महिलांचा नवा टप्पा : टेरिटोरियल आर्मीमध्ये पदार्पण
बदलत्या भारताची वाटचाल
भारतीय सैन्यव्यवस्थेतील एक ऐतिहासिक अध्याय नुकताच खुला झाला आहे टेरिटोरियल आर्मीमध्ये (TA) प्रथमच महिलांची थेट भरती सुरू झाली आहे. ही केवळ भरती नाही, तर भारतीय महिलांच्या क्षमतेवर, इच्छाशक्तीवर आणि राष्ट्रसेवेच्या ध्येयावर समाजाने ठेवलेला ठाम विश्वास आहे. अनेक वर्षांपासून सैन्यातील विविध शाखांमध्ये महिलांनी उल्लेखनीय कामगिरी सिद्ध केली तरीही, टेरिटोरियल आर्मी सारख्या महत्त्वाच्या दलात त्यांना थेट एन्ट्री मिळणे हा मोठा बदल आहे.
भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी आलेल्या महिलांच्या हजेरीने सैन्य अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा सुखद धक्का दिला. शिस्तबद्ध मिरवणूक, कठोर प्रशिक्षणाची तयारी आणि आत्मविश्वासाने भरलेले चेहरे प्रत्येक ठिकाणी दिसत होती ती नव्या भारतातील स्त्रीची ओळख. उपसेनाप्रमुखांनीही मान्य केले की, महिलांची उपस्थिती फक्त “समाधानकारक” नव्हती, तर अपेक्षेपेक्षा जास्त प्रभावी होती.
या भरतीचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे "स्वयंस्फूर्ती". स्टेट सर्व्हिसपासून पोलीस दलापर्यंत, महिलांना संरक्षण सेवेत आकर्षण असले तरी टेरिटोरियल आर्मीची भूमिका वेगळी आहे. देशात कुठेही आपत्ती, संकट किंवा सुरक्षा तणाव निर्माण झाल्यास, नियमित आर्मीबरोबर खांद्याला खांदा लावून उभे राहणारे हे सैनिक असतात. अशा जबाबदारीसाठी पुढे येणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या परिवर्तनाचा इशारा देते.
या भरतीनंतर टेरिटोरियल आर्मीचा चेहरा बदलणार आहे. आतापर्यंत सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय कर्तव्य एकत्र निभावणाऱ्या या दलामध्ये आता महिलांची संवेदनशीलता, निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुण नवीन उंची निर्माण करतील.
आजच्या महिलांची ओळख ही केवळ घर, नोकरी किंवा कुटुंबापुरती मर्यादित नाही. त्या सीमा सांभाळायला, रणांगणात उतरायला आणि राष्ट्राच्या सुरक्षेचा भार उचलायला देखील सिद्ध आहेत हे या प्रक्रियेनं आणखी ठळक केलं.
टेरिटोरियल आर्मीमध्ये महिलांचा प्रवेश हा केवळ सैन्यातील बदल नाही; तो भारतीय समाजातील विचारांमधील बदलाचा मोठा टप्पा आहे. “महिलांची जागा कुठे?” या जुनाट प्रश्नाला आजच्या मुलींनी देलेला सरळ आणि दमदार उत्तर म्हणजे— “जिथे देशाला आमची गरज आहे, तिथे आम्ही उभ्या आहोत!”