Home > हेल्थ > कोरोनाव्हायरस आणि क्षयरोग यांच्यात नेमका फरक काय?

कोरोनाव्हायरस आणि क्षयरोग यांच्यात नेमका फरक काय?

कोरोनाव्हायरस आणि क्षयरोग यांच्यात नेमका फरक काय?
X

कोरोनाव्हायरस किंवा कोव्हिड-१९ ने जगभरात हाहा:कार निर्माण केला आहे. पण आकडेवारी पाहिली तर दिसून येते की, दैनंदिन विचार करता क्षयरोग किंवा टीबीचा संसर्ग अधिक व्यक्तींना होतो. भारतात क्षयरोगामुळे एका तिमाहीमध्ये २०,००० (२०१९ च्या आकडेवारीनुसार) मृत्यू होतात तर कोव्हिड-१९ मुळे मार्च महिन्यापासून झालेल्या मृत्यूंची आकडेवारी तुलनेने कमी आहे. क्षयरोगसुद्धा कोव्हिड-१९ प्रमाणेच संसर्गजन्य असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत क्षयरोगाच्या रुग्णांनी अतिरिक्त काळजी घेणे आणि मास्क, सोशल डिस्टन्सिंग अशा सरकारने जारी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

क्षयरोग आणि कोव्हिड-१९ या रोगांविषयी खालील पाच बाबी तुम्हाला माहीत असाव्या :

लक्षणे : क्षयरोग आणि कोव्हिड-१९ चा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये साधारण सारखी लक्षणे दिसतात. या दोन्ही आजारांमध्ये फुफ्फुसांवर आक्रमण होते आणि ताप, खोकला आणि थकवा ही लक्षणे सामान्यपणे दिसून येतात.

फरक : क्षयरुग्णांची भूक मंदावते, रात्री घाम येतो, वजन कमी होते आणि अत्यंत थकवा येतो तर कोव्हिड-१९चा संसर्ग झालेल्या व्यक्तींचे नाक चोंदते, श्वास घेताना त्रास होतो आणि/किंवा अतिसार (डायरिया) होतो. कोव्हिडची लक्षणे ७ ते १४ दिवसांच्या कालावधीमध्ये दिसतात आणि निघून जातात (लोकांना संसर्ग असतानाही), पण क्षयरोगाची लक्षणे दीर्घकालावधीसाठी राहतात.

संसर्गाची प्रक्रिया : क्षयरोगाचा फैलाव हवेवाटे (संसर्ग झालेली हवा श्वासावाटे आत घेतली तरच सुदृढ व्यक्तीला क्षयरोगाची लागण होऊ शकते) होतो. पण कोव्हिड-१९ च्या बाबतीत, जर तुम्ही कोव्हिड-१९ ची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलात आणि तुम्ही त्या व्यक्तीला स्पर्श केला आणि मग तुमच्या नाकाला, डोळ्यांना किंवा तोंडाला स्पर्श केला तर तुम्हाला हा आजार होऊ शकतो.

उपचार : टीबी पूर्ण बरा होऊ शकतो आणि वेळेवर चाचण्या आणि उपचार पूर्ण केले तर टीबी परतून येत नाही. जेव्हा क्षयरुग्ण २-३ आठवडे सलग औषधे घेतो तेव्हा हा आजार संसर्गजन्य राहत नाही. रुग्णाला ६-९ महिने किंवा डॉक्टरांनी नेमून दिलेल्या कालावधीमध्ये सलग उपचार घ्यावे लागतात. कोव्हिड-१९ वर अजून औषध मिळालेले नाही. त्यामुळे घराबाहेर पडल्यावर नेहमी नाक आणि तोंड झाकून ठेवणे, नियमितपणे साबणाने हात धुणे आणि स्वच्छता राखणे आवश्यक आहे.

सामाजिक समस्या/कलंक : क्षयरोग आणि कोव्हिड-१९ या दोन्ही आजारांशी एक प्रकारचा कलंक जोडला गेला आहे आणि अनेक रुग्णांना समाजाच्या उदासीन वागणुकीचा सामना करावा लागतो. पण अशा रुग्णांप्रती भेदभाव करून चालणार नाही. त्यांना पीडित, किंवा अलगीकरणात असलेले, किंवा संशयित रुग्ण असे संबोधता कामा नये. वैद्यकीय प्रॅक्टिशनर्स, क्षयरोगाशी यशस्वी लढा दिलेल्या व्यक्ती, त्यांचे मित्र, कुटुंबीय आणि कोव्हिड-१९ च्या रुग्णांनी एकत्र येऊन या आजारांबद्दल सामाजशिक्षण करणे आणि जागृती निर्माण करणे आणि या आजारांभोवती असलेले गैरसमज दूर करणे आवश्यक आहे.

वर नमूद केलेली लक्षणे तुमच्यात असतील तर तुम्ही तातडीने डॉक्टरांची भेट घ्यावी. टीबी आणि कोव्हिड-१९ ची चाचणी लवकर केली आणि उपचार लगेच घेतले तर तुमचा आणि तुमच्या आजुबाजूला असलेल्यांचा जीव वाचू शकतो.

- डॉ. अंकित बन्सल

फोर्टिस हॉस्पिटल, जयपूर

Updated : 9 Dec 2020 9:15 AM GMT
Tags:    
author-thhumb

डॉ. अंकित बन्सल

फोर्टिस हॉस्पिटल, जयपूर


Next Story
Share it
Top