिजवून ठेवणे, वाफवून/उकडून तयार ठेवणे, तळणे, आंबवणे या अशा गोष्टी करण्यासाठी सुरुवातीच्या आठवड्यात मला आठवण करून देणे बायकोला भाग पडले. पण या सगळ्या गोष्टींचा अंदाज आल्यावर दुसऱ्या आठवड्यापासून हे अंगवळणी पडू लागले. आता रोज रात्री झोपायच्या आधी आपोआप दुसऱ्या दिवशीच्या पदार्थाचा अंदाज घेऊन आवश्यक ती तयारी केली जाते.

एक गोष्ट अशी होती की मला त्याचा फार त्रास होणार नाही असा अंदाज होता – ती म्हणजे पुरुषांनी स्वयंपाकाची जबाबदारी घेणे. अपेक्षेप्रमाणे बायकोचा याला पाठिंबाच होता. आई-वडिलांना ही या कल्पनेत अजिबात चुकीचे वाटले नाही. अपेक्षेप्रमाणे यात शक्य तितके सहकार्य त्यांनी केले. मात्र यात काही बारीक गोष्टी मला जाणवल्या. एक म्हणजे हे काम माझे आहे आणि बायको किंवा आई गरज पडली तर मदत करू शकते ही भावना अजूनही पुरेशी भिनलेली नाही. अजूनही स्वयंपाक हे घरातील बाईचे काम असून मी जे करतो आहे ती 'मदत' आहे. असाच विचार प्रबळ दिसतो. पहिल्या काही दिवसातच मला जाणवलं की हे फक्त घरातील इतर सदस्यांचं होतं असं नाहीतर माझं स्वतःचंही होतआहे. उदाहरण द्यायचं, तर जेव्हा बायको रांधत असते तेव्हा मी मलाआवडणारी इतर कृती – जसे की वाचन/टीव्ही बघणे वगैरे करणे माझ्यासकट कुणालाही अयोग्य वाटत नाही (आणि ते नाही देखील). मात्र जेव्हा मी रांधतो तेव्हा मला आवश्यक ती मदत करायला तत्पर असणं हे जणू काम असल्यासारखं घरात वातावरण असायचं (आणि काही प्रमाणात माझी अपेक्षा सुद्धा). किंबहुना मी रांधत असताना, मी काय करतोय याची फिकीर न बाळगता, बायको ने टीव्ही बघत बसणं, किंवा झोप काढणं तितकंच 'सामान्य' आणि 'योग्य' सजमलं गेलं नाही. सुरुवातीला हे माझ्याकडूनही झालं पण स्वतःला याची जाणीव झाल्यावर आता या भावनेवर मी कंट्रोल करू शकलो आहे. घरातही इतरांना समजावून आता महिन्याभरात यात बरीच प्रगती आहे असे निश्चितपणे म्हणता येईल.

आणखी एक गंमत म्हणजे 'वूमन-स्प्लेनिंग'. मला माहीत आहे की खरा शब्द 'मॅनस्प्लेनिंग' असाआहे. केवळ आपण पुरुष आहोत त्यामुळे स्त्रियांचे प्रत्येक प्रश्न सोडवणे आणि त्यांना न मागता अनाहूतपणे सल्ले देणे जी जणू आपली जबाबदारीच आहे अशा स्वरूपाच्या वर्तनाला मॅनस्प्लेनिंग म्हणतात. मी स्वयंपाक घरात गेल्यावर सुरुवातीच्या काळात त्याच धाटणीचे 'वूमनस्प्लेनिंग' झाले. केवळ आपण स्त्री आहोत म्हणून कडधान्य भिजवण्यापासून ते कुकर घासण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत आपल्याला बोलणे अगत्याचेआहे – आपला सल्ला आवश्यक आहे असा समज बाळगला गेला. आणि हे फक्त घरातल्याच बायकांकडून नाही तर मैत्रिणी, नातेवाईक अशा गटांतील काही स्त्रियांनी तरी सल्ला देण्यासाठी व्हॉटसऍप मारा केला. घरातही प्रत्येक स्टेपला "आकाशवाणी" (आणि माझा वैताग) होतअसे. 'माझं मला करून पाहूद्या, अडलं तर सल्ला विचारेनच' इतकं थेट सांगूनही आजहीआगंतुक सल्ले येतचअसतात – प्रमाण कमी झालंय पण थांबलेलं नाही. माझा असा समज झाला आहे की बायकांना पदार्थ बिघडणे हे इतके इगोवर येणारे झाले आहे की स्वतःचाच काय दुसऱ्याचा पदार्थ ही त्या बिघडू देत नाहीत.

या सगळ्या उद्योगात लोकांच्या प्रतिक्रियांचं निरीक्षण करणं यात मात्र बेहद्द मजा आली. "अरे मगाशी फोन नाही उचलला कारण रांधत होतो" असं काही सांगताच "कारे? घरी आई/बायको ठीकआहेत ना? " असा प्रतिप्रश्न यायचा – अजूनही येतो. अर्थात हे अपेक्षित होते. अजूनही माझे आई – बाबा मी रांधत असताना फोनआला की "तो जरा कामात आहे, नंतर सांगतो त्याला फोन करायला" इतकंच मोघम सांगतात. "तो रांधतो आहे, किंवा तो भांडी घासतो आहे" हे त्यांना लोकांना अजूनही सहज सांगणं त्यांना पटकन जमत नाही. त्याउलट त्यांच्यासाठी "नंतर करते तुला फोन माझी फोडणी जळेल" हे कारण बायकांनी देणं मात्र अजूनही सामान्य आहे. "बाबा/मुलगा/नवरा भांडी घासतो आहे" या वाक्यावर लोकांना अजूनही हसू येते आहे. त्यावर व्हॉट्सऍपवर विनोदांचा पूर आला आहे. ही घरातील आवश्यक कामे पुरुषांनी करणं हा विनोदाचा भाग नाहीतर बेसिक आवश्यक कृत्य आहे हे लोकांना सुरुवातीला ओरडून सांगायचा मोह व्हायचा – काहींशी भांडलोही. पण आता मी लोकांना समजावणे हा नाद सोडून दिलाआहे.

ऑफिसमधल्या कामसूजीवांच्या प्रतिक्रिया तर भयंकर करमणूक करणाऱ्या होत्या. प्रवासाचा वेळ वाचतो आहे म्हणजे आपण जास्त ऑफिस चे काम करवून घेऊ शकतो, लोकं काय घरीच आहेत त्यामुळे कोणत्याही वेळी लोकांना कॉल करू शकतो, त्यांनी ऑफिसच्या वेळेच्या बाहेर ही काम करायची अपेक्षा करू शकतो असा सार्वत्रिक समज आहे. अशा परिस्थितीत जेव्हा मी उच्चपदस्थांच्या 'अवेळी' शेड्यूल केलेल्या मीटिंग्ज "माझा स्वयंपाक रांधायची वेळ असल्याने" नाकारू लागलो तेव्हा व्यक्तीसमोर नसताना ही मला ताणलेली भिवई दिसू लागली. असं म्हणतात, नेहरुंसारख्या एखाद्याशी देशव्यापी प्रश्नावर बोलत असताना, गांधीजी "बकरीचं दूध काढायची वेळ झाली" असं म्हणून अचानक उठून निघून जायचे. मला त्या कृतीचं महत्त्व कळायला लॉकडाउन उजाडावा लागला हे खरं. जेव्हा मी एखाद्या अर्जंट म्हणून केलेल्या कॉलमध्ये "कदाचित कुकरचा आवाज होईल, मी आताच भात शिजायला लावला आहे" असे बोलू लागलो तेव्हा समोरच्याला काय प्रतिक्रिया द्यावी हे कळेनासे होत असे. मुळात घरी बसलेले पुरुष हे ऑफिसच्या कामासाठी २४ तास उपलब्ध असतील हा समज खोडून काढण्यासाठी मला घरच्या पेक्षा कितीतरी अधिक ताण सहन करावा लागला.

सध्या माझा हा प्रयोग 'तात्पुरता' आहे याची बायको सकट सगळ्यांना खात्री आहे. किंबहुना मी लॉकडाउन नंतरही एका जेवणाची जबाबदारी घ्यायचं ठरवलं तर तो निर्णय प्रत्यक्षात आणताना मला याहून काही पटीत ताणाला सामोरे जावे लागणार आहे हे पुरेसे स्पष्टपणे मला दिसते आहे. एखादी लहानशी कृती अनेक गोष्टी घडवण्याची आणि बिघडवण्याची कुवत राखून असते याचा पुरेपूर प्रत्यय मला या दिवसांत आला. माझा 'स्वयंपाकी" होण्याचा प्रयोग मला खूप काही शिकवून गेला हे खरं...

ऋषिकेश दाभोळकर

Updated : 23 April 2020 2:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top