‘जातीधर्माची भांडणं आम्हाला नकोयत’, रुपाली पाटील यांचा मोदींवर निशाणा

Update: 2020-05-24 22:44 GMT

कोरोनाच्या संकटकाळात भाजपाने ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन करत सरकारला जागं करण्याचा प्रयत्न केला. यावर मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी आक्रमक पवित्रा घेत “संकटाच्या काळात भाजपनं सरकारसोबत बसुन मार्ग काढायला हवा होता पण त्यांनी महाराष्ट्र बचाओ आंदोलन करुन त्यांची ती पात्रता नाही हे सिद्ध केलंय.” अशी घणाघाती टीका केली आहे.

हे ही वाचा..

केंद्र सरकारकडून थकीत जीएसटी अद्याप मिळालेला नाही. घोषणांचा पाऊस पडला पण गरिबांपर्यंत काहीच पोहोचलं नाही. या सर्व गोष्टी जनतेला माहिती आहेत. कोरोनामुळे त्यांच्या जीवावर बेतायची वेळ आली आहे. त्यामुळे चुकीच्या वेळी महाराष्ट्राला बचाओ आंदोलन करुन भाजपने सर्वसामान्य जनतेचा रोष ओढवून घेतला असल्याचं मत रुपाली पाटील यांनी व्यक्त केलं.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही आता आपलं कौशल्य दाखवलं पाहिजे. लोकांपर्यंत मदत पोहोचायला हवी. त्या पाकिस्तानमध्ये किती बॉम्ब टाकले याने इथे लोकांना काहीच फरक पडणार नाही. मोदींनी आता या गोष्टी सांगत बसून नये. जातीधर्माची भांडणं आम्हाला नकोयत. आता कोरोनातून आम्हाला जगवा.” असं रोखठोक मत त्यांनी यावेळी व्यक्त करत नरेंद्र मोदींचाही चांगलाच समाचार घेतला.