भारतीय महिलांचा विश्वचषकात धुरळा! वेस्ट इंडिजला हरवत झाल्या टेबलटॉपर

Update: 2022-03-13 06:08 GMT

भारतीय महिला संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२२ च्या तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाचा 155 धावांनी पराभव केला. या बलाढ्य विजयामुळे भारतीय संघाचा नेट रनरेट इतका वाढला कि संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. भारत, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजचे 3 सामन्यांनंतर 2 सामने जिंकून 4 गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचेही दोन सामन्यांत दोन विजयांसह 4 गुण आहेत. चांगल्या रनरेटमुळे भारतीय संघ अव्वल स्थानावर आला आहे.

वेस्ट इंडिजवर भारताच्या विजयानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या तर न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा रन रेट +1.061 आहे आणि न्यूझीलंडचा रन रेट +0.799 आहे.


भारताने वेस्ट इंडिजसमोर 318 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर वेस्ट इंडिज संघ 10 षटकांत 100 धावा चांगली सुरूवात करूनही 40 षटकात 162 धावाच करू शकला आणि त्यांनी सामना गमावला. डिआंड्रा डॉटिनने (62) सर्वाधिक धावा केल्या. भारताकडून स्नेह राणाने सर्वाधिक ३ बळी घेतले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने 8 गडी गमावून 317 धावा केल्या होत्या. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना या भारताच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. स्मृती मंधानाने 119 चेंडूत 123 धावा केल्या. तर हरमनप्रीतच्या बॅटमधून 109 धावा तळपल्या.

भारताची पुढची लढत इंग्लंडविरुद्ध

भारताची पुढची लढत 16 मार्चला इंग्लंडविरुद्ध आहे. यंदा विश्वचषकात इंग्लंडची आतापर्यंतची कामगिरी काही विशेष झालेली नाही. आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडला ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने 12 धावांनी तर वेस्ट इंडिजने 7 धावांनी इंग्लंडचा पराभव केला. दुसरीकडे, इंग्लंडला 14 मार्चला दक्षिण आफ्रिकेशी सामना करायचा आहे आणि 16 मार्चला चौथा सामना भारताविरुद्ध खेळायचा आहे.

Tags:    

Similar News