Home > हेल्थ > पाळीत सेक्स केल्याने खरंच नपुंसकत्व येतं का? जाणून घ्या...

पाळीत सेक्स केल्याने खरंच नपुंसकत्व येतं का? जाणून घ्या...

बऱ्याचदा लोक पाळीदरम्यान सेक्स करणं टाळतात. काही गैरसमजापोटी तर काही रिस्क नको म्हणुन... पण पाळीदरम्यानही सुरक्षित पध्दतीने सेक्स करता येतो. कसं? तर हे जाणून घेण्यासाठी आपल्याला बाईच्या पाळीचं शास्त्र जाणून घ्यावं लागेल आणि ते जाणुन घ्यायचं असेल तर हा लेख वाचा. कारण महितीये ना शास्त्र असतं ते!

पाळीत सेक्स केल्याने खरंच नपुंसकत्व येतं का? जाणून घ्या...
X

लग्नाला इतके महिने झालेत गोड बातमी कधी देताय? देव करो आणि तुजी कुस उजवू दे... वेळेतच मुलं जन्माला घालायला हवीत नाहीतर नंतर अडचणी येतात. मुलांबद्द्ल आपण बोलताना अजिबात थकत नाही कारण मुलं असतातच इतकी गोड! पण मुलं जन्माला घालण्यासाठी जी क्रिया करावी लागते त्याबद्द्ल आपण मोकळेपणाने बोलायला लाजतो. शिवाय मुलं जन्माला घालण्यासाठी निसर्गाने आम्हा महिलांमध्ये जे एक साधं चक्र तयार केलंय त्याबद्दल आम्ही जशा लाजतो त्याबद्दल तर बोलायलाच नको. मात्र आपण आज बोलणार आहोत. कारण आपण निर्लज्ज आहोत त्यामुळे आपण आज सेक्स(संभोग) आणि पाळीबद्दल बोलणार आहोत.

चला तर मग आज मोकळेपणानं बोलुयात मासिक पाळी बद्दल! जी गोष्ट दर महिन्याला होते त्याबद्दल बोलायला आपण इतके का लाजतो. इतके की आपण साधा हा दोन अक्षरी शब्दही पुर्णपणे नाही बोलू शकत. पिरिएड्स, मासिक पाळी किंवा Menstruation!




महिलेच्या शरीरातील अंड वेळेनुसार दोन्ही पैकी कोणत्याही एका अंडाशयामध्ये जाणतं होतं. मग हे अंड अंडवाहिनीमधून खाली गर्भाशयाच्या दिशेने जाऊ लागतं. जिथे त्याची भेट शुक्राणूशी झाली की ते फलतं. या दरम्यान गर्भाशय गर्भधारणेच्या तयारीला लागतं. फळलेल्या अंड्याचं स्वागत करण्यासाठी ते मऊ कोशिका तयार करू लागतं कारण गर्भधारणेवेळी सर्व काही ठीक राहीलं पाहिजे. पण जेव्हा शुक्राणू भेटतच नाही तेव्हा या कोशिकांची काहीच गरज राहत नाही. त्यामुळे त्यांना आणि अफलित अंड्याला शरीरातून बाहेर काढावं लागतं आणि हाच आहे दर महिन्याला होणारा रक्तस्त्राव! हा आपल्याला जितका दिसत असतो त्यापेक्षा खुप कमी असतो. फक्त ५० ते ६५ मि.ली. काही महिलांना या दरम्यान खुप त्रास होतो. अशक्तपणा जाणवतो पण जर आपण आजारी नसाल, ठणठणीत असाल तर मग आपण सगळं काही करू शकता. अगदी सेक्सही!


पाळीच्या दरम्यान सेक्स?

पाळीच्या दरम्यान सेक्स? बाई गं.... जेव्हा आपण मोकळेपणाने पाळीवर बोलत नसतो तेव्हा जी काही अर्धवट माहिती समोर येते तिच्यावर विश्वास ठेऊ लागतो. अनेकांचा असा समज आहे की पाळीदरम्यान जो रक्तस्त्राव होतो तो वाईट असतो. त्यातून आजार पसरतो. अनेकांना तर असंही वाटतं की पाळीदरम्यान सेक्स केल्यास पुरूष नपुंसक होतो. पण जरा थांबा असं काहीही नाहीये. जर का आपण कंडोम वापरत नसाल तर आपल्याला संसर्ग होण्याची भिती असते जो आपल्याला पाळी नसतानाही होऊ शकतो. बोट कापल्या नंतर जो रक्तस्त्राव होतो तो पाळीतील रक्तस्त्रावापेक्षा वेगळा असतो. ज्यात अफलित अंड असतं त्यामुळे साहजिक आहे हे वेगळं असतं. पण हे घाण नसतं. मग नेमकं असं कारण तरी काय आहे की सॅनिटरी पॅड आपल्याला काळ्या पिशवीमध्ये आणावे लागतात. पोटात, पायांमध्ये इतका त्रास होत असतो तरीही आपण घरच्यांपासून तो लपवत राहतो. आपल्याला जराशी तरी कल्पना आहे का की पाळीदरम्यान आपल्या शरीरात काय काय भानगडी सुरू असतात?


पाळीदरम्यान आपल्या शरीरात काय काय भानगडी सुरू असतात?

पाळीदरम्यान शरीरात विविध तऱ्हेचे हार्मोन्स वर खाली होत असतात. असं समजा की हे आपापसात एक प्रकारचा खेळ खेळत असतात. यात चार सर्वात जास्त महत्वाचे असतात. Oestrogen, Progesterone, Luteinising Hormone म्हणजेच LH आणि Follicle-Stimulating Hormone (FSH). जेव्हा अंड अंडाशय सोडून गर्भाशयाच्या दिशेने जाण्यास निघतं त्याच्या थेट आधी शरीरात Oestrogen चं प्रमाण जलद गतीने वाढतं. Oestrogen मुळेच गर्भाशयात नव्या कोशिका बनत असतात. हार्मोन्सच्या वाढण्याने आपण अचानकच उत्साही राहू लागतो. अंड अंडाशयातून निघाल्यावर Progesterone चं प्रमाण वाढतं. Progesterone सुनिश्चित करतं की गर्भाशयात जे टीश्यू बनले आहेत ते सुरक्षित आहेत की नाही. तो Oestrogen शी लढतही असतो की आणखी टीश्यू निर्मिती बंद करा नाही तर त्यांचं रूपांतर कॅन्सर मध्ये होईल.

Oestrogen चं वाढतं प्रमाण पाहून LH सुध्दा सक्रीय होऊन जातं. खरंतर LH हेच अंड्याला अंडाशयातून गर्भाशयाकडे जाण्यासाठी धक्का देतं. मग येते FSH ची पाळी... याला जसं कळतं की अंडाशयातून अंड निघून गेलं आहे की तो नवं अंड निर्मिती करू लागतो. म्हणजेच नव्या चक्राची सुरूवात… अशात Oestrogen चं प्रमाण पुन्हा वाढू लागतं आणि गर्भाशयात कोशिकासुध्दा! विचार करा जर शरीरात इतकं सगळं होत असेल तर मेंदुची काय अवस्था असेल?



हार्मोन्सच्या या कॉक्टेलमुळे अनेक महिलांना PMS म्हणजेच Pre Menstrual Syndrome चा सामना करावा लागतो. अशात छातीत दुखणे, थकवा जाणवणे, काही मुलींना रडावसं वाटतं तर काहींची चिडचिड होते. तर पुढच्या वेळी जेव्हा आपल्याला पाळी येईल तेव्हा आपल्या शरीराचे आभार माना. त्याला सांगा All is well! आणि तसंही पाळी दरम्यान पोट फुगणं, पोटात गॅस होणं या सामान्य बाबी आहेत. काही महिलांचं तर पाळीदरम्यान पोटच खराब असतं. आणि तरीही महिला घरातलं सगळं काम करतात. कार्यालयात जातात तिथलं काम करतात.


आपण कधी विचार केला आहे का की महिलांच्या ऐवजी पुरूषांना पाळी आली असती तर...... तर त्यावर मोकळेपणाने बोलंल गेलं असतं. दर महिन्याला पाळीदरम्यान सुट्टी मिळाली असती. कारण जगातील सर्वाधिक कायदे तर पुरूषांनी तयार केलेले आहेत. महिलांना या दिवसात नेमका काय त्रास होतो याची त्यांना पुसटशीही कल्पना नाहीये. आपण महिलांनी मोकळेपणाने न बोलल्यामुळेच पुरूषांना या त्रासाची कल्पनादेखील नाहीये. इंडोनेशिया आणि तैवान यांनी तर आदर्श उभा केलाय. इंडोनेशियामध्ये महिलांना महिन्यातील २ दिवस तर तैवान मध्ये ३ दिवस भरपगारी सुट्टी असते. आणि इतर ठिकाणी..... इतर ठिकाणी आपण महिला फक्त लपवतो. तर लपवू नका आणि वाचकहो जर आपण पुरूष असाल तर दर महिन्याला आपली अर्धांगिनी नेमकी कोणत्या त्रासातून जाते हे आपल्याला उमगलं असेल तर महिन्यातील चार दिवस जरा आपण त्यांची काळजी घ्याल अशी अपेक्षा करूयात.

Updated : 15 Jun 2022 6:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top