Home > हेल्थ > कोरोनाच्या संकटात अंगणवाडी सेविकेमुळे मिळाला गरोदर मातेला पुर्नजन्म

कोरोनाच्या संकटात अंगणवाडी सेविकेमुळे मिळाला गरोदर मातेला पुर्नजन्म

कोरोनाच्या संकटात अंगणवाडी सेविकेमुळे मिळाला गरोदर मातेला पुर्नजन्म
X

कोरोनाच्या लढ्यात मोलाचं योगदान देणाऱ्या कोविड योद्ध्यांचा सरकार सन्मान करत आहे. पण या संकटात नागरिकांच्या मदतीसाठी धावून आलेल्या गावोगावच्या आंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांच्या कामाची हवी तशी दखल अजून तरी सरकारने घेतली नाही. अनेक गावामध्ये आपलं कर्तव्य चोख पार पाडणाऱ्या सेविकांनी माणुसकीचे धडेच दिले आहेत. पनवेलच्या आपटा तालुक्यातील अंगणवाडी सेविका अलका अनंत कांबळे यापैकीच एक..

आपल्या गावाला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी अलका कांबळे यांनी कंबर कसली. पीपीई किट नाही तरीही तोंडाला मास्क किंवा स्कार्फ बांधून गावातील प्रत्येक घर पालथं घालून लोकांच्या आरोग्याची पाहणी त्या करत आहेत. असंच एकदा गावात नियमित गृहभेटी करत असताना मंगल सुनील सीद या गरोदर महिलेच्या घरी त्या गेल्या. मंगल यांना प्रसूती वेदना सुरु असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन कांबळे यांनी तात्काळ ऑटोरिक्षा बोलाविली आणि आशा वर्कर सुनिता रमेश जोशी यांना सोबतीला घेऊन मंगल यांना तात्काळ आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

पुढील काही वेळातच आपटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका चव्हाण आणि नेहा गांगुर्डे तसेच आरोग्य पर्यवेक्षिका नमिता पाटील, आरोग्य सेविका कल्पना वैष्णव यांनी मंगल यांची वैद्यकीय तपासणी केली व त्यांची यशस्वी नैसर्गिक प्रसूती केली.

मंगल सीद यांची नैसर्गिक प्रसूती होवून त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळ व माता दोघांचीही तब्येत छान आहे. कोरोना विषाणूच्या या संकट काळात सबंध जग हे विलक्षण ताणतणावात असूनही रायगड जिल्ह्यातील या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका व आरोग्य पर्यवेक्षिका यांनी स्वतःच्या कर्तव्याची जाण ठेवून प्रसंगावधान दाखवून एका गरोदर महिलेस एक प्रकारे पुनर्जन्मच दिला आहे.

Updated : 10 April 2020 12:43 AM GMT
Next Story
Share it
Top