Home > हेल्थ > मिरचीचा ठेचा खाऊन कंटाळलात मग हा चिंचेचा ठेचा एकदा ट्राय कराच….

मिरचीचा ठेचा खाऊन कंटाळलात मग हा चिंचेचा ठेचा एकदा ट्राय कराच….

मिरचीचा ठेचा खाऊन कंटाळलात मग हा चिंचेचा ठेचा एकदा ट्राय कराच….
X

आजपर्यंत आपण शेंगदाण्याचा, मिरचीचा ठेची खाल्ला असेल. फार फार तर पुदिन्याची चटणी चाखली असेल. या चटण्या आणि खरडा खाऊन कंटाळा असेल तर ही रेसिपी नक्की वाचा आणि घरी एकदा बनवून पहाच. चिंचेचं नुसतं नाव काढलं तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं. मग याच चिंचेचा जर ठेचा केला तर? नुसत्या विचारांनीच तोंडाला पाणी सुटलंय ना.... मग ही रेसिपी आपल्यासाठीच आहे.

सध्या हळू हळू गुलाबी थंडी पडू लागली आहे. याच काळात हिरव्यागार चिंचांचा जबरदस्त सिझन सुरू होतो. याच दिवसांमध्ये आपण कुठे बाहेर फिरायला गेलो की प्रवासात चिंचांनी भरलेली झाडं दिसू लागतात. पिकलेल्यांपेक्षा हिरव्या गार चिंचा मीठ लावून खाण्याचा आनंद तर निराळाच. पण जास्त चिंचा खाल्ल्याने दात लगेचच आंबतात. यामुळेच चिंचा खाण्याचा आनंदही मिळावा आणि चवीत थोडा बदलही व्हावा म्हणून हा हिरव्या चिंचेचा हा चटपटीत ठेचा आपल्यसाठी...

या ठेच्यासाठी लागणारे साहित्य

हिरव्यागार चिंचा, (पिकलेल्या चिंचा या रेसिपीसाठी वापरू नयेत. अगदी हिरव्याकच्च चिंचा वापराव्या), हिरव्या मिरच्या, जिरे, गूळ, मीठ,फोडणीसाठी तेल, हिंग आणि मोहरी.

कसा बनवायचा चिंचेचा ठेचा

- हा ठेचा बनवण्यासाठी सर्वात आधी हिरव्या चिंचा आणि हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घ्या.

- धुतल्यानंतर चिंचा आणि मिरच्या दोन्ही चांगल्या प्रकारे कोरड्या होऊ द्या. कारण यात जर पाणी राहिलं, तर ठेचा लवकर खराब होण्याची शक्यता अधिक आहे.

- जितक्या प्रमाणात हिरव्या चिंचा घेतल्या असतील तितक्याच प्रमाणात हिरव्या मिरच्यादेखील घ्या. ठेचा उत्तम होण्यासाठी मिरच्या आणि चिंचेचं प्रणाण सारखंच हवं.

- मिरच्या आणि चिंचा यांचे प्रत्येकी एक - एक वाटी भरून लहान - लहान तुकडे करून घ्या.

- मिरच्या, चिंचा, अर्धी वाटी गुळ, जिरे आणि चवीनुसार मीठ हे सगळं साहित्य एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्या.

- यानंतर हा ठेचा एका वाटीमध्ये काढा.

- कढईत फोडणी करण्यासाठी तेल गरम करा. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडली की थोडसं हिंग टाका.

- तयार केलेल्या ठेच्यामध्ये ही फोडणी वरतून घाला.

- चपाती, भाकरी, थालीपीट, धपाटे, घावणे, डोसा यांच्यासोबत तोंडी लावायला हा ठेचा खूपच छान लागतो.

- जेवणात जशी तुम्ही चटणी घेता तसा चटणीप्रमाणे तोंडी लावायला ठेचा खाऊ शकता.

- व्यवस्थित घट्ट झाकण असलेल्या काचेच्या बरणीत हा ठेचा भरून फ्रिजमध्ये ठेवला तर तो ८ दिवस तरी चांगला टिकतो. त्यामुळे करताना खूप जास्त ठेचा करू नका. जास्तीतजास्त ८ दिवस खाता येईल या प्रमाणातच करा.

हे आहेत हिरवी चिंच खाण्याचे फायदे...

१. चिंचेमध्ये फायबर, टार्टेरिक ॲसिड, पोटॅशियम हे घटक मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे हिरवी चिंच खाल्ल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

२. दिवाळीचा फराळ अजीर्ण झाला असेल, तर हा चिंचेचा ठेचा त्यासाठी चांगला उतारा ठरू शकतो. कारण हिरव्या चिंचेमुळे पोट साफ होते. तसेच ॲसिडिटीचा त्रास कमी होतो.

३. हा ठेचा बनविताना आपण त्यात मोठ्या प्रमाणात गुळ घालतो. गुळ असल्यामुळे शरीरातील लोह पातळी वाढविण्यास हा ठेचा उपयुक्त ठरतो.

४. हिरव्या चिंचेच्या सेवनामुळे केसांचे आरोग्य सुधारते. केस मजबूत आणि लांब होण्यास मदत होते.

५. मज्जासंस्थेचे कार्य सुधारण्यासाठी आणि हृदयाचे कार्य नियंत्रित ठेवण्यासाठी हिरवी चिंच खाणे उपयुक्त ठरते.

६. मधुमेहींसाठी देखील हिरवी चिंच उपयुक्त आहे. शिवाय या ठेच्यात आपण गुळ टाकत असल्याने मधुमेह असणारे लोकही या चिंंचेच्या ठेच्याचा आस्वाद घेऊ शकतात.

Updated : 15 Nov 2021 10:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top