पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रीमंडळात हरसिमत कौर बादल यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलीय. त्या एनडीएचा घटकपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या खासदार आहेत. मागच्या सरकारमध्ये त्यांनी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा कारभार पाहिला होता.
हरसिम्रत यांचा जन्म 25 जुलै 1966 रोजी पंजाबच्या मजीठिया कुटुंबात झाला. हरसिम्रत कौर बादल या पंजाबमधल्या प्रमुख राजकीय घराण्याच्या सून आहेत. त्यांचे सासरे प्रकाशसिंह बादल हे अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री राहीलेले आहेत. त्यांचे पती सुखबीर सिंह हे ही पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री राहीलेले आहेत.
हरसिम्रत यांचं शिक्षण नवी दिल्लीतल्या लोरेटो कॉन्वेंट स्कूलमध्ये झालंय. फॅशन डिझायनींगमध्ये त्यांनी डिप्लोमा केलाय. कृषी, प्रसारमाध्यमं आणि हॉटेल क्षेत्रात त्यांचं मोठं साम्राज्य आहे. ‘नन्ही छाँव’ नावाची त्यांची एक एनजीओही आहे जी पर्यावरण संवर्धन आणि बालकांसाठी काम करते. याशिवाय त्यांच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ‘सांझ’ या उपक्रमातून पंजाबच्या ग्रामीण भागात शेकडो टेक्स्टाईल प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आलेत. ज्यामध्ये युवतींना प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर दिला जात आहे.
2009 पासून सलग तीनवेळा बठिंडा मतदारसंघातून हरसिम्रत खासदार आहेत. त्यांच्या कार्यकाळात बठिंडामध्ये सुरु झालेलं एम्सचं काम हे त्यांचं मोठं यश मानलं जातं. आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी बठिंडा आणि पंजाबमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली. यंदा काँग्रेस उमेदवार अमरिंदर राजा वडींग यांचा 21772 मतांनी पराभव करत त्यांनी आपली लोकसभेची हॅट्ट्रीक साधली. आता सलग दुसऱ्यांदा त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली आहे.