मासिक पाळीतील तिचे चार दिवस...
X
गिर्यारोहन करताना अनेक आदिवासी पाड्यांवर ये-जा होत असते. यावेळी तिथल्य़ा स्त्रियांच्या अनेक अडचणी निदर्शनास येऊ लागल्या. यात आरोग्यविषयक समस्या मोठ्या प्रमाणावर होत्या. त्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशातून काही मैत्रिणींच्या आणि सहकाऱ्यांच्या मदतीने ‘ती आणी तिचे चार दिवस’ या पाळीबद्दलच्या जनजागृतीची मोहीम हाती घेतली. गिर्यारोहक वैभव ऐवळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या मोहिमेत आलेल्या अनुभवांचं लेखन केलंय.. काय आहे ही मोहिम जाणून घेऊया..
मासिक पाळी हा काही उघड बोलायचा विषय नाही. इथे घरातल्या माणसांशी त्यावर बोलणं अवघड, तर बाहेरून आलेल्या माझ्यासारख्या अनोळखी मुलाशी मासिक पाळीबद्दल कोण, कसं आणि का बोलेल हा प्रश्न होताच. म्हणून मी माझ्या मैत्रिणींबरोबर बोललो आणि प्रियांका टक्के, शीतल अहेर, उज्वला शिंदे, स्नेहल धार्षे, नेहा गुरव, श्रीनिधी शेट्टी, आरती चीले. तसेच माझे मित्र किरण जाधव, निलेश माने आणि सुमित नाईकधुरे यांची ही मोलाची साथ लाभली आणि सुरुवात झाली "ती आणी तिचे चार दिवस" या पाळीबद्दलच्या जनजागृतीची.
सुरवातीला प्रयोग म्हणून चालू केलेल्या ह्या मोहिमेला कमी प्रतिसाद मिळाला काही ठिकाणी तर फक्त मोफत पॅड मिळत आहेत. म्हणून गावकऱ्यांनी हजेरी लावली. कित्येक ठिकाणी कार्यक्रम झालेल्या ठिकाणीच दिलेल्या मार्गदर्शन पुस्तिका फेकल्या होत्या. अश्या घटना आमच्या मनात मोहिमेबद्दल नैराश्य निर्माण करणाऱ्या होत्या. सुरवातीच्या ठिकाणी कार्यक्रम झाल्यावर योग्य प्रतिसाद मिळत नाही हे पाहून सगळेच खचून गेले होते. पण म्हणतात ना "भगवान के घर देर है अंधेर नहीं" ह्याचा प्रत्यय आला. आमची ५ वी आणि २०१९ ची शेवटची मोहीम २९.१२.२०१९ रोजी आम्ही पनवेल जवळील प्रबळगडा जवळील प्रबळमाची गावात केली. गावकऱ्यांशी संबंध खूप चांगले होते. त्यांनी संपूर्ण सहकार्य केले आणि कार्यक्रमाला जवळ जवळ ३०/३२ स्त्रियांनी हजेरी लावली. त्यांनी केलेल्या प्रश्नांमुळे आम्ही सगळेच भांबावून गेलो होतो. कारण अपेक्षेपेक्षा जास्त स्त्रियां उपस्थित असल्याने.
मग, सगळ्यांशी सविस्तर चर्चा केली इतर वेळी हा कार्यक्रम फक्त २०/२५ मी. समाप्त होत असे. पण पहिल्यांदा आमचा हा कार्यक्रम जवळ जवळ १.३० तास चालला सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. ज्यांना डॉक्टरी सल्याची गरज होती अश्या स्त्रियांचे माझे काही डॉक्टर स्नेहिंनी त्यांनी मोफत मार्गदर्शन करण्याची तयारी दाखवली. तसेच त्यांना लागणाऱ्या गोळ्या देखील मोफत उपलब्ध केल्या गेल्या. मोहिमेला डॉ. सुनील खट्टे, डॉ. श्वेता खट्टे, पत्रकार तन्मय शिंदे, पत्रकार सागर नेवरेकर, सत्येंद्र काटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
'ती आणि तिचे चार दिवस' ह्या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील मुलींना/ स्त्रियांना त्याची माहिती देणं आणि त्या दिवसांमध्ये कशी काळजी घ्यावी हे समजावून सांगणे हा आहे.
- मासिक पाळी म्हणजे काय?
- मुलगी वयात आल्यावर त्यांच्या योनीमार्गातून जो रक्तस्त्राव होतो, त्याला मासिक पाळी (Menstrual Cycle /M.C.) म्हणतात.
मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरु होते. कधी कधी या अगोदरही सुरु होऊ शकते. दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादन ही तयार केले जाते. योग्य काळात स्त्री व पुरूषाच्या वीर्यातील पुरूषबीज व स्त्रीच्या गर्भाशयातील स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो. पण ज्यावेळी हे स्त्रीबीज फलित होत नाही त्यावेळेस फलित न झालेल्या बिजासहित आच्छादन बाहेर टाकले जाते. ते रक्ताच्या स्वरुपात योनी मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते म्हणून हा रक्तस्राव होतो. विवाहानंतर जेव्हा स्त्री व पुरुषच्या विर्यातील पुरुष बीज व स्त्रीच्या गर्भाशयातील बीज यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो. स्त्रीला दर २७/३० दिवसांनी मासिक पाळी येते. हे चक्र वयाच्या १२ व्या वर्षी सामान्यतः सुरू होते आणि साधारणतः वयाच्या ४५/५० वर्ष कालावधीत थांबते.
- मासिक पाळीचे चक्र
मासिक पाळीच्या चक्राच्या पहिल्या दिवशी रक्त वाहण्यास सुरुवात होते, ज्याला पहिला दिवस म्हणतात. हे चक्र पुढील मासिक पाळीच्या जरा आधी थांबते. हे ऋतुस्त्राव चक्र साधारणपणे २५ ते ३६ दिवसांचे असते. फक्त १० ते १५ टक्के स्त्रियांमध्ये मासिक पाळीचे हे चक्र अचूक २८ दिवसांचे असते. वयात आल्यानंतरच्या लगेचच्या काळात तसेच पाळी थांबण्याचा वेळी हा फरक ठळकपणे दिसून येतो आणि दोन पाळ्यांमधील कालावधी देखील अधिकतम असतो. रक्तस्राव ३ ते ७ दिवस किंवा सरासरी ५ दिवस सुरु राहतो.
- मासिक पाळीशी निगडित सर्वसाधारण समस्या-
१. पाळी लवकर अथवा उशिरा येणे
२. पाळी न येणे - गर्भाशय वा योनीमार्ग बंद असणं, बिजांडा मध्ये दोष, गर्भाशय नसणे या सरख्या काही कारणानं मुळे पाळी येत नाही.
३. अनियमित रक्तस्त्राव - दोन पाळीच्या मधल्या काळात रक्तस्त्राव होणे. दोन पाळीच्या मधल्या काळात वेदना होणे. आधीच्या पाळी पेक्षा जास्त रक्तस्त्राव होणे. अंगावरून पांढरे पाणी जाणे अश्यावेळी तातडीने डॉक्टरांकडे जावे.
४. मासिक पाळी दरम्यान मूड स्वींग्स होणे, चिडचिड होणे साहजिक आहे. मासिक पाळी दरम्यान अनेकदा कोणाशीही बोलायची इच्छा होत नाही, कधी खूप आनंद होतो तर कधी मन दुखी होते. असे मूड स्वींग्स होतच असतात.
- मासिक पाळी मध्ये त्रास होऊ नये म्हणून काही उपचार
मासिक पाळीशी संबंधित समस्यांवरील इलाज व उपचार हे मुख्यतः त्या समस्येच्या स्वरूपावर व ती आढळण्याच्या कालावधीवर अवलंबून असतात. किरकोळ समस्यांवर किंवा सहा महिन्यांपेक्षा कमी काळपर्यंत दिसलेल्या समस्यांवर डॉक्टर साधारणपणे जीवनशैली बदलण्याचे किंवा स्वतःच करण्याजोगे उपाय सुचवतात,
उदाहरणार्थ -
१. नियमित व्यायाम
२. संतुलित आहार घेणे
आहारात जास्तीचे लोह, कॅल्शिअम आणि 'ब' जीवनसत्वाचा समावेश करणे (अथवा पूरक औषधे किंवा गोळ्या घेणे)
३. गरम पाण्याची पिशवी पोटाच्या खालच्या बाजूला लावून ठेवल्यास आराम मिळतो.
४. मासिक पाळीच्या समस्यांवर आपण वनौषधींचे व इतरही घरगुती उपाय करू शकता,
उदाहरणार्थ
- आल्याचा चहा पिणे
- जंगली सुरणासारख्या पेटके-विरोधी भाज्या खाणे
- ओटीपोटावर लव्हेंडर तेल चोळणे आणि मसाज करून घेणे
- मासिक पाळीचा जास्त व दीर्घकाळ त्रास होत असल्यास डॉक्टरी सल्ला घेणे उत्तम.
५. पाळी च्या काळात कापड नियमित बदलत राहणे.
६. योनीमार्गच्या जंतुसंसर्ग वर नियत्रंण आणण्यासाठी जास्त अवधी लागतो. त्यामुळे वेळीच स्त्रियांनी योनीमार्ग ची स्वच्छता ठेऊन आजारापासून दूर राहावे.
७. शरीरातील कॅलशियमची कमतरता भरून काढण्यासाठी आपण दुध-दही खात असतो. पण मासिक पाळी दरम्यान हे पदार्थ खाऊ नये.
८. मासिक पाळीत होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी डेअरी प्रोडक्ट्स खाऊ नये. डॉक्टरांच्या मते मासिक पाळी दरम्यान कॅलशियम घ्यायला हवे पण डेअरी प्रोडक्ट्स खाण्यापासून वाचायला हवे.
कारण ह्यामुळे त्रास वाढतो. ह्याचं कारण म्हणजे ह्यात एराकाडोनी अॅसिड आढळत ज्यामुळे त्रास वाढतो.
९. स्त्रिया ह्या कामाच्या नादात / त्या विषयी योग्य ज्ञान नसल्यामुळे कधीकधी पॅड बदलायचं टाळतात. पण हे खूप घातक असते. मासिक पाळी दरम्यान स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घेणे खूप गरजेची असते.
जर आपण पॅड खूप काळापर्यंत बदलला नाही तर त्यात बॅक्टेरिया निर्माण होऊ लागतात ज्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. म्हणून पॅडला दर तीन ते चार तासाला बदलाने गरजेचे असते. त्यामुळे ते टाळणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.