Home > हेल्थ > मलेरियाचा प्रादुर्भाव नियंत्रित होण्यास मदत होणार..

मलेरियाचा प्रादुर्भाव नियंत्रित होण्यास मदत होणार..

इको बायो ट्रॅप सापळा नक्की काय आहे? ते कसं काम करेल? मग त्याचं उत्पादन कोण करेल? आणि त्याचा डेंग्यू आजारावर प्रतिबंधक उपाय म्हणून कसा उपयोग होईल?जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा .

मलेरियाचा प्रादुर्भाव नियंत्रित होण्यास मदत होणार..
X

डेंग्यू म्हटलं की अनेकांचा भीतीने थरका उडतो. डासांपासून होणारा डेंग्यू हा आजार किती धोकादायक आहे याचं गांभीर्य आपल्या सर्वांना आहेच. याच गांभीर्यपोटी तुम्ही आपल्या घरात डास होऊ नयेत म्हणून अनेक प्रयत्न देखील करत असाल. तुमच्या ठिकाणी असलेलं स्थानिक प्रशासन सुद्धा वेगवेगळे उपाय यासाठी करत असतात. पण आता मुंबई महानगरपालिकेने एक पाऊल पुढे जात लोकांच्या आरोग्याच्या काळजीपोटी आणखीन एक उपाययोजना राबवण्याचे ठरवलं आहे.इको बायो ट्रॅप सापळ्याच्या माध्यमातून डासांवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रयत्न करणार आहे. इको बायो ट्रॅप सापळा नक्की काय आहे? ते कसं काम करेल? मग त्याचं उत्पादन कोण करेल? आणि त्याचा डेंग्यू आजारावर प्रतिबंधक उपाय म्हणून कसा उपयोग होईल?जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा .

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून डेंग्यू आजारावर नियंत्र ठेवण्यासाठी. शहरात गप्पी माशांचा वापर करुन जीवशास्त्रीय उपाययोजना राबवल्या जातात; त्याचप्रमाणे धूम्रफवारणी, कीटकनाशकांची फवारणी यासारख्या रासायनिक उपाययोजनांची अंमलबजावणी देखील नियमितपणे करण्यात येते. त्याचबरोबर नागरिक देखील आपापल्या स्तरावर विविध उपाययोजना राबवित असतात. याच उपाययोजनांमध्ये आता आणखी एका अभिनव उपाययोजनेची भर पडली आहे, ती म्हणजे ‘इको बायो ट्रॅप’ या सापळ्याची ! या सापळ्याचे उत्पादन करणारी ‘स्टार्ट अप’ संस्था ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील "सोसायटी फॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू एंटरप्रेन्योरशिप (स्माईल) कॉन्सिल" चा भाग आहे. या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे आणि सह आयुक्त अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनानुसार इको बायो ट्रॅपचा पथदर्शी प्रकल्प लवकरच राबविण्यात येणार आहे..

इको बायो ट्रॅप्स कसे काम करते? (full screen text )

‘इको बायो ट्रॅप’ हे १००% पुनर्चक्रीकरण (रिसायकल) केलेल्या पुठ्ठ्यापासून बनवले जातात. या बायो ट्रॅप मध्ये ऍट्रॅक्टंट व कीटकनाशक यांचे मिश्रण असणारी एक छोटी पिशवी असते. डासांची मादी पाण्यात अंडी घालते, ही बाब लक्षात घेऊन या बायो ट्रॅप मध्ये पाणी टाकून ते डासांचा प्रादुर्भाव असणा-या ठिकाणी ठेवले जाते. ट्रॅपमध्ये असणा-या पिशवीतील ऍट्रॅक्टंट व कीटकनाशक (कीटक वाढ नियामक IGR ग्रॅन्युअल) हे पाण्यात तात्काळ मिसळले जातात. ज्यानंतर पाण्यातील ऍट्रॅक्टंटमुळे डासाची मादी या पाण्याकडे आकर्षित होते व पाण्यात अंडी घालते. तर पाण्यात असणारे कीटकनाशक डासांची अंडी नष्ट करते. अशाप्रकारे डासांची अंडीच नष्ट झाल्यामुळे डासांच्या भविष्यातील प्रजोत्पादनास प्रतिबंध होतो व पर्यायाने डासांपासून पसरणा-या आजारांना देखील प्रतिबंध होतो.

‘इको बायो ट्रॅप’ मध्ये असलेले पाणी हे साधारणपणे ४ ते ६ आठवडे साठवून ठेवता येते. याचाच अर्थ डासांच्या प्रजोत्पादनाच्या मुळावरच घाव घालणारा हा सापळा ४ ते ६ आठवडे कार्यरत असतो. विशेष म्हणजे या सापळ्यात वापरण्यात आलेली ऍट्रॅक्टंट व कीटकनाशक ही माणसासाठी सुरक्षित आहेत. त्याचबरोबर डास प्रतिबंधासाठी वापरण्यात येणा-या इतर यंत्रांप्रमाणे या सापळ्यास वीज देखील लागत नाही. याबाबत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डास प्रतिबंधासाठी घरगुती स्तरावर वापरली जाणारी यंत्रे किंवा इतर बाबी या डासांना पळवून लावतात. मात्र, इको बायो ट्रॅप हे डासांची अंडीच नष्ट करत असल्यामुळे डासांच्या प्रजोत्पादनावर नियंत्रण आणते..

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) २०२२ च्या जागतिक मलेरिया अहवालात (www.who.int) २०२१ मध्ये मलेरियाची अंदाजे २४७ दशलक्ष प्रकरणे नोंदवली गेली आणि २०२१ मध्ये जगभरात मलेरियामुळे सुमारे ६ लाख १९ हजार दुर्दैवी मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आता डेंग्यू सारख्या आजारापासून वाचण्यासाठी हा नवीन प्रकल्प अत्यंत उपयुक्त तर ठरेलच पण त्याशिवाय आपण आपल्या पातळीवर देखील उपाययोजना करणं गरजेचं आहे. आपल्या परिसरात डास होणार नाहीत याची काळजी देखील आपण आपल्या स्तरावर घेतली पाहिजे. बाकी मुंबई महानगरपालिका करत असलेला हा नवीन प्रयोग तुम्हाला कसा वाटला? आणि इतर शहरांमध्ये देखील अशा इको बायो ट्रेक सारखा प्रकल्प राबवून गरजेचा आहे का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ? तुमचा प्रतिसाद नक्की कळवा .

Updated : 26 April 2023 7:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top