‘आता तरी 2 लाखाचा विमा द्या’ 56 वर्षीय स्वच्छता कर्मचारी आजींची मागणी

Update: 2020-08-19 07:30 GMT

“कोरोना काळात आम्ही घरोघरी जाऊन कचरा गोळा केलाय. आमच्या काही सहकाऱ्यांचा या कोरोनामुळे मृत्युही झालाय. त्यामुळे सरकारने जाहीर केल्या प्रमाणे आम्हाला दोन लाखांचा विमा मिळायलाच हवा.” ही मागणी आहे पुण्याचा 56 वर्षीय सफाई कामगार आजींची. सुरभी वाघमारे असं या आजींचं नाव असून त्या पुणे महानगरपालिकेत ‘स्वच्छ’ या संस्थेतंर्गत काम करतात.

‘स्वच्छ सेविकांसाठी असलेली विमा योजना पुन्हा सुरू करावी’ या मागण्यासाठी पुणे महानगरपालिका भवना समोर स्वच्छ सेविकांनी थाळी बाजाव आंदोलन केले. प्रोत्साहन भत्ता, कचरा गोळा करण्याचा दर काही महिन्यांसाठी वाढवण्यात यावा, सर्व कर्मचाऱ्यांना विमा सरंक्षण द्यावं अशा या संस्थेच्या मागण्या आहेत.

संपुर्ण पुणे शहरात तीन हजार पेक्षा जास्त महिला दारोदारी जाउन कचरा गोळा करतात. या महिलांना अत्यंत कमी सेवाशुल्क मिळते, शिवाय कोणतीही सुरक्षा नसल्याने या महिलांनी आज महापौर मुरलीधर मोहोळ आणि पालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन देण्यात आलं.

“कचरा उचलत असताना अनेकांना करोना लागण झाली तरीही आम्ही शहर स्वच्छ ठेवण्याचा काम केलंय. कोरोनामुळे उत्पन्न घटलं आहे. कचऱ्यातून मिळणारे कागद, पत्रा, प्लास्टिक सारख्या वस्तु विकून काही हातभार लागायचा परंतु कचऱ्यातून या वस्तू गायब झाल्याने ते उत्पन्नही घटलं आहे. तेव्हा आम्हाला आता तरी मागची 4 वर्ष कागदोपत्री अडकलेला विमा देण्यात यावा.” अशी मागणी या महिलांनी केली आहे.

दरम्यान, पुणे शहरात साडे आठ हजार महिला स्वच्छता कर्मचारी असून ‘स्वच्छ’ या संस्थेतंर्गत साडे तीन हजार महिला काम करतात. या महिला पुण्यातील घराघरांत जाऊन कचरा गोळा करण्याचं काम करतात.

पाहा हा व्हिडीओ...

https://youtu.be/WIcMAAg-TbA

Similar News