Home > हेल्थ > Corona Virus: बचावासाठी काय करावे आणि काय नाही?

Corona Virus: बचावासाठी काय करावे आणि काय नाही?

Corona Virus: बचावासाठी काय करावे आणि काय नाही?
X

एखाद्या नवीन विषाणूचा जेंव्हा मानवजातीला संसर्ग होतो तेंव्हा त्याची संसर्गक्षमता, त्याचे विविध अवयवसंस्थांवरती होणारे परिणाम,विषाणूला आवडणारे वयोगट, त्यावरती लागू पडणारे औषध किंवा संसर्गाला रोखू शकणारी लस,या आणि अश्या सर्व बाबी लक्षात येईपर्यंत काही वेळ जातो.

डॉक्टर्स, जैवशास्त्रज्ञ आपले जीव धोक्यात घालून, अश्या विषाणूंना हाताळत हे संशोधन करत असतातच. त्यांच्या धैर्याचे करावे तितके कौतुक कमीच आणि मानवजातीसाठी त्यांच्या समर्पणाचे मानावे तितके आभार कमीच आहेत. पण, आपण सामान्य जनतेनेही या जागतिक संकटात सध्या आपल्या कर्तव्याचे काटेकोर पालन केले पाहिजे. चीनसारख्या काटेकोर व्यवस्था असलेल्या देशात या विषाणूने थैमान घातले. आपल्या बेशिस्त देशात जर हा विषाणू पसरला तर आरोग्य व्यवस्थेला तो आटोक्यात आणणे महाकठीण होईल.

पहिली गोष्ट अगदी गरजेचे असेल तरच बाहेर पडा.

कित्येक जण लक्षणं दिसत नसली तरी बाधित असू शकतात आणि इतरत्र विषाणू पसरवू शकतात.

मी कित्येक असे लोक पाहिले ज्यांना कोरोना नावाचा जहाल विषाणू पसरत आहे याची कल्पना असूनही त्यांनी त्यांच्या सहली रद्द केल्या नाहीत.

होळी सेलिब्रेशन्स सुद्धा गर्दीमध्ये बिनधास्त सुरू असलेले दिसले.

विमानतळावर जेंव्हा स्क्रिनिंग सुरू असते, किंवा संशयितांना वेगळे ठेवले जाते तेंव्हा आपण सहकार्य करायला हवे.

आपल्याला श्वसनमार्गाचा कोणताही जंतुसंसर्ग असेल तर सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळायला हवे.

नेहमीच हात वारंवार धुण्याची सवय ठेवा. शक्य नसेल तरी कमीत कमी सॅनिटायझर वापरा.

सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी रेलिंग्स, कठडे, दरवाजाचे हँडल्स, कडीकोयंडे यांना स्पर्श करणे टाळा.

नाकातोंडावर रुमाल किंवा मास्क वापरा.

मांस नीट शिजवुनच खा.

लसूण खाऊन, तुळस खाऊन, कापूर जाळून ह्या विषाणू पासून संरक्षण होते अश्या उडत उडत कानावर(व्हॉट्सअप द्वारे बऱ्याचदा) आलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवून गाफील राहू नका.

अत्यंत भयभीत होऊन जाण्याची गरज नाही पण आपल्या आप्तजनांच्या सुरक्षिततेसाठी अखंड सावध मात्र राहण्याची गरज आहे.

कोरोनाचा संसर्ग झालाच तरीही काही सर्वच्या सर्व रुग्णांचा मृत्यू होत नाही. बरेचसे जण वेळेत आणि योग्य औषध उपचारांनी बरेही होतात हे ध्यानात घ्या.

या विषाणूला सुद्धा आपण सर्वजण मिळून नक्कीच नामोहरम करूच..

पण जेव्हा ही साथ आटोक्यात येईल तेंव्हा कोरोनासारख्या लगेच संसर्ग करू शकणाऱ्या विषाणूचा कोणताही रुग्ण कोणत्याही क्षणी आपल्याकडे येऊ शकतो आणि त्याच्या संपर्कात आल्याने आपल्यालाही त्याचा संसर्ग होऊ शकतो हे माहीत असूनही दवाखाने बंद न करता आपले सामाजिक कर्तव्य पार पडणाऱ्या डॉक्टर मंडळींचे आभार मानायला विसरू नका हं...

तीन चार वर्षांपूर्वी स्वाईन फ्लूने थैमान घातले होते तेंव्हाही आमच्यातील बऱ्याच डॉक्टर मंडळींनी स्वतःला संसर्ग होईतोपर्यंत आपले कर्तव्य पार पडले होते. काळजी घ्या.

पंधरा दिवस ते एक महिना जर आपण अनावश्यक, टाळता येण्यासारखे , पुढे ढकलता येण्यासारखे सोशल गॅदरिंग्स, मेळावे, मीटिंग्स टाळले तर विषाणूच्या पसरण्याला काही प्रमाणात प्रतिबंध करण्यास हातभार लावू शकतो.

(उदाहरणार्थ गावोगावी आता जत्रा यात्रा सुरू होत आहेत)

कारण काही कार्यक्रम आपण नंतर करू शकतोच.

शेवटी प्रत्येकाचाच जीव महत्वाचा आहे.

सिर सलामत तो पगडी पचास! नाही का?

डॉ साधना पवार

Updated : 11 March 2020 12:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top