Home > हेल्थ > World Cancer Day : भारतात एका वर्षात ११ लाख कर्करोगींचे निदान, त्यात 27% स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण

World Cancer Day : भारतात एका वर्षात ११ लाख कर्करोगींचे निदान, त्यात 27% स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण

कर्करोगामध्ये स्तानाच्या कर्करोगाचे प्रमाण हे २७.७ टक्के आहे तर गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण १६.५ तर बीजाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण हे ६.२ टक्के इतके आहे. चिंताजनक बाब म्हणजे भारतात दर चौथ्या मिनीटाला एक महिलेत स्तनाच्या कर्करोगाचे निदान होते. वाचा स्त्री कर्करोग तज्ञ डॉ. तेजल गोरासिया यांचा हा लेख..

World Cancer Day : भारतात एका वर्षात ११ लाख कर्करोगींचे निदान, त्यात 27% स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण
X

गेल्या काही वर्षांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे आढळून येत आहे. केवळ भारतामध्ये एका वर्षात जवळपास ११ लाख नवीन रुग्णांचे निदान होणे हे चिंताजनक ठरत आहे. दिवसेंदिवस बदलत चाललेली जीवनशैली, आहाराच्या चूकीच्या सवयी तसेच व्यायामाच्या अभावामुळे हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०११ ते २०१२ या एका वर्षामध्ये महाराष्ट्रात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण २५ ट्क्कयांनी वाढले आहे. कर्करोगामध्ये स्तानाच्या कर्करोगाचे प्रमाण हे २७.७ टक्के आहे तर गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण १६.५ तर बीजाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण हे ६.२ टक्के इतके आहे. तज्ञांनी सादर केलेल्या अहवालानुसार एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे भारतात दर चौथ्या मिनीटाला एक महिलेत स्तनाच्या कर्करोगाचे निदान होते.

भारतीय स्त्रियांमध्ये सर्वाधीक प्रमाणात आढळून येणारे कर्करोग-

- गर्भाशयाच्या मुखाचा (सर्व्हायकल कॅन्सर) कर्करोग

- स्तनांचा कर्करोग

- बीजाशयाचा कर्करोग

- तोंडाचा कर्करोग

- कोलोरेक्टल कर्करोग

लक्षणे कोणती

- योनीमार्गातून होणारा रक्तस्राव

- थकवा जाणवणे

- अन्नावरील वासना उडणे

- पेल्वीक पेन

- स्तनाग्रांमधून होणारा स्राव

- अतिसार आणि बध्दकोष्ठता

कारणे कोणती?

कर्करोग होण्यामागच्या कारणांमध्ये पर्यावरणीय घटकांचा देखील समावेश असतो. त्याव्यतिरिक्त पाहिल्यास तंबाखुचे सेवन हे देखील कर्करोगास कारणीभूत ठरते. पुरुषांमध्ये तुंबाखुमुळे होणारा कर्करोगाचे प्रमाण ५० टक्के आहे तर महिलांमध्ये हे प्रमाण २० टक्के इतके आहे. चूकीचा आहार हे देखील कर्करोगास कारणीभूत ठरत असून त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता १० ते २० टक्के इतकी असते.

कर्करोगाचे प्रकार कोणते?

गर्भाशय मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) - हा कॅन्सर स्त्रियांमध्ये आढळतो. ज्या स्त्रिया आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्यांच्या भोवती हा कर्करोग लवकर विळखा घालतो. या कॅन्सरमध्ये स्त्रियांच्या गर्भाशयातील कोशिकांमध्ये अनियमित वृद्धी होऊ लागते आणि कॅन्सर जन्माला येतो. या कॅन्सरची काही लक्षणे म्हणजे शारीरीक संबंधाच्या वेळी योनीमध्ये वेदना होणे, योनीतून लाल रक्त बाहेर पडत अचानक डिस्चार्ज होणे, खूप थकवा जाणवणे, पाय दुखणे, चिडचिड होणेम कशातच मन न लागणे ही आहेत.

गर्भाशयाचा कर्करोग – गर्भाशयाचा आत एक आंतरिक आवरण असते ज्याला एंडोमेट्रीअम असे म्हणतात. जेव्हा एंडोमेट्रीअमच्या पेशी अनियंत्रितपणे वाढतात तेव्हा त्या गर्भाशयाच्यास कर्करोगास कारणीभूत ठरतात. २१ ते ६५ या वयोगटातील लैंगिकरित्या सक्रिय असलेल्या महिलेने दर ३ वर्षांनी पॅप स्मिअर चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो. ३० किंवा त्याहून अधिक वय असलेल्या स्त्रियांनी दर पाच वर्षांनी पॅप चाचणी करून घ्यावी. यात एचपीव्हीसाठीही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस डीएनए) चाचणी समाविष्ट असावी. पॅप स्मिअरच्या सहाय्याने सुरुवातीच्या टप्प्यातच गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाल्यास त्यातून बचावण्याची शक्यताही वाढते.

स्तनाचा कर्करोग- या कॅन्सर दरम्यान सुरुवातीला स्तनांवर एक गाठ तयार होत असल्याची जाणीव होते. ही गाठ हळूहळू पसरते आणि त्यातून कॅन्सरचा विळखा जीवाला पडतो. यासाठी वेळोवेळी आपल्या स्तनांची तपासणी करणे उत्तम होय. स्तनांच्या त्वचेचा रंग बदलणे, स्तन कमजोर दिसणे आणि लटकू लागणे, एका किंवा दोन्ही स्तनांचा आकार बदलणे, स्तनाग्रातून स्राव होणे, वेदना होणे ही काही स्तनांच्या कर्करोगाची सामान्य लक्षणे आहेत. महिलांनी दर महिन्यात स्तनांची स्वतः तपासणी करावी. आपल्याला स्तनाचा कर्करोग आहे असा संशय असल्यास, तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. चाळीस वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांनी महिन्यातून एकदा सेल्फ ब्रेस्ट एग्झॅमिनेशनच्या जोडीने वर्षातून एकदा ' मॅमोग्राफ़ी ' करून घेणे गरजेचे आहे.

डॉ. तेजल गोरासिया

लेखीका ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर, सातारा येथे स्त्री कर्करोग तज्ञ आहेत

Updated : 4 Feb 2021 3:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top