Home > Max Woman Blog > संस्कृती आणि आपण

संस्कृती आणि आपण

संस्कृती आणि आपण
X

आयटी कंपनीत काम करणाऱ्या दोन तरुणींचा संवाद एका कॉफी हाऊसमध्ये कानावर पडला. आधुनिक म्हणता येईल, असा पेहराव करून अतिशय आत्मविश्वासाने वावरणाऱ्या या तरुणींबद्दल आजुबाजूला वावरणाऱ्या इतरांना जरा हेवाच वाटत होता. फोन आणि लॅपटॉपवर कदाचित त्या काम करत असाव्यात. ते करता करता मध्येच किंचित कॉफीचाही आस्वाद त्या घेत होत्या. “काल घरचे ओरडत होते, महाशिवरात्र आहे, तू उपवास केला नाहीस, पूजा केली नाही,. सासू तर म्हणाली, अगं, इतका चांगला नवरा मिळाला आहे ना! त्याची तुला किंमत नाही. उपवास केला नाहीस तर नवऱ्याचं आयुष्य कसं वाढेल? घरात कटकट वाढायला लागली तशी एक मस्त आयडिया केली. लगेच लिंक शोधली आणि क्लिक केलं. यावर केली पूजा, असं सांगून टाकलं आणि म्हटलं फक्त फिंगर चीप्सच खाल्ले. मग झालाच की उपवास!” दोघी मोठ्यानं हसल्या… “वेळेवर सुचलं म्हणून बरं, नाही तर खरं सांगायचं तर उपवास घडलाच होता. दिवसभर खायला वेळच मिळाला नव्हता. पण खरं सांगायचं तर हे पूजा-बिजा, महाशिवरात्र लक्षातच नव्हत माझ्या. वेळेवर ती लिंक आठवली म्हणून घरातली कटकट टळली. नाही तर रोज महिनाभर घरात हाच विषय चालला असता.” “काय गं तू?” दुसरी जरा नाराजीच्या सुरात म्हणाली, “तुला माहिती होती ती लिंक तर शेअर करायची ना! मला जाम बोलणी खावी लागली यावरून. त्यात मी घरी गेल्या गेल्या सांगितलं की मी मॅक्डोनल्डचा बर्गर खाऊन आले म्हणून. मग काय जे काही महाभारत सुरू झालं घरात की सांगायलाच नको.”

या मैत्रिणींमधला हा संवाद खूप काही सांगून जातो. सहजच झालेल्या या संवादातून आपल्याला आजच्या पिढीवर कामाचा ताण किती आहे, हे कळून चुकते. असं असलं तरी उत्सवाचं, सणांचं महत्त्व बाकी लोक कमी मानतात, असं होत नाही. मानवाला उत्सवप्रिय प्राणी समजलं जातं आणि भारतात तर किती तरी सण आपण उत्सवाच्या स्वरुपात साजरे करतो. नवीन वर्षाचे कॅलेंडर आले की वर्षातले लहानमोठे सण केव्हा केव्हा आहेत, याची नोंद घरोघरी घेतली जाते. या सणांना आपण खूप महत्त्व देतो. जर आपण बारकाईने या सणांचा अभ्यास केला, तर या सणांना आपल्या जीवनात किती अर्थ (धार्मिक अर्थाव्यतिरिक्त) आहे, हे लक्षात येते.

वटपौर्णिमा तसेच पाडवा या सणांमध्ये स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात. पाडव्याला पतीला ओवळतात. पतीही आपल्या पत्नीसाठी काही तरी भेटवस्तू घेऊन येतो. या सणाचे धार्मिक महत्त्व वगळून आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, पती पत्नीचे वैवाहिक जीवन सुखकर करण्यासाठी दोघांनाही एकमेकांविषयी प्रेम, आदर वाटणं गरजेचं असतं. एकमेकांविषयी जाणून घेणं, एकमेकांना वेळ देणं हे यासाठी आवश्यक असतं. मात्र रोजच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करत असताना या महत्वाच्या, तरीही लवकर लक्षात न येणाऱ्या गोष्टी या सणांच्या माध्यमातून साध्य होतात.

आपण मात्र या सरळ, तरल भावनांकडे दुर्लक्ष करून, नको त्या गोष्टींसाठी कट्टर बनलो, नको त्या गोष्टीला महत्व देत गेलो. जस वटपौर्णिमा स्त्रीनेच केली पाहिजे, उपवास नाही केला तर तिच्या पतीला दीर्घ आयुष्य लाभणार नाही, अशी अशास्त्रीय भाषा वापरू लागलो. या सणांच्या मागचा उद्देश समजून न घेता त्याचं अवडंबर करण्यातच आपण धन्यता मानतो. हे सण मात्र, मन प्रसन्न करतात, घरात आणि घरातल्या माणसांमध्ये चैतन्य आणतात, जे वैवाहिक जीवनासाठी व कुटुंबासाठी उपयोगीच ठरते.

आपल्या सणावारांचा आपल्या जीवनाशी अतिशय जवळून संबंध आहे. तसेच आहे आपल्या विवाह संस्थेचे व लैंगिक जीवनाचे! लैंगिक जीवन हा सामान्य जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मानवासहित सर्व प्राण्यांमध्ये लैंगिक व्यवहाराची प्रबळ अनुवंशिक प्रेरणा आहे; पण मानवेतर प्राण्यांमध्ये असते, तशी मानवामध्ये ह्या प्रेरणेचे नियमन करण्याची काही नैसर्गिक यंत्रणा नाही. मानवामध्ये ह्या प्रेरणेचे कार्य व आविष्कार प्राण्यांप्रमाणेच पुनरुत्पादनापुरताच मर्यादित असता, तर लैंगिक शिक्षण अनावश्यक ठरले असते. उलट असे दिसून येते, की उत्क्रांतीच्या प्रक्रियेत मानव पुनरुत्पादनाव्यतिरिक्त, केवळ लैंगिक सुखासाठीदेखील त्या प्रेरणेचा आविष्कार करू लागला. लग्न म्हणजे कायद्याने आणि समाजाने त्या दोन व्यक्तींमधील कामजीवनाला दिलेली मान्यता. याचाच अर्थ मुळात मानवी संस्कृती निर्माण करणाऱ्या समाजाला निर्माण करणारी प्रजा ज्यातून उत्पन्न होते ते हे विवाहाचे नाते.

सण, कुटुंब, विवाह संस्था आणि लैंगिक जीवन यांचा घनिष्ठ संबंध आहे. कुटुंबासाठी आवश्यक विवाहसंस्था, विवाहसंस्थेसाठी आवश्यक लैंगिक जीवन, लैंगिक जीवनासाठी आवश्यक मानसिक, भावनिक स्थिती तयार करायचे काम हे सण वार काही प्रमाणात करतात.

कुठलीही गोष्ट स्थिर, शाश्वत नसते. काळाच्या ओघात त्यात बदल होतच असतात, तरच ती टिकते. असे असले तरी बदल कुठल्या स्वरूपाचे करायचे अथवा स्वीकारायचे, हे ज्या त्या पिढीने ठरवायचे असते. आपण आपल्या संस्कृतीला किंवा आपल्या मागच्या पिढीने घालून दिलेल्या मार्गदर्शनांना समजावून न घेताच, एक तर अंगिकारतो किंवा नाकारतो. ते जर समजावून घेतले तर आपल्याला त्याचे महत्व आपोआप लक्षात येते. मात्र आपण त्याचे अवडंबर करण्यातच जास्त व्यस्त असतो. एक तर बदल नकोच अशी भूमिका स्वीकारली जाते, अथवा अनावश्यक बदल स्वीकारले जातात. आपल्या विवाह संस्थेत दोन अनोळखी व्यक्तींना एकत्र आणले जाते. त्या दोघांचे नाते फुलण्यास काहीशा प्रमाणात सणांची मदतच होते. जसजसा काळ पुढे सरकतो, तसतसे नाते उमलत जाते, हळूहळू एकमेकांची एकमेकांना ओळख होते आणि आयुष्यात त्यामुळे मधुर रस निर्माण होतो. एकमेकांना ते हळूहळू उलगडत जातात. मात्र आपल्याला आता सर्व इन्स्टंट हवं आहे. रक्ताची नाती जोपासावी लागतात. मात्र ती पुसली न जाणारी असतात, त्यामुळे ती जोपासली जातात (इच्छा असो वा नसो!). पती-पत्नीच्या नात्याचे मात्र असे नसते, त्यासाठी वेळ काढावा लागतो, वेळ द्यावा लागतो. आपल्या फास्ट लाईफस्टाईलमुळे “एका महिन्यातच तो/ती मला समजूनच घेत नाही!” अशी विधाने केली जातात. केवळ दोन महिन्यात “आमचे जमत नाही, आता वेगळे झालेलंच योग्य.” असे इतरांना सांगताना दिसतात, तेव्हा आश्चर्य वाटते. एकमेकांच्या शारिरीक तसेच मानसिक गरजा ओळखून त्या पूर्ण कराव्या लागतात, हे कदाचित या जोडप्यांना माहीतच नसते. तेवढा वेळ देण्याची तयारी आजकाल जोडप्यांची दिसून येत नाही. वटपौर्णिमा किंवा इतर कुठल्याही सणांमुळे घरात एक प्रकारचे चैतन्यमय वातावरण तयार होते. रुटिनमधून चेंज यामुळे आपोआपच मिळतो. पती-पत्नीच्या नात्यात आवश्यक असणारी ओढ काळाच्या ओघात ती लोप पावण्याची शक्यता असते, ती या सणांमुळे जोपासण्यास मदत होते.

ज्या जोडप्याचे कामजीवन समृद्ध, समाधानी असते, ते जोडपे सुखी, असे म्हटले जाते. पण हे कळणे आणि प्रत्यक्षात आणणे, यात महद्अंतर आहे. कारण अनेकांना वैवाहिक आयुष्यातलं सेक्सचं स्थान, त्याची मर्यादा याचं महत्त्वच लक्षात येत नाही आणि मग.. नाती कुजायला लागतात. पालकांनी मुलांना समजावून न घेताच आपली मतं लादत मुलांचे विवाह ठरवणे, आजच्या काळाला अनुसरुन नक्कीच नाही. मुलांना कुठलेही लैंगिक शिक्षण न देता याविषयीच्या मार्गदर्शनांना नाकारत आपण खूपच मॉर्डन आहोत, असे भासवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र कुठलेही अंधानुकरण वाईटच. जर आपण कुठल्याही गोष्टीमागची भूमिका, कार्यकारणभाव समजावून घेण्याचा प्रयास केला गेला पाहिजे. काही मार्गदर्शके आपल्या मागच्या पिढीने त्यांच्या काळानुसार आखलेली असली तरी ती अगदीच कालबाह्य ठरवता येतात, असे नाही. ती समजावून घेत, काळानुसार त्यात काही बदल घडवले, तर ते नक्कीच आपल्या हिताचे ठरेल.

प्रियदर्शिनी हिंगे

Updated : 5 Jun 2020 5:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top