लोकांशी संवाद साधणारा टीव्हीवरचा चेहरा - संजय आवटे

Update: 2020-05-05 06:46 GMT

मुंबईच्या एका महाविद्यालयातील पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांशी आज बोलत होतो. तेव्हाच बातमी आलीः

"शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत, विधान परिषदेच्या उपसभापती #डॉ_नीलम_गोऱ्हे यांना विधान परिषदेसाठी पुन्हा उमेदवारी."

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांशी बोलताना विषय ठरलेला नसतो. त्या दिवशी, त्या क्षणी एखादा विषय येतो आणि चर्चा तसे अनौपचारिक वळण घेते. मग सहजपणे 'पोलिटिकल कम्युनिकेशन'च्या अंगाने विद्यार्थ्यांशी बोलत होतो.

हे ही वाचा...

शिवसेनेच्या आजच्या यशामध्ये डॉ. नीलम गो-हे यांचा वाटा मोठा आहे. मध्यमवर्गापेक्षाही #माध्यमवर्ग आता निवडणुकांचा निकाल लावतो! त्यातही टीव्हीचा परिणाम मोठा असतो. टीव्ही वृत्तवाहिन्यांबद्दल कोणी कितीही नकारात्मक बोलले तरी टीव्हीचा प्रचंड परिणाम व्हायचा तो होतोच. अशावेळी टीव्हीवर आपापल्या पक्षाची खिंड लढवणे हे काम महत्त्वाचे असते.

डॉ. नीलम गो-हे गेली कैक वर्षे एकहाती शिवसेनेची खिंड लढवत आहेत. शिवसेनेसारख्या धोरणात्मक शिस्त नसलेल्या पक्षाची बाजू लावून धरणे सोपे नाही. शिवाय, बाळासाहेबांनंतर या पक्षाला चेहरा उरला नव्हता. त्यात गेली सहा वर्षे तर हा पक्ष सत्तेत आहे की विरोधात आहे, हे त्यांचे त्यांनाच सुधरत नव्हते. अशावेळी अन्य कोणी असते तर टीव्हीवर शिवसेनेची अक्षरशः धूळधाण उडाली असती. पण, तसे घडले नाही. भाजपने सेनेची कोंडी करूनही टीव्हीवर मात्र शिवसेना तळपत राहिली ती केवळ नीलम गो-हे यांच्यामुळे.

Courtesy : Social media

टीव्हीच नव्हे, डिजिटल- सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रांतही नीलम गो-हे भक्कमपणे शिवसेनेचा गड सांभाळत राहिल्या. चळवळीच्या मुशीतून घडल्यानेही असेल, पण त्यांचे व्यक्तिमत्त्व अशा वाद-संवादात झळाळून निघते. सामाजिक आणि महिलांच्या प्रश्नांवर बोलताना- काम करताना तर त्यांच्यातील कार्यकर्ती दिसतेच दिसते!

एखाद्या तत्त्वचिंतकाप्रमाणे, पण लढाऊ कार्यकर्तीच्या थाटात, स्वतःचा आब राखत डॉ. नीलम प्रभावीपणे आपली भूमिका मांडत, तेव्हा प्रतिवाद करण्याची हिंमत भल्याभल्यांना होत नसे. पक्षाची एखादी चुकीची भूमिका अथवा झालेली कोंडीसुद्धा त्या अशा पद्धतीने सांभाळून नेत की विरोधकही मनातल्या मनात त्यांना दाद देत असत. शिवसेनेच्या आजच्या या यशात डॉ. नीलम गो-हे यांचा वाटा मोठा आहे, हे म्हणूनच लक्षात घेतले पाहिजे.

***

महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांकडे महाराष्ट्रात असणारे प्रवक्ते दमदार आहेत आणि त्यांचा मोठा फायदा या तीनही पक्षांना झाला.

कॉंग्रेसकडे #अतुल_लोंढे यांच्यासारखा तरूण, झुंजार प्रवक्ता आहे. अतुलचा अर्थकारणाचा, राज्यशास्त्राचा अभ्यास खूप चांगला आहे. मुख्य म्हणजे त्याच्याकडे ॲकॅडॅमिक शिस्त आहे. चांगले वक्तृत्व आहे. 'प्रेझेन्स ऑफ माइन्ड' आहे आणि सर्व भाषांवर प्रभुत्व आहे. गेल्या सहा वर्षांत सर्वात दयनीय अवस्था होती ती कॉंग्रेसची. पण, अतुल छोट्या पडद्यावर आणि बाहेरही पक्षाला अशा आवेशात 'डिफेन्ड' करत असे की जणू काही हाच जगज्जेता पक्ष आहे.

सोशल मीडियावरही अतुल तेवढ्याच प्रभावीपणे व्यक्त होत असतो. व्हिडिओद्वारे भूमिका मांडत असतो.

Courtesy : Social Media

अतुलसोबत हुसेन दलवाई, सचिन सावंत, सत्यजित तांबे, डॉ. राजू वाघमारे यांचाही उल्लेख करायला हवा.

वेगळा उल्लेख करायला हवा तो, ज्येष्ठ नेते #डॉ_रत्नाकर_महाजन यांचा. समग्र अभ्यास हे तर त्यांचे वेगळेपण आहेच. पण, त्यांची भाषा अगदी अभ्यासण्यासारखी आहे. उपरोध, काव्य, शास्त्र, विनोदाचा उपयोग करत त्यांनी विरोधकांची अनेकदा बोलती बंद करून टाकली.

***

राष्ट्रवादी कॉंग्रेसची धुरा खुद्द डॉ. जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, अमोल मिटकरी, विद्या चव्हाण, अंकुश काकडे, जयदेव गायकवाड, विकास लवांडे, डॉ. आशा मिरगे, महेश तपासे, सक्षणा सलगर, उमेश पाटील, रुपाली चाकणकर, भूषण राऊत, विजय कोलते अशा जुन्या-नव्या प्रवक्त्यांनी सांभाळली. अर्थात, राष्ट्रवादीकडे शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे असे तगडे चेहरे असल्याने प्रवक्त्यांवर तशी फार मोठी जबाबदारी नव्हती!

***

भाजपकडे साक्षात देवेंद्र फडणवीस (आणि मोदीही!) असल्याने प्रवक्त्यांना फार काम नव्हते. मात्र, माधव भंडारी, केशव उपाध्ये, शिवराय कुलकर्णी, राम कदम, प्रवीण दरेकर, विश्वास पाठक, अवधूत वाघ अशा प्रवक्त्यांनी आपापली कामगिरी चोखपणे पार पाडली.

#माधव_भंडारी यांचा उल्लेख आवर्जून करायला हवा. अत्यंत शांतपणे, पण अभ्यासू पद्धतीने मुद्दे मांडण्याची त्यांची खास अशी प्रभावी शैली आहे.

Courtesy : Social Media

***

तरीही, प्रतिकूल परिस्थिती असूनही, मराठी वाहिन्यांवर गेल्या पाच- सहा वर्षांत भाजपविरोधी प्रवक्त्यांनी बाजी मारली.

यात कॉ. अजित अभ्यंकर, डॉ. भालचंद्र कांगो, डॉ. अजित नवले यांचाही समावेश आहे.

***

भाजपविरोधी प्रवक्त्यांना महाराष्ट्रात आणखी एक जमेची बाजू होती.

हिंदीप्रमाणे अर्णब गोस्वामी, दीपक चौरासिया, सुधीर चौधरी, अंजना ओम कश्यप यासारखे भयंकर ॲंकर्स मराठीत नाहीत. मराठीतील आशिष जाधव, निखिला, प्रसन्न जोशी, वैभव कुलकर्णी, नम्रता वागळे असे ॲंकर्स तुलनेने लिबरल आणि विरोधी आवाजालाही स्पेस देणारे आहेत, हे मान्य केलेच पाहिजे.

एनी वे,

डॉ. नीलम गो-हे यांच्या निमित्ताने ही चर्चा झाली.

डॉ. नीलम गो-हे यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

- संजय आवटे

Similar News