जगभरात कळणारी सार्वत्रिक भाषा म्हणजे प्रेम. ती पोचवण्याचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे स्पर्श. माझा स्वतःचा ह्या भाषेवर आणि माध्यमावर फार विश्वास आहे..सध्या गेल्या काही दिवसात तो अधिकाधिक दृढ होत चालला आहे. दुर्दैवाने आपल्याकडे स्पर्शाला फार मोकळेपणा माहिती नाही. माझी जिव्हाळ्याची सखी वैशु (वैशाली पंडित) ने काही वर्षापूर्वी ह्याबद्दल खूप छान लिहिले होते. खरंतर आधी ती मला ह्या लेखातून भेटली मग खरोखरी भेटली. स्पर्शतृष्णा हा तिचा लेख वाचतानाच मला जाणवलं की माझ्या तिच्यात एक समान धागा आहे.
संवेदनशील मन असणाऱ्या प्रत्येकाला ही भाषा सहज कळते. माणसांनाच काय प्राण्यांना सुद्धा!
गेल्या नऊ वर्षात अल्झायमर झालेले माझे बाबा वर्षागणिक खाली खाली येत गेले. हळू हळू एकेक गोष्टी गळत गेल्या. घड्याळ, काळ, वर्ष यानंतर नावं, रस्ते ह्यांच्या ओळखी पुसत गेल्या. कालांतराने आधी थोडे लांबचे लोक मग एकेक जवळची व्यक्ती असे करत करत मग आम्ही बहिणी नंतर आई असे सगळेच त्या अनोळखी पटलावरती आलो. हा प्रवास फारच वेदनादायक होता.
पप्पा आणि मी एक जोडगोळी होतो. खूप गोष्टी आम्ही एकत्र केल्या. आपल्या अत्यंत आवडत्या व्यक्तीच्या स्मृतीतून तिलाही फार प्रिय असलेले आपण पुसले जाणे ह्याचे दुःख शब्दात मांडता येण्याजोगे नाही. तसेही ते जे काही जगले , ते एखादा संत सज्जन माणूस जगावेत असेच आयुष्य जगले. त्यात काही कमी असू नये म्हणून देवाने अल्झायमर देऊन त्यांची राग,लोभ, मोह अशा विकारांपासून सुटका केली असावी.
गेल्या पंधरा दिवसात ते तब्येतीने अगदीच आत आले. आधी पाच वर्षाचे बाळ, मग दोन वर्षाचे आणि आता काही महिन्यांचे बाळ अशी त्यांची प्रगती आहे. मग बाळाचे लाड करणे ओघाने आलेच. त्यांच्या सुरकुतलेल्या गालावरून हात फिरवताना, त्यांचे लाड करताना त्यांच्या चेहेऱ्यावर आणि डोळ्यात जे काही दिसते आहे ते इतके काही सुंदर, लाघवी आहे की परत परत त्यांचे लाड करावेसे वाटतात. गेले काही वर्ष ते आमची ओळख विसरले आहेत पण मला वाटतं की लहानपणी आम्ही त्यांना जसे बिलगायचो , त्यांच्या कुशीत जायचो, त्यांच्याकडून लाड करून घ्यायचो ते स्पर्श त्यांच्या स्मरणात खोलवर कुठेतरी असावेतच. आतमध्ये त्यांना त्या सगळ्याची खूण पटते आहे.
आम्हाला ते हीमगौरी आणि सात बुटक्यांची गोष्ट अगदी रंगवून सांगायचे. ज्यावेळी ते बुटके येतात तो प्रसंग सांगताना झिम्प्पाक झिम्प्पाक असा कुठलातरी अगम्य भाषेतला शब्द गाऊन ते त्याचे वर्णन सांगायचे. आजही आमच्या डोळ्यांसमोर ती गोष्ट आम्ही चित्ररूपात पाहू शकतो.
आता अशा अनेक छोट्या छोट्या आठवणी आम्ही त्यांना ऐकवत आहोत. त्यांची आवडती गाणी म्हणत आहोत. लांब नोकरीवर असलेली नातवंड , लेक ह्यांना व्हिडिओ कॉल वर घेऊन गप्पा मारतो आहोत. थोडंसं पाणी गिळताना सुद्धा त्रास होतोय त्यांना..पण आम्ही जवळ घेतल्यावर मात्र कष्टाने हात उचलून ते आम्हाला थोपटतात. सदैव हसऱ्या असलेल्या चेहेऱ्यावर सध्या खूप वेळा सतत दिसत असलेला थकवा, वेदना त्यावेळी गायब होतात आणि एक असीम समाधान त्यांच्या चेहेऱ्यावर भरून उरतं. अशावेळी त्यांच्याशी बोलताना आम्ही त्यांना विचारत असलेल्या प्रश्नाची त्यांनी आश्चर्यकारक रित्या जमतील तशी उत्तरं दिली आहेत. कधी बोलायचा प्रयत्न करून.. तर कधी मानेने, डोळ्यांनी खुणावून...अत्यंतलॉजिकल अशी उत्तरं! फक्त स्पर्शाने शब्देवीण संवादू सुरू आहे. आजवर सुद्धा आम्ही जेव्हा कधी त्यांना भेटत होतो त्यावेळी अजूनही त्यांच्या कुशीत जात होतोच पण आता संवादाकरिता इतकेच माध्यम ज्यावेळी राहते आहे त्यावेळी त्याची ताकद आणि परिणामकारकता दोन्ही कळते आहे.
समाजमान्य नियमांच्या प्रचलित चौकटी, सहज उपलब्ध असणारी संवादाची, खरंतर फारसा चांगला संवाद न घडवणारी साधने, त्याद्वारे सतत पोचवले जाणारे miss you, love you, take care असे गुळगुळीत झालेले निरोप दुधाची तहान ताकावर भागवत असतीलही परंतु त्यामुळे वेळ भागते, मन भरत नाही..छोट्या बाळाच्या गालावरून हात फिरवून, मैत्रिणीच्या गळ्यात पडून ,आई बाबाच्या कुशीत शिरून जे मनात उमटतं ते सगळं व्यक्त करायला शब्द खरोखर असमर्थ आहेत.
स्पर्श चांगले असतात. तुमच्या अंतरंगातलं प्रतिबिंब असतात ते! एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटून केलेला शेकहॅण्ड त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल बरंच बोलू शकतो. एखाद्या बऱ्या वाईट प्रसंगात एखाद्या मित्र मैत्रीणीने नुसता हात हातात घेतला किंवा खांद्यावर हात ठेवला तरी सगळं सगळं कळतं. प्रेमळ स्पर्शा इतकी सहज आणि त्या इतकी मौल्यवान भेट असू शकत नाही.
माझ्या संपर्कातील खारके सारखी सुरकुतलेली आणि गोड असलेली एक आजी मी एखादी छान साडी नेसले की मायेने चेहऱ्यावरून हात फिरवून कानशिलावर बोटं मोडत असे..तो खरखरीत तरीही आत्यंतिक मायाळू स्पर्श आजही मनात आहे.
कुठल्यातरी अनामिक संकोचाने असे मायेचे स्पर्श टाळू नयेत. मायेने मारलेली घट्ट मिठी कदाचित एखाद्या मैत्रिणीला निराशेतून आशेचा किरण दाखवेल. आई बाबांच्या कुशीत शिरल्यावर त्यांना भूतकाळातील आठवणींची सहल घडेल. त्यांचे आयुष्य दहा वर्षांनी वाढेल. आपल्याला परत लहान होता येईल.
हे लिहिण्याचे कारण... आपल्या रोजच्या धावपळीतून काही गोष्टी राहून जातात. हे वाचून किमान एखाद्या व्यक्तीला विचार करावासा वाटला तर हे लिहिण्याचा हेतू सफल झाला असे वाटेल. आपल्या प्रिय व्यक्तीला प्रेमाने घट्ट जवळ घेऊन किती दिवस झालेत!? विशेषतः घरातल्या आई बाबांना! शेवटचं त्यांना कधी जवळ घेतलं होतं आपण!? चांगलं अन्न ही जशी शरीराची गरज आहे तसंच प्रेमळ स्पर्श ही मनाची गरज आहे. त्याविना अनेक मनं कोमेजून जातात. ज्यावेळी शब्देवीण संवादू घडतो त्यावेळी मनांचा संवाद घडतो.. कुठल्याही नात्याच्या शाश्वत, चिरंतन रेशीमबंधा करिता हे शब्देवीण संवादू वरचेवर होत राहणं आवश्यक आहे.
शिल्पा चंदगडकर.
(साभार - ही पोस्ट शिल्पा चंदगडकर यांच्या फेसबुक भिंती वरून घेतली आहे.)