Home > Max Woman Blog > तुम्ही मुलांवर अपेक्षांचं ओझं थोपताय का?

तुम्ही मुलांवर अपेक्षांचं ओझं थोपताय का?

तुम्ही मुलांवर अपेक्षांचं ओझं थोपताय का?
X

मला 2 लहान मुले आहेत (1 अकरा वर्षांचा आणि 1 सहा वर्षांचा). दोघ एकमेकांशी छान खेळतात, सोबत सोबत राहतात, मधे मधे भांडतातही आणि लगेच भांडण विसरतातही. काल असच त्यांच एका गोष्टीवरून भांडण झाल, ते थोडा वेळ टिकलंही, आणि मग नंतर ते स्वत:च त्यांच भांडण विसरलेही. पण या दरम्यान त्यांना आम्ही समजवायचा थोडा अयशस्वी प्रयत्नही केला - थोडं प्रेमानी, थोडं रागवून, आणि थोडं धमकावूनही - पण शेवटी त्यांच भांडण मिटलं ते मात्र त्यांच्या स्वत: मुळेच.

नंतर आम्ही बोलत होतो तेव्हा जाणवलं की आपण लहान मुलांकडून खुप अपेक्षा करतो, नाही? त्यांनी चांगलंच असलं पाहिजे, त्यांनी त्यांच्या वस्तू भावंडां सोबत व इतर मुलांसोबत share केल्याच पाहिजेत, खेळताना किंवा एखाद्या स्पर्धेत जिंकलो नाही म्हणून त्यांनी नाराज न होता त्यांनी अधिक परिश्रम घेऊन तो खेळ किंवा ती स्पर्धा जिंकली पाहिजे, खुप अभ्यास केला पाहिजे, त्यांनी आज्ञाधारक असलं पाहिजे, शाळेत व शिकवणीतही नियमीतपणे जायला पाहिजे, त्यांनी नियमीतपणे व्यायामही केला पाहिजे, त्यांनी आपण बनवलेले सगळे पदार्थ आवडीने खाल्ले पाहिजे, इत्यादी इत्यादी. अर्थातच या सगळ्याच अपेक्षा सगळ्यांचीच मुल पूर्ण करू शकत नाही, आणि खरं तर यातील बऱ्याच अपेक्षा आपल्यापैकी बरीच मंडळी स्वत:ही पूर्ण करू शकत नाही.

पण मग अश्या अपेक्षा बाळगणं चुकीचं आहे का? आपण जसे आहोत त्यापेक्षा आपण स्वत: आणि आपल्या मुलांनी चांगलं बनण्याचा प्रयत्न करण ही चुकीची गोष्ट आहे का? नाही, नक्कीच नाही. पण मग चुकतं कुठे आणि काय? याच उत्तर मिळवणं तसं कठीण आहे. पण बहुतेक तरी चुकतं ते असलेल्या अपेक्षा अवास्तव असल्यामुळे, दुटप्पी वागल्यामुळे आणि नक्की कसं वागाव हे मुलांना न सांगता आल्यामुळे. म्हणजे, घरी आलेल्या पाहुण्या मुलाने एखादं खेळणं सोबत न्यायचा हट्ट केला तर मुलांना सांगायचे की आरडाओरडा न करता त्यांनी ते खेळणं त्या मुलाला दिलं पाहिजे. ठीक आहे, पण मग आपल्या एखाद्या मैत्रिणीने आपल्याला आवडणारी साडी मागीतली तर? कदाचित ती आपण देऊही, पण आनंदाने देऊ, वारंवार देऊ? आणि खरतर प्रत्येकाने मागीतलेली गोष्ट आपण दिलीच पाहिजे असंही तर नसतं, बऱ्याच ठिकाणी तर नाहीच म्हणायचं असत. पण आपणच जर नाही म्हणू शकत नसू तर मग मुलांना ते कोण सांगणार? कधी हो म्हणायचे आणि कधी नाही हे त्यांना कसं समजणार? का हे त्यांनाच आपल्यापेक्षा चांगलं समजत? माहीत नाही.

पण या संदर्भात उदय, माझा नवरा, म्हणतो ते आठवतंय – बरीचशी मुलं मोठी झाली म्हणजे समंजस होतातच अस नाही तर ते त्यांच्या खऱ्या भावना लपवायला शिकतात, त्यांना जे म्हणायचे आहे त्याऐवजी इतरांना काय ऐकायचे आहे ते बोलायला शिकतात, पण असं व्हायला नको, मुलं समंजस झालीच पाहिजेत पण खऱ्या अर्थाने. त्यांना कधी व कुठल्या गोष्टींना हो म्हणायचे आणि कधी व कुठल्या गोष्टींना नाही म्हणायचे, आणि कुठल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे हे समजलंच पाहीजे. त्यांनाही, आणि आपल्यालाही.

-आरती आमटे

Updated : 8 May 2020 12:36 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top