Home > हेल्थ > सेक्स करताना सोडलेल्या स्पर्म्सचा योनीतील प्रवास कसा असतो?

सेक्स करताना सोडलेल्या स्पर्म्सचा योनीतील प्रवास कसा असतो?

हस्तमैथुनावरच आपण मोकळेपणाने बोलत नाही तर शुक्राणूंचा प्रवास वगैरे आपल्यासाठी एक रम्य कथाच... असं जरी असलं तरी हे प्रश्न आपल्याला कधी ना कधी पडतातच पण लाजेखातर आपण त्याची उत्तरं शोधत नाही किंबहुना शोधण्यासाठी पॉर्न पाहण्याचा मार्ग निवडतो पण तिथेही हाती निराशाच लागते. कसा असतो वीर्यस्खलनानंतर शुक्राणुंचा योनीतील प्रवास? सोबत हस्तमैथुन चांगलं की वाईट? जाणून घ्यायचंय मग हा लेख आपल्यासाठीच आहे. जरूर वाचा!

सेक्स करताना सोडलेल्या स्पर्म्सचा योनीतील प्रवास कसा असतो?
X

विकी डोनर चित्रपटातले डॉ. चड्डा आठवतायत? त्यांची एक फार मोठं काम केलंय. या आधी जो शब्द उच्चारायला लोक लाजेखातर लाल व्हायचे तो शब्द त्यांनी चित्रपटात इतक्यावेळेस उच्चारला की तो आता एक सामान्य शब्द झाला आहे. तो शब्द कोणता आहे... स्पर्म! कधी ग्रिडी स्पर्म, कधी नॉटी स्पर्म... चड्डाजींनी हा शब्द सिनेमात इतक्यांदा उच्चारला आहे की लोकांना हा शब्द ऐकणं तरी किमान सामान्य वाटू लागलं आहे. त्यानंतर आला गुड न्युज हा सिनेमा! विक्की डोनर चित्रपटात स्पर्म दान केले जात होते तर या चित्रपटात स्पर्म्सची अदलाबदलीच झाली. मग आपल्याला जर कुणाला सिनेमाची कथा सांगायची असेल तर स्पर्म हा शब्द उच्चारावाच लागेल. आता जर स्पर्म हा शब्द उच्चारायला आपल्याला लाज वाटत नसेल तर मग आज स्पर्मलाच जाणून घ्यायला काय हरकत आहे.

आज आपण बोलणार आहोत लाईफ ऑफ स्पर्मबद्दल म्हणजेच आपल्या शुक्राणूंबद्दल! आपल्या म्हणजेच महिलांच्या शरीरात एका वेळी एकच बीजांड तयार होतं. पण पुरूषांसोबत असं नाही होत. ज्यावेळी पुरूष वीर्यस्खलन करतात तेव्हा एकाचवेळी लाखो स्पर्म्स निघतात. पण गर्भधारणा करण्यासाठी या लाखांमधील फक्त एकच पुरेसा असतो. म्हणुनच की काय लोक आपल्या पाल्याला लाखात एक म्हणतात. बाईच्या शरीरात बीजांड कुठे असतं. ते फर्टिलाइज होत नाही तेव्हा काय होतं हे आधीच्या दोन लेखांत आपण जाणून घेतलेलंच आहे त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात बीजांड फर्टीलाईज कसं होतं?



बीजांड फर्टीलाईज कसं होतं?

वीर्यस्खलन झाल्यावर शुक्राणूंना एका मोठ्या स्पर्धेचा भाग व्हायचं असतं. तसं पहायला गेलं तर अंतर फक्त २० सेंटीमीटरचंच आहे पण या लहानश्या स्पर्मसाठी हे तसंच आहे जसं आपल्यासाठी ५०० किलोमीटर अंतर पायी चालत जाणं! म्हणजेच खुप मेहनतीचं काम. खुप सारे स्पर्म म्हणजेच शुक्राणू हे योनीच्या आतमध्ये जिवंतच राहू शकत नाहीत. कारण की योनी ही आम्लयुक्त असते. या शिवाय रोगप्रतिकार प्रणाली या शुक्राणूंना किटाणू समजून मारून टाकते. म्हणजेच या निवड प्रक्रियेच्या पुढच्या फेरीत तोच शुक्राणू पोहोचतो जो फिट आहे.

इथे स्पर्म आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रवास करत असतात आणि दुसरीकडे बीजांड अंडनलिकेद्वारे खाली गर्भाशयाच्या दिशेने येणं सुरू करतं. संभोगादरम्यान स्त्रीला जेव्हा ऑरगॅजम प्राप्त होतं तेव्हा योनी, गर्भाशय आणि गर्भाशय ग्रीवा तिघेही एकत्रच आकुंचन पावू लागतात. याचं ध्येय असतं स्पर्म्सना सहजरीत्या आत ढकलणं. जोपर्यंत ही आकुंचन प्रक्रीया सुरू असते तोपर्यंत स्पर्म कोणत्याही कष्टांविना योनीत पोहत असतात. पण जशी ही आकुंचन प्रक्रीया थांबते तसं लगेच शुक्राणूंना कोणत्याही मदतीशिवाय पुढे जावं लागतं. साधारणतः वीर्य हे चिकट असतं. पण गर्भाशयात गेल्यावर त्यांचा चिकटपणा नाहीसा होतो आणि शुक्राणूंकरता पोहणं सोपं होऊन जातं. शिवाय गर्भाशयाच्या भिंती त्यांना रस्ता दाखवण्यास मदतही करतात. अद्यापही अंडनलिका बीजांड खाली येत असल्याचा संदेश कशी पाठवते याचा शोध कोणत्याही रिसर्चमध्ये लागु शकलेला नाही. हा पण एवढं नक्कीच ठाऊक आहे की अंडनलिकेच्या पृष्ठभागावर अगदी लहान लहान केसांप्रमाणे फेलिमेंट असतात. जे बीजांडाला शुक्राणूच्या दिशेने ढकलतात.


विचार करा प्रत्येक शुक्राणू हा दुसऱ्यासोबत त्या बीजांडापर्यंत पोहोचण्यासाठी स्पर्धा करत असतो. सर्वात आधी बीजांडापर्यंत कसं पोहोचता येईल हाच त्या प्रत्येक शुक्राणूचा प्रयत्न असतो. एकंदरीत दैनंदिन आयुष्यात एखाद्या तरूणीला इंप्रेस करण्यासाठी ज्याप्रकारे तरूणांमध्ये स्पर्धा सुरू असते. शरीराच्या आत सुध्दा त्याचप्रकारे क्रीया सुरू असते. तरूणीला इंप्रेस करण्याची गोष्ट असेल तर असं फक्त मनुष्यामध्येच नाही होत. निसर्गाने जवळपास प्रत्येक पशु आणि पक्ष्याला असंच बनवलं आहे की नराला मादीच्या जवळ जाण्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागते. यावर पुन्हा कधी तरी बोलू. तुर्तास तरी आपला स्पर्म कुठपर्यंत पोहोचला आहे हे जाणून घेऊया.

तसं पाहायला गेलो तर अनेक शुक्राणू हे रस्ता भटकतात आणि अंडनलिकेतच अडकुन पडतात. या प्रवासादरम्यान बीजांड एक प्रोस्टाग्लॅंडीस नावाचं रसायन सोडतं. हे रसायन स्पर्म्सना योग्य दिशा दाखवण्याचं कार्य करतं. आता ध्येय जास्त दुर नाहीये. बीजांडाच्या पृष्ठभागावर ग्लाइकोप्रोटीन्स असतात. स्पर्मला फक्त तिथेच स्वतःला जोडून घ्यायचं आहे. आणि आता शेवटचं काम राहिलंय ते म्हणजे पुर्ण जोर लावुन शिर बीजांडात घुसवायचं आहे आणि शेपुट तिथेच बाहेर सोडून द्यायची आहे. एखादा शुक्राणू हे करण्यात यशस्वी झाला की लगेच बीजांड आपल्या पृष्ठभागाला सील म्हणजेच बंद करून टाकतं. एकंदरीत काय तर स्पर्धा संपली. दुसरं, तिसरं, चौथं येणाऱ्यांचं इथे काहीही काम नाहीये. ते बाहेर बसुन आपल्या कामगिरीला शिव्या शाप देऊ शकतात. हे झालं संभोगादरम्यान झालेल्या वीर्यस्खलनाबाबत. हस्तमैथुन म्हणजेच मास्टरबेशन दरम्यानही असंच काहीसं होतं.


हस्तमैथुन चांगलं की वाईट?

चित्रपटात आपण नायकाला एक लहानशी डबी घेउन स्पर्म्स डोनेशनसाठी एका खोलीत जाताना पाहतो. पण यावर मोकळेपणाने बोलण्यासाठी आपण कम्फर्टेबल नसतो. आपणा सर्वांना हस्तमैथुनाबाबत हेच प्रश्न असतात की हे आरोग्यासाठी हानिकारक आहे किंवा याबद्द्लच्या ज्या अफवा आहेत त्या खऱ्या आहेत का ? तर आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधुया आणि जाणून घेऊया हस्तमैथुनाबाबात विज्ञान काय सांगतं. अमेरिकेत झालेल्या सर्वेमध्ये ९३ टक्के पुरूष आणि ८९ टक्के महिलांनी ते हस्तमैथुन करत असल्याचं मान्य केलं आहे. जर्मनीचे आकडे सुध्दा जवळपास सारखेच आहेत. भारतात मात्र असा सर्वे अद्याप झालेला नाही. पण जगातील अधिकतर धर्मांमध्ये याला वाईट कर्म आणि पाप म्हणून संबोधलं गेलं आहे. लोकांना हस्तमैथुनापासून दुर लोटण्यासाठी चित्र विचित्र अफवा पसरवल्या जातात. हस्तमैथुनामुळे कांजण्या होऊ शकतात. हाताला केस येतात किंवा क्षयरोगाची लागण होते. कुणी म्हणतं की यामुळे आपण दृष्टीहिन, कर्णबधिर किंवा वेडे देखील होऊ शकता.


हस्तमैथुनाचे फायदे

विज्ञान आणि शोध या सगळ्या दाव्यांना खोटं ठरवतं. उलट हल्ली केलेले शोध तर असं सांगतात की हस्तमैथुन करणं आरोग्यासाठी चांगलं असतं. यामुळे शरीरात आनंदी हार्मोन्सचं प्रमाण वाढतं. तसंच तणाव नाहीसा होतो. यामुळे हृदयाचे ठोकेही वाढतात ज्यामुळे आपण जास्त कॅलरीज बर्न करता आणि फिट राहता. महिलांना हस्तमैथुन डोकेदुखी आणि पाळीत होणाऱ्या त्रासापासून सुटका करून देतं. याने गळू होण्याचा धोका कमी होतो आणि प्रोस्टेट कॅंसरचा देखील!





काही रिपोर्टस तर असंही सांगतात की आठवड्यातुन २-३ वेळेस हस्तमैथुन केल्याने पुरूषांच्या स्पर्म्सची गुणवत्ता वाढते. आणि जोडीदार जर आपापसांत यावर मोकळेपणाने बोलत असतील तर एकमेकांना आणखी चांगल्या पध्दतीने समजून घेऊ शकतात ज्यामुळे सेक्समध्ये जास्त आनंद मिळू शकतो. पण हा जर याचं रूपांतर व्यसनात झालं आणि आपण याशिवाय दुसऱ्या कशाचा विचारच करू शकत नसाल, जर पॉर्न पाहणं आपला कमकुवतपणा ठरत असेल तर आपल्याला फायदा कमी आणि नुकसानच जास्त होईल. म्हणजेच मुलगा असो वा मुलगी हे कुणासाठीही वाईट नाहीये. पण कोणत्याही गोष्टीची अती वाईटच असते ज्यातून हे सुध्दा सुटलेलं नाही.

तसंही चड्डाजींच्या स्पर्म्स प्रमाणे गेल्या काही काळात आपण या लेखात इतक्या वेळा हस्तमैथुनाचा उल्लेख केला आहे की आपल्याला हा शब्द वाचण्याची सवय झाली असेल. हाच हा लेख लिहिण्यामागचा हेतू आहे की लाज वाटणाऱ्या या महत्वपुर्ण विषयांवर मोकळेपणाने बोललं गेलं पाहिजे.

Updated : 16 Jun 2022 1:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top