कोरोना काही प्रश्न, समज व गैरसमज
X
करोनाबद्दल आपण इतके वाचत, ऐकत असतो की नाही म्हटलं तरी या रोगाबद्दल आपल्या मनात एक भीती बसते. मी व माझे पती सुधीर अशा आम्हा दोघांना एकदमच करोनाची लागण झाली. मात्र देवाची कृपा आणि आमच्या डॉक्टरांचे कौशल्य यामुळे तो करोना आहे हे कळायच्या आधीच आम्ही यातून बाहेर पडलो होतो. मात्र या काळात आलेले काही बरे- वाईट अनुभव खूप समृद्ध करून गेले हे निश्चित! आणखीही एक जाणवलं की या रोगाबद्दल इतकी जन जागृती माध्यमांतून चालू असून सुद्धा या बाबत गैरसमज खूप आहेत. हे लिहिण्याचे एक प्रयोजन तेही आहे.
१७ जून रोजी मला अचानक दिवसभर खूप ढेकर आले. तेव्हा माझा एक योगाचा ऑनलाईन कोर्स चालू होता. त्यामुळे मला वाटले की आपले काही तरी चुकले असावे म्हणून हा त्रास होतो आहे. दिवस तसाच पार पडला. रात्री मला व माझे पती सुधीर या दोघांनाही अचानक सर्दीचा अॅटॅक आल्यासारखे झाले. आम्ही घरगुती उपाय केले. पण तो त्रास कमी झालाच नाही. उलट प्रचंड अंगदुखी चालू झाली. गुरुवारीही तीच तऱ्हा. एव्हाना सुधीरची सर्दी खोकल्यात परिवर्तीत झाली होती तर मला गुरुवारी दुपारी अचानक २ पर्यंत ताप चढला. मला वाटले अपचन आणि शीण एकत्र साचून आल्याने ताप आला. मी लॉकडाऊन सुरु झाल्यापासून घराबाहेरच पडलेली नसल्याने करोनाची शंका सुद्धा माझ्या मनात आली नाही. सुधीरही बँक वा तत्सम कार्यालयांतच...आणि तोही क्वचितच जात होता. एकदाच फक्त तो मोठ्या मार्केटला गेला होता. त्यामुळे त्यालाही हा खोकला हवा बदलामुळे आला असावा असेच वाटले. त्यात आम्ही घरात व बाहेर सगळ्या दक्षता पाळत होतो. त्यामुळे करोनाच्या शक्यतेवर आम्ही फुलीच मारली होती. आमचा मुलगा आदित्य मात्र कोणतीही ‘रिस्क’ घ्यायला तयार नव्हता.
आमच्या घराशेजारीच प्रख्यात हार्ट सर्जन डॉ अनिल तांबे यांचे हॉस्पिटल आहे. तो मला तिथे घेऊन गेला. डॉक्टरांनी ७ दिवसांचा कोर्स दिला व त्याने जर बरे वाटले नाही तर करोनाची टेस्ट करावी लागेल असे सांगितले आणि करोनाची टांगती तलवार माझ्या मानेवर लटकायला लागली. सुधीरचा सगळा भर कमीत कमी औषधे घेणे यावर असतो. शरीरात नैसर्गिकरित्या बरे होण्याची शक्ती असते यावर त्याचा दृढ विश्वास. त्यामुळे त्याने ४ दिवस अंगावर काढले. मात्र प्रचंड व सततच्या खोकल्याने त्याची होणारी अवस्था बघवत नव्हती. अखेर त्यालाही डॉक्टरकडे जाण्यास आम्ही भाग पाडले. डॉक्टरांनी औषध तर दिले. पण त्याला बरे वाटेना. शेवटी २७ तारखेला त्यांनी त्याचे औषध बदलून दिले पण तातडीने करोनाची टेस्ट करायला सांगितली. ठाण्यातच कॅडबरी जंक्शनच्या फ्लाय ओव्हरच्या खाली असलेल्या तपासणी केंद्रावर जाऊन त्याने शनिवारी २७ जूनला टेस्ट केली. सोमवारी दुपारी महापालिकेतून फोन आला की सुधीरची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.
मात्र ठाणे महापालिकेचे खरोखर कौतुक करायला हवे इतका चांगला अनुभव आम्हाला आला. घरातच क्वारंटाइन होण्यासारखी स्थिती आहे की नाही ते त्यांनी आदित्यला विचारले. ती स्थिती आहे हे समजल्यावर घरातच क्वारंटाइन करताना काय काय खबरदारी घ्यायची याचे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी आमच्या आदित्यला केले व तेवढ्यावरच न थांबता सुधीरला महापालिकेने घरपोच एक कफ सिरप दिला तर आदित्यला करोना होऊ नये म्हणून सहा टॅबलेट्स दिल्या!
मी तोवर बरी झाले होते. फक्त थोडी सर्दी होती. मात्र सुधीरची टेस्ट पॉझिटीव्ह आल्यावर सोमवारीच मी जाऊन टेस्ट करून आले. माझ्याही टेस्टचा रिझल्ट बुधवारी पॉझिटीव्ह आला आणि मी दुसऱ्या बेडरुममध्ये क्वारंटाइन झाले. मला काहीच लक्षणे नसल्याने पालिकेतर्फे मला फक्त बिकॉस्युल झेड आणि सी व्हिटामिन च्या गोळ्या खाण्यास सांगण्यात आले .
मात्र पालिका तेवढेच करून थांबली नाही. त्यांनी सोसायटीच्या दारावर येथे करोना पेशंट आढळल्याचे नमूद करणारा फ्लेक्स तर लावलाच. पण पूर्ण सोसायटीत निर्जंतुकीकरण केले. सोसायटीला एक सॅनीटायझर पंप भेट दिला आणि तेवढ्यावरच न थांबता वारंवार आम्हाला काही हवे आहे का याची चौकशी केली. अगदी ‘मेडिकल वेस्ट’ची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावली जाते आहे की नाही याचीही चौकशी केली. आमच्याकडे ‘मेडिकल वेस्ट’ तयारच होत नाहीय असे आदित्यने सांगितल्यावर सुद्धा त्यांनी त्यासाठी एक पिवळ्या रंगाची कचऱ्याची पिशवी देण्याची तयारी दर्शवली. मात्र तेवढ्यात ठाण्यात पूर्ण लॉक डाऊन जारी झाला आणि ते राहिले. त्याची आम्हाला तशीही गरज नव्हतीच. पोलिसांचेही फोन आले. त्यांनीही चौकशी केली आणि आमच्याकडे करोना रुग्ण आढळल्याने सोसायटीत कुणी त्रास दिला तर त्याची तक्रार करण्याचेही त्यांनी सांगितले. आम्हाला कुणी तसा त्रास दिल्यास त्याला थेट आत टाकले जाईल असेही त्यांनी सांगितले.
हा सगळा अनुभव खूप सुखद होता. आपण कायम प्रशासनावर टीका करतो. सध्या तर रुग्ण गायब होणे, भलत्याच माणसाचा मृतदेह मयत म्हणून नातेवाईकाच्या स्वाधीन करणे अशा असंख्य घोळांमुळे ठाणे महापालिकेचा कारभार फारच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पण आम्हाला अनुभवाला आलेले हे रूप आश्वासक होते
मात्र आम्ही जरी पोलिसांत तक्रार केली नाही तरी आमच्या सोसायटीत काही जणांकडून आम्हाला वाळीत टाकण्यासारखे अनुभव आले. आमच्याकडचा कचरा न उचलणे, आम्ही जेवणाचा डबा लावला, पण त्याला आत न येऊ देणे असे काही प्रकार घडले. मात्र संबंधितांशी बोलल्यावर सगळे सुरळीत झाले. यात कुणावरही राग नाही. पण अज्ञानातून हे प्रकार सर्वत्र, सर्रास घडत आहेत म्हणून लिहावेसे वाटले
काही प्रश्न व गैरसमज
१] एक सार्वत्रिक प्रश्न येत होता की तुम्हाला कुठे झाला संसर्ग? या सारखा मूर्ख प्रश्न नाही असे मला वाटते. कारण हे जर माहित असते तर टाळता आले नसते का? करोनाचा रुग्ण वा वाहक कपाळावर तसे लेबल लावून फिरत असतो का?
२] हा विषाणू फक्त आणि फक्त डोळे, नाक व तोंडातून आत जाऊ शकतो. त्यामुळे कचरा न उचलणे, डबेवाल्याला आत न येऊ देणे वा काही सोसायट्यांमध्ये करोनामुक्त झालेल्या सभासदांनाही लिफ्ट वापरु न देणे वा त्यांना त्यांच्याच घरात विलगीकरण करू न देणे या सारखे जे प्रकार घडतायत ते निदान सुशिक्षितांना तरी शोभेसे नाहीत
३] सध्या सर्दी -खोकला व तापाचा सीझन असल्याने प्रत्येकाला करोनाची भीतीच मनात येते. आता मुंबईत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय करोनाची टेस्ट करायची परवानगी दिली असली तरी ठाण्यात निदान आम्ही केली तेव्हा तरी ती नव्हती. त्यामुळे आपल्याला थोडी जरी शंका आली तरी घरगुती उपचार करत वेळ न काढता डॉक्टरांकडे जाणे हे उचित
४] टेस्ट करताना दुखतं का? ---तर अजिबात दुखत नाही. एक काचेची काडी एका नाकपुडीतून आत घालून स्वॅब घेतला जातो
५] खर्च किती येतो? ---आम्हाला प्रत्येकी २८००/- इतकाच खर्च आला .
६] रिपोर्ट कधी मिळतो? -सध्या ठाण्यात त्याही बाबतीत अनेकांना मनस्तापदायी अनुभव येत असल्याच्या बातम्या असल्या तरी सर्व साधारणपणे तो रिपोर्ट २ दिवसांनी मिळतो. तो लॅबकडून महापालिकेला कळवला जातो आणि तिथून आपल्याला फोन येतो
७] आम्हाला चांगला अनुभव आला कारण मी पत्रकार आहे असाही अंदाज काहींनी व्यक्त केला. ---हे अजिबात बरोबर नाही. कारण आपण टेस्ट करताना जो फॉर्म भरून देतो त्यात कुठेही आपला व्यवसाय दिलेला नसतो. दुसरे म्हणजे संपर्क क्रमांक मुलाचा दिलेला असल्याने त्याचे आई –बाबा म्हणूनच आमच्याकडे बघितले जात होते व त्याला त्या संबंधात पालिकेतर्फे सतत मार्गदर्शन केले जात होते. अन्य सगळ्यांच्या बाबतीत सुद्धा हे केले जात असावे असा माझा अंदाज आहे
८]होम क्वारंटाइन---ज्यांच्या घरात रुग्णाला स्वतंत्रपणे म्हणजे इतरांना संसर्ग न होता विलगीकारणात ठेवण्याची सोय आहे अशा सर्वांनाच तसेच ठेवले जाते. याही बाबतीत आमच्यासाठी काही खास अपवाद केला गेला होता असे अजिबात नाही
थोडक्यात सांगायचं तर आपली रोग प्रतिकार क्षमता चांगली असेल, आणि आपण तातडीने डॉक्टरकडे गेलो तर करोना आपले काही वाकडे करु शकत नाही!
या सगळ्या काळात एक अतिशय सुखद अनुभव आम्हाला दिला तो आमच्या आदित्यने! तो एकूणच या सगळ्या काळात आमची आई झाला होता. त्याने खूप केलं....आम्ही फार लवकर बरे झालो याचं फार मोठं श्रेय त्याला जातं! सर्वात मोठं श्रेय तर अर्थातच डॉक्टर तांबे यांचं!
प्रत्येक अनुभवाला एक रुपेरी किनार असतेच! नाही का? फक्त ती बघण्याची दृष्टी आपल्यालाच विकसित करावी लागते!
- जयश्री देसाई
लेखीका जेष्ठ महिला पत्रकार आहेत...