Home > Max Woman Blog > लॉकडाऊन आणि ज्येष्ठ नागरिक

लॉकडाऊन आणि ज्येष्ठ नागरिक

लॉकडाऊन आणि ज्येष्ठ नागरिक
X

लीलावती, वय वर्ष ६८. वयाच्या १२ व्यावर्षी लग्न झाले. पहिला मुलगा वयाच्या १५ व्या वर्षी जन्माला आला. पहिलं मूल होईपर्यंत संसार चांगला सुरू होता. पुढे नवर्‍याच्या रानटी वर्तणूकीमुळे लीलावती कायमच्या माहेरी आल्या. माहेरी राहत असतांना आईवडील, भाऊ भावजयी यांच्याकडून कोणत्या न कोणत्या प्रकरच्या शाब्दिक छळाला सामोरं जाव लागलं. इतकच काय तर वडिलांनी तुला कोणी सफाई कामगार म्हणूनही कामावर ठेवणार नाही हे बोलून दाखवले. यासगळ्या परिस्थितीत १७ नंबरचा फॉर्म भरून दहावीची परीक्षा दिली. टायपिंग शिकल्या. पुढे नोकरी लागली. दरम्यान अजून दोन मूल पदरी पडले होते. नवरा माहेरी जेव्हाही यायचा तेव्हा काही तरी भांडण करून पैसे घेऊनच परत जायचा. अशा पद्धतीने आयुष्यभर दिवस काढले. पुढे मुलांचे लग्न झाले. त्याच्या साठीमध्ये नवरा मरण पावला. त्यावेळीही त्याच्या गावातील लोकांनी लीलावतीला जबाबदार धरले. ही वेळही निघून गेली.

मुलाच्या घरात आई सगळं घर चालवायची. त्यामुळे मुलाला घर चालविण्याचा तसा फारसा ताण कधी पडला नाही. पण पुढे सुनेसोबत मतभेद होऊ लागले. रोजच्या कटकटीला कंटाळून शेवटी त्यांनी वेगळं राहायचं ठरवलं. गेल्या बारावर्षापासून एकट राहतात. ह्या बारा वर्षात रोज न चुकता नातवाला भेटायला जाण्याचं कधी टाळल नाही. शिवाय सगळे सणवार मुलगा-सून, नातवंड यांनी बोलवले नाही तरी आपलच घर आहे म्हणून मुलाकडे जातात. गेल्यावर्षी लीलावतींना ब्रेन स्ट्रोक अ‍ॅटॅक आला. त्यातून सावरत नाही की दुसर्‍याच महिन्यात हार्ट स्ट्रोकचा अ‍ॅटॅक आला. तपासणी केल्यावर हार्टहोलचा प्रॉब्लेम आढळून आला. वयोमानानुसार डॉक्टर त्याचा आजार औषधावर कंट्रोल करत आहे. अशापद्धतीच आयुष्य आजपर्यंत जगत आल्या.

प्रातिनिधिक चित्र


या लॉकडाउनच्या काळात त्यांना पुन्हा हार्टस्ट्रोकचा त्रास सुरू झाला. उलट्या झाल्या तर त्यात रक्त पडले. डॉक्टरांनी तात्काळ हॉस्पिटलला घेऊन येण्यास सांगितले. लॉकडाउन, संध्याकाळची वेळ. रस्त्यावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मिळेना. या सगळ्या परिस्थितीत तिसर्‍या ठिकाणाहून वाहनाची व्यवस्था झाली. त्यांना वेळेत उपचार मिळाले. उपचार घेऊन घरी आल्यानंतर सगळी काळजी घेतली जात असली तरी त्याचे डोळे मुलाच्या फोनची वाट पाहत आहे. हॉस्पिटलमध्ये मुलगा फोन केला म्हणून आला पण आज तीन आठवडे होत आले तरी मुलाने, सुनेने किंवा नातवांनी एक फोन कॉलही केलेला नाही. उलट त्याच्याशी बोलतांना म्हणल्या की, मुलगा आला असता पण बंद आहे तो तरी कसा येईल अशी स्वत:ची समजूत स्वत:च काढून शांत बसल्या.

लॉकडाउनच्या काळात देशातील जेष्ठ्य नागरिकांवर होणार्‍या अत्याचाराच्या घटनाही समोर येत आहे. ८२ वर्षाचे आजोबा. घरात मुलगा-सून आणि एक नातू असे कुटुंब. लॉकडाऊनमुळे घरात काम करणारी बाई येऊ शकत नाहीये. त्यामुळे सुनेला सगळे काम करावे लागत आहे. आजारपणामुळे खाण्यापिण्यावर बंधने आहेत. पण घरात इतर लोकासाठी जे बनते तेच खायला दिले जाते. त्यांनी खाण्यास नकार दिला त्यादिवशी त्यांना पूर्ण दिवस उपाशी राहावे लागले. शेवटी लॉकडाऊनच्या शिथिल झालेल्या वेळेत त्याची मुलगी येऊन त्यांना तिच्या सासरी घेऊन गेली.


७० वर्षाच्या डिक आंटी. मुलगा आणि सून त्याचा घरचा बिझनेस पाहतात. दोन मूल आहे. त्यांची मुलांची शाळा दुपारी असते. ऐरवी रोज सकाळी ९.०० वाजता मुलगा आणि सुनेला त्याच सगळं आवरून ऑफिसला जायचं असत म्हणून डिक आंटी सकाळी ६.०० वाजेपासून ८.०० वाजेपर्यंत सोसायटीच्या गार्डनमध्ये वेळ काढतात. कारण सुनेला तिच्यामध्ये आलेल कोणी नको असत. डिक आंटी सकाळी जेव्हा सून फोन करेल आमच आवरून झाल आहे तेव्हा त्या घरी परत जातात. या लॉकडाऊनमुळे सोसायटीमध्ये फिरण्यासही मनाई केली आहे. सगळे घरीच आहे. त्याचा मुलगा किराणा सामान आणण्यासाठी जवळच्या दुकानात गेला होता. त्याठिकाणी तो त्याचे पैशाचे पाकीट विसरून आला. गर्दी असल्यामुळे नेमकं कोणी पाकीट घेतलं हे सापडलं नाही. त्यात त्याचे पाच हजार रुपये आणि एटीएम कार्ड, पॅन कार्ड होते. यावरून घरात त्याचे आणि बायकोचे भांडण झाले. परिणामी डिक आंटीला सकाळचा चहा मिळाला नाही. त्यांनी स्वत: करून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुलगा आणि सून दोघेही ओरडले इकडे आमचे नुकसान झाले आणि हिला खायचं पडलं. त्यातून आंटी शुगर पेशंट. शेवटी कंटाळून दुपारी १२ वाजता शेजारच्या बाईकडे जाऊन तिला खायला मागितले. त्याही स्वयंपाक करत होत्या त्यांनी आंटीला जेवू घातले. काही अडचण असेल तर परत या म्हणून सांगितले. तेव्हा आंटी म्हणाल्याला, जर तुमच्या घरातून कोणी बाहेर गेल तर माझ्यासाठी बिस्किट घेऊन यायला सांगा म्हणत शेजारणीकडे १०० रुपये बिस्किटासाठी दिले.

प्रातिनिधिक चित्र


एकीकडे लॉकडाऊन आहे म्हणून समाजातील एक वर्ग घरी दिवाळीत करतात तसे सगळे पदार्थ तयार करून खाणे सुरू आहे. दूसरा वर्ग किमान वेळच्या अन्नासाठी झटत आहे. आणि समाजातील काही लोक असे आहेत की, ज्यांना आपल्या आईला किमान शुगर आहे म्हणून वेळेवर जेवण दिले पाहिजे हे लक्षात येत नाही. अशा लोकांना आपल्या वृद्ध पालकांची कोणतीच जबाबदारी घ्यायची नाहीये.

या लॉकडाऊनमध्ये आपल्या वृद्ध आईला आपण सांभाळत नाही तर किमान एक फोन करून तिची चौकशी केली पाहिजे, वेळेत जेवण दिले पाहिजे याची जाण होऊ शकत नाही इतकी त्यांची वृत्ती लॉकडाऊन झाली आहे. ही गोष्ट अजून वेगळी की, या स्त्रिया त्यांच्या सेवानिवृत्ती वेतनावर जगत आहे. मुलांकडून एकही पैसा न घेता. (दोन्ही स्त्रियांची नावे बदलली आहेत)

-रेणुका कड

Updated : 8 May 2020 8:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top