मुलांच्या कपाळावर 'लेबल' नको, त्यांना समजून घेणारे 'शिक्षण' हवे!

Update: 2026-01-13 11:10 GMT

"तुमचे मूल विशेष (Special Child) आहे, त्याला दुसऱ्या शाळेत न्या..." हे शब्द आजकाल अनेक पालकांच्या कानावर पडत आहेत. मुलांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या शाळाच आता मुलांना विविध 'लेबले' लावून त्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. अलीकडच्या काळात खाजगी आणि विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हे प्रमाण कमालीचे वाढले असून, यामुळे मुलांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होत असल्याची भावना शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेने बालवर्गात (KG) शिकणाऱ्या एका मुलाला 'विशेष' ठरवून पालकांना शाळा बदलण्यास सांगितले. पालकांसाठी हा मोठा मानसिक धक्का होता. मात्र, जिद्द न हारता पालकांनी मुलाचे माध्यम बदलले आणि त्याला मराठी शाळेत प्रवेश दिला. आश्चर्य म्हणजे, ज्या मुलाला शिक्षकांनी 'मतिमंद' किंवा 'अध्ययन अक्षम' ठरवले होते, त्याच मुलाने मराठी माध्यमात उत्कृष्ट प्रगती केली आणि आज तो मुलगा अमेरिकेतील एका नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षण घेत आहे. हे उदाहरण केवळ अपवाद नसून शिक्षण व्यवस्थेतील गंभीर दोषावर बोट ठेवणारे आहे.

शाळांमध्ये प्रत्येक इयत्तेसाठी 'अध्ययन निष्पत्ती' (Learning Outcomes) ठरवून दिलेल्या असतात. एखादे मूल जर ठराविक वेळेत त्या गोष्टी आत्मसात करू शकले नाही, तर शिक्षक आणि मुख्याध्यापक लगेचच त्या मुलावर 'गती मंद', 'मतिमंद' किंवा 'लर्निंग डिसेबल' असा शिक्का मारतात. प्रत्यक्षात, प्रश्न मुलांच्या क्षमतेचा नसून शिक्षण देण्याच्या पद्धतीचा असतो. इंग्रजी माध्यमात शिकताना अनेकदा मातृभाषा नसल्यामुळे मुलांना विषयाचा आशय समजत नाही. अर्थ उलगडत नसल्याने मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते आणि शिक्षक याचा संबंध मुलाच्या बुद्धिमत्तेशी लावतात.

मानसशास्त्रानुसार, प्रत्येक मूल हे वैशिष्ट्यपूर्ण (Unique) असते. प्रत्येकाची शिकण्याची गती, पद्धत आणि वेळ वेगळी असते. मात्र, सध्याच्या स्पर्धात्मक युगात शाळांना केवळ 'रिझल्ट' हवा असतो. शिक्षकांना शिकवताना येणाऱ्या अडचणी किंवा एकाच पद्धतीचा वापर केल्याने होणारे अपयश लपवण्यासाठी मुलांवर लेबले लावली जातात. “तुमचे मूल स्पेशल आहे” असे म्हणणारे शिक्षक खरे तर स्वतःच्या अध्यापन पद्धतीतील उणिवा मान्य करण्यास तयार नसतात. अशा लेबलांमुळे मुलांचे केवळ शैक्षणिक नुकसान होत नाही, तर त्यांना आयुष्यभरासाठी एका मानसिक विवंचनेत ढकलले जाते.

पालकांच्या मनात 'अपराधगंड' निर्माण करणे ही एक प्रकारची भावनिक हिंसा आहे. शाळांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, शिक्षणाचे काम मुलांना आकड्यांमध्ये मोजण्याचे नसून, त्यांना समजून घेण्याचे आणि घडवण्याचे आहे. शिक्षकांनी मुलांच्या गरजांनुसार अध्यापनात बदल करणे, भिन्न उदाहरणे देणे आणि वैयक्तिक लक्ष देणे गरजेचे आहे. जोपर्यंत शिक्षण व्यवस्था मुलांना लेबल लावणे थांबवून त्यांना माणुसकीने समजून घेत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने शिक्षणाचा हेतू साध्य होणार नाही.

Tags:    

Similar News