"पाळीच्या वेदना सांगणं कमजोरी नाही, आधार मागणं ही ताकद आहे" – छवी मित्तल
Sharing menstrual pain is not weakness, asking for support is strength – Chhavi Mittal
X
मुंबई : भारतीय समाजात मासिक पाळी हा अजूनही कुजबुजण्याचा विषय आहे. स्त्रियांना तीव्र वेदना होत असल्या, त्यांचं दैनंदिन आयुष्य विस्कळीत होत असलं तरी त्या वेदनांना “नॉर्मल” मानून दुर्लक्षित केलं जातं. अभिनेत्री आणि पॉडकास्टर छवी मित्तल यांनी अलीकडे केलेल्या एका भावनिक पोस्टनं मात्र हा गप्प राहिलेला विषय पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे.
आयुष्यात पहिल्यांदाच थबकलेली छवी
४५ व्या वर्षी आलेल्या स्वतःच्या अनुभवाबद्दल छवी लिहितात, “माझ्या आयुष्यात कधीच मासिक पाळी हा अडथळा ठरला नव्हता. पण या वेळी शरीराने जणू साथच सोडली. मुलांना शाळेसाठी तयार करणं, डबे भरणं, झोपवणं – ही माझी रोजची कामं होती, पण त्या दिवशी मी उठूच शकले नाही. पाच दिवस जिमला गेलं नाही तर मला अपराधी वाटायचं, पण या वेळी ते शक्यच झालं नाही.”
त्या पुढे सांगतात, “मी सलग ४८ तास दर तासाला टॅम्पॉन बदलत होते. शरीर इतकं अशक्त झालं की हातापायाला मुंग्या आल्या, डोळे मिटत होते, मेंदू काम करणं थांबल्यासारखं वाटत होतं. त्या क्षणी मला जाणवलं की, ही फक्त ‘सामान्य पाळी’ नव्हती.”
वैद्यकीय कारणं आणि उपचाराची गरज
छवी मित्तल यांनी स्वतःच्या बाबतीतलं कारणही मोकळेपणाने सांगितलं – “माझ्यासाठी हे पोस्ट-कॅन्सर हार्मोन थेरपीमुळे होतं. मागील तीन वर्षांपासून जास्त रक्तस्त्राव होत होता, पण यावेळेस परिस्थिती हाताबाहेर गेली.”
स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मते, मासिक पाळीत होणारा जास्त रक्तस्त्राव अनेक कारणांनी होऊ शकतो. एंडोमेट्रियमचं (गर्भाशयाच्या अस्तराचं) जाड होणं, फायब्रॉईड्स, पॉलिप्स किंवा हार्मोनल बदल ही त्यामागची सामान्य कारणं आहेत. अनेकदा स्त्रिया ही लक्षणं सहन करत राहतात, पण वेळेत निदान न झाल्यास अॅनिमिया, हार्मोनल बिघाड किंवा शस्त्रक्रियेची वेळही येऊ शकते.
संवेदनशीलतेची खरी ताकद
या अनुभवातून छवी यांनी एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित केली – “स्त्रीच्या वेदनांना दुर्लक्षित करू नका. पुरुष या वेदना थांबवू शकत नाहीत, पण थोडा जिव्हाळा, थोडं समजून घेणं आणि थोडी साथ तिच्यासाठी औषधासारखी ठरते.”
त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा उल्लेख करताना सांगितलं की मुलगा अरहमनं आईच्या वेदना पाहून तिला मिठी मारली, पाय दाबले आणि म्हणाला, “आई, तू बिछान्यावर राहा, मी आज एकटाच झोपेन.” पती मोहित हुसेन यांनी तर सर्व मिटिंग्स रद्द करून पत्नीच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. “माझ्यासाठी ही खरी ताकद होती – माझं कुटुंब माझ्या पाठीशी आहे,” असं त्या म्हणाल्या.
महिलांसाठी सपोर्ट स्पेस
छवी मित्तल यांनी या पोस्टच्या शेवटी महिलांना थेट संदेश दिला – “कोणतीही स्त्री या वेदनांतून एकटी जाऊ नये. मी अशा महिलांसाठी एक खास स्पेस तयार करत आहे, जिथे त्या मोकळेपणाने बोलू शकतील, अनुभव शेअर करू शकतील आणि एकमेकींचा आधार बनू शकतील. वेदनांबाबत बोलणं म्हणजे कमजोरी नाही, तर ती खरी ताकद आहे.”
बदलती जाणीव
छवींच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर हजारो महिलांनी स्वतःच्या अनुभवांबद्दल लिहिलं. काहींनी “हीच आमची गोष्ट आहे पण कधी बोललोच नाही” असं सांगितलं, तर काहींनी “तुमच्यामुळे आम्हाला आधार मिळाला” अशी प्रतिक्रिया दिली.
या चर्चेतून एक मोठा संदेश समोर आला – मासिक पाळीबद्दल बोलणं आता थांबवायचं नाही, तर उघडपणे, संवेदनशीलतेने आणि जबाबदारीनं त्याकडे पाहण्याची गरज आहे...
- छवी मित्तल