आमिर खान : बदलत्या काळातही तेज अबाधित ठेवणारा परफेक्शनिस्ट
नव्या पिढीच्या बदलत्या आवडी, व्यावसायिक दबाव आणि OTT स्पर्धेच्या काळातही आमिर खान स्वतःची ओळख नव्याने घडवताना दिसतो.
खारच्या शांत गल्लीतून भर दुपारी मी घाईघाईने पत्ता शोधत होतो. छोट्या गल्ली-बोळांच्या वळणावळणात चुकतच राहिलो आणि जेव्हा अखेर आमिर खानच्या घरासमोर पोहोचलो, तेव्हा मी जवळजवळ तासभर उशिरा पोहोचलो होतो. मनात मलाच अपराधी वाटत होतं. पण दरवाजा उघडताच दिसलं एक शांत स्मितहास्य. समोर उभा होता, देशभरातील लाखो लोकांवर प्रभाव टाकणारा सुपरस्टार… पण त्या दिवशी माझ्यासमोर उभा होता फक्त एक विद्यार्थी.
“काही हरकत नाही, सर,” तो म्हणाला. त्याच्या बोलण्यातली साधेपणा आणि मनापासूनची उत्सुकता पहिल्याच क्षणी जाणवली.
विद्यार्थी, पण शिक्षणाच्या चौकटीबाहेरचा
आमिरने कधीच कोणतीही भाषा 'रीतसर' शिकलेली नव्हती—ना हिंदी, ना उर्दू, ना इंग्रजी. हे ऐकून माझ्या मनात एकाच वेळी excitement आणि चिंता दोन्ही निर्माण झाल्या.
उत्सुकता कारण त्याच्यासारखा उत्साही विद्यार्थी दुर्मीळ.
चिंता - कारण भाषा शिकण्याच्या मूलभूत पायऱ्यांचे त्याला काहीच भान नव्हते.
पण आमिरचा चेहरा पाहिला की लगेच कळत असे त्याची उर्जा, त्याची जिज्ञासा, हे सगळं शिक्षणाला मजेशीर बनवणारं आहे.
दुसऱ्या दिवशीचा ‘बालकासारखा’ उत्साह
दुसऱ्या दिवशी मी गेलो, आणि दार उघडताच मला दिसला एक उजळून निघालेला चेहरा. जणू पहिल्या दिवशी शाळेत जाणाऱ्या एका छोट्या मुलाचा आनंद!
“आज आपण काय शिकणार?”—त्याच्या आवाजातला उत्साह स्पष्ट जाणवत होता.
दोन वर्षं झाली तरी त्याचा तो उत्साह एका क्षणासाठी कमी झाला नव्हता.
नाटुकलींचा खेळ… भाजीवाला आमिर
भाषा शिकण्यासाठी मी त्याच्यासोबत खेळ मांडला - लहान लहान नाटुकल्या.
एका नाटुकलीत तो "भाजीवाला" होत असे; दुसऱ्या नाटुकलीत "भाजीवाली".
मी कधी ग्राहक बनत असे, कधी त्याला ग्राहकाचं पात्र करायला लावत असे.
सारं काही मराठीत!
भूमिका बदलल्या की सर्वनाम, क्रियापद, लिंगभेद सगळं आपोआप शिकायला मिळे.
आणि आमिर?
अभिनेता असला तरी, इथे तो विद्यार्थी होता - आवाजाची लय, उच्चार, वाक्यरचना यांचे प्रयोग करत हसत-खेळत शिकणारा.
जिद्दीचा विद्यार्थी
एकदा कडक दुपारी त्याचा फोन आला.
"सर, गृहपाठ करताना अडलो आहे…"
मी विचारलं, “तु वहीत पाहिलसं का?”
तो म्हणाला,
“ती वही घरी आहे सर. मी तर अथेन्सला आलोय शूटसाठी. पण वेळ मिळाला की मराठीचा अभ्यास करतोच!”
माझ्या हातून फोनच खाली पडायचा बाकी होता.
कोट्यवधी लोकांच्या चर्चेत असणारा अभिनेता… परदेशात असतानाही हातात मराठीची वही घेऊन बसलेला!
ही फक्त मेहनत नव्हे, ही होती तळमळ.
आणि तरीही ‘ळ’ त्याला जिंकू देत नव्हतं…
तो ‘ळ’ उच्चारू शकत नव्हता.
मी त्याला जीभ कशी टाळ्याला लागते ते दाखवलं, हातांनी वरच्या तालूची हालचाल करून दाखवली…
पण मराठीतला ‘ळ’ मात्र त्याला पकडू देत नव्हता.
त्याच्या तोंडातून "बळ" ऐवजी "बड" बाहेर पडे, आणि आम्हा दोघांनाही हसू यायचं.
आणि मग आला मुंबई पोलिसांचा कार्यक्रम… तीन महिन्यांच्या अभ्यासातलं धाडस.
शुक्रवार रात्री नऊ-साडेनऊ पर्यंत आमचा अभ्यास चालला.
सोमवारी त्याला मुंबई पोलिसांसमोर भाषण करायचं होतं - मराठीत!
तीन महिन्यांचा विद्यार्थी… एवढा मोठा मंच… मराठीत?
मी थक्क झालो.
मी भाषण मराठीत करून दिलं. पण त्याला ते पाठ करण्यासाठी वेळच मिळाला नाही.
शनिवार व्यस्त.
रविवार तापात शूटिंग.
सोमवारी संध्याकाळीही तो हतबल:
“सर, मी काय करू?”
मी सुचवलं,
“पहिलं आणि शेवटचं वाक्य मराठीत बोल. बाकी हिंदी-इंग्रजी. श्रोते तुला उचलून धरतील.”
पण आमिरने काय केलं?
त्याने पूर्ण भाषण मराठीत केलं.
थोडा अडखळला, पण थांबला नाही.
त्या क्षणी स्टेजवर उभा होता एक अभिनेता नव्हे—एक शिकणारा, संघर्ष करणारा, प्रामाणिक मनुष्य.
वेळ नसतानाही अभ्यास… लिओपोल्डपासून शीवपर्यंत
एकदा तो म्हणाला,
“सर, बारा तास शूटिंग, आठ तास झोप, दोन तास मुंबई ट्रॅफिक… उरलो तेवढ्या वेळात काय करू? मराठीला वेळच मिळत नाही!”
मग त्यानेच युक्ती काढली -
“शूटिंगदरम्यान set बदलायला वेळ लागतो. तेव्हा तुम्ही सेटवर या.”
आणि मग माझा मराठी अध्यापनाचा प्रवास सुरू झाला -
कुलाब्याच्या लिओपोल्ड मध्ये,
शीवच्या थिएटरमध्ये,
भायखळ्याच्या कारखान्यात,
पंचोद्यानाजवळ…
जिथे जिथे आमिर, तिथे तिथे मराठीचे धडे.
त्या सगळ्या जागांना आता माझ्यासाठी वेगळंच महत्व आहे.
एक मनस्वी इच्छा
इतकं धावपळीतलं जीवन… तरीही मराठी शिकण्याची इतकी तळमळ!
या विद्यार्थ्याला थोडा जरी अधिक वेळ मिळाला असता…
तर त्याने मराठीवर प्रभुत्व मिळवलं असतं आणि नक्कीच मराठीत एखादं मोठं भरीव काम करून दाखवलं असतं.
माझी एवढीच इच्छा की त्याचा हा प्रवास कधीच थांबू नये.
– सुहास लिमये
(पुनर्लेखन : टीम मॅक्स वुमन)