पत्नीला लठ्ठपणावरुन टोमणा मारताय? थांबा हे वाचा !
X
पती-पत्नीची भांडणं म्हणजे संसारातील अविभाज्य घटक असं म्हटलं जातं. यात पत्नीला टोमणे मारत विनोद करणे ह्या संसारातील नेहमीच्या गोष्टी. याच गोष्टींवरून अनेक विनोद होत असतात. तसेच पती किंवा पत्नीच्या लठ्ठपणावरूनही अनेक विनोद आहेत. मात्र पतीच्या अशा टोमण्यांमुळे अहमदाबादमधील एका महिलेने पतीविरोधात थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लगा नं झटका?
तर झालंय काय... अहमदाबादच्या वासणा परिसरात ही महिला नवऱ्यासह राहते. तीन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर सुरुवातीचे सहा महिने आनंदात आणि सुखात गेले. तेव्हा सासरच्या कोणाचीही आपल्याबाबत कोणतीही तक्रार नव्हती. मात्र, त्यानंतर सासरच्यांनी वजनावरुन टोमणे मारण्यास सुरुवात केली, असा आरोप या महिलेने केला आहे. “तुझे वजन वाढत आहे, ते नियंत्रणात ठेव, कमी खा असे टोमणे पती मारत होता. त्यानंतर त्याचे टोमणे मारण्याचे प्रमाण वाढले. सासरच्यांकडूनही असेच टोमणे मारण्यात येत होते. आपण ते सर्व सहन केले. त्यानंतर मात्र तू लठ्ठ असल्याने मला आवडत नाही. आईवडिलांच्या दबावामुळे तुझ्याशी लग्न केले, असे पतीने मला सांगितले. त्यानंतर माझ्या सहनशक्तीचा अंत झाला. पतीने आपल्याला टोमणे मारणे सुरुच ठेवले आणि नवीन घर घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये आणण्यास सांगितले. तसेच महिन्याभरापूर्वी आपल्याला घराबाहेरही काढले होते.” त्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे महिलेने सांगितले.