ट्रान्सविमेनचे अधिकार आणि सामाजिक स्वीकार: ओळख, संघर्ष आणि बदलाचे पाऊल
स्त्रीत्वाची नवी व्याख्या आणि समाजाच्या मनातील अदृश्य भिंती
X
ट्रान्सविमेनचे अधिकार आणि सामाजिक स्वीकार
स्त्रीत्वाची व्याख्या अनेक शतकांपासून जैविक निकषांच्या चौकटीत बंदिस्त होती. ‘जन्माला मुलगी आली’ म्हणजे ती स्त्री. हीच सरळ, सोपी आणि सार्वत्रिक समजूत. पण मानवी ओळख, मनाची लय, आत्मस्वीकृती आणि जेंडर आयडेंटिटी ही जीवशास्त्रापलीकडची गोष्ट आहे. या वास्तवाला आज जगभरात मान्यता मिळत असली तरी आपल्या समाजात ट्रान्सविमेनचे अस्तित्व अजूनही स्पष्टीकरण, संघर्ष आणि स्वीकृतीच्या प्रतीक्षेत अडकलेले आहे.
ट्रान्सविमेन म्हणजे पुरुष म्हणून जन्मले परंतु मनाने स्वतःला स्त्री म्हणून ओळखणाऱ्या व्यक्ती. त्यांचं मन स्त्रीत्वाशी जोडलेलं असतं. पण समाज फक्त देह पाहतो, मनाची भाषा कधीच ऐकत नाही. भारतात हजारो ट्रान्सविमेन आहेत, ज्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग चुकीच्या देहात, चुकीच्या नावात, आणि चुकीच्या ओळखीत अडकून घालवला. त्यांची कहाणी ही स्वतःशी लढण्यापेक्षा समाजाशी लढण्याची जास्त आहे.
भारतातील पारंपरिक संस्कृतीत ‘हिजरा’ समुदाय शतकानुशतके अस्तित्वात आहे. लग्न, बाळंतपण, सण शुभ क्षणांमध्ये आशीर्वाद देण्यासाठी त्यांना बोलावलं जातं. पण हा सन्मान ‘वेषभूषा व परंपरा’पुरता मर्यादित आहे. खऱ्या जीवनात ट्रान्सविमेनला शिक्षण, नोकरी, आरोग्य सुविधा, कौटुंबिक स्वीकृती, प्रेम, विवाह, घर यापैकी काहीही सहज मिळत नाही. समाज त्यांना शुभ समजतो, पण मनुष्य म्हणून समान मान्यता देण्यास मागे हटतो. विरोधाभास तिथेच निर्माण होतो.
कुटुंब हे ट्रान्सविमेनच्या आयुष्यातील पहिलं रणांगण असतं. अनेकांनी लहानपणीच स्वतःच्या ओळखीचा पहिला अनुभव घेतला असेल. बाहुल्या आवडणं, स्त्रीसुलभ वर्तन करणं, कपडे निवडताना मनात जागणारी स्त्रीची भावना. पण त्या भावना व्यक्त केल्या की कुटुंब त्यांना “चुकणं वळण”, “शरम” या चौकटीत बसवतं. काहींना घरातून बाहेर काढलं जातं; काहींना जबरदस्तीने ‘पुरुष’ बनवण्यासाठी मारहाण, धमक्या, धार्मिक विधी, डॉक्टरांकडे नेण असं अमानवीय शोषण सहन करावं लागतं.
ट्रान्सविमेनसाठी शिक्षण म्हणजे वाळवंटात आशेचा एक छोटासा ओअॅनसिस. शाळेत चिडवणं, हेटाळणी, शिक्षकांची दुर्लक्ष-तिरस्काराची नजर यामुळे लहानपणीच अनेकांना शिक्षण सोडावं लागतं. परिणामी त्यांच्यासाठी रोजगाराचे दरवाजे बंद होतात. काही भीक मागणं, नाच-गाणी करणं अश्या कामात ढकलल्या जातात निवडीने नव्हे तर जगण्याच्या मजबुरीने. समाज मग त्याच गोष्टीवरून त्यांना पुन्हा कमी लेखतो, पण त्यांच्या आयुष्याला दुसरी दिशा कधीच देत नाही.
त्यांच्या अधिकारांच्या बाबतीत भारताने महत्त्वाची पावलं उचलली आहेत. 2014 च्या NALSA निर्णयाने ट्रान्सजेंडर व्यक्तींना तिसरा लिंग म्हणून मान्यता मिळाली. 2019 च्या ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन अॅक्टने त्यांना कायदेशीर संरक्षण दिलं. आज ट्रान्सविमेनला पासपोर्ट, आधार, नोकरी, आरोग्य सुविधा आणि सगळीकडे स्त्री म्हणून ओळखण्याचा अधिकार आहे. काही राज्यांमध्ये ट्रान्सवुमनसाठी शिक्षण व नोकरीतील आरक्षणही मिळालं आहे. काही कंपन्यांनी ट्रान्स-इन्क्लुसिव्ह कार्यस्थळे तयार केली आहेत, काहींनी medical insurance मध्ये gender affirmation procedures समाविष्ट केल्या आहेत.
पण ‘कायदा’ आणि ‘मनातील स्वीकार’ हे दोन वेगळे मार्ग. कायदे बदलले तरी समाजाचा दृष्टीकोन बदलायला वेळ लागतो. ट्रान्सविमेनला अजूनही घर भाड्याने मिळत नाही, हॉस्पिटलमध्ये आदराने वागवलं जात नाही, बस-ट्रेनमध्ये अपमान सहन करावा लागतो. त्यांची सुरक्षितता ही एक कायमची चिंता. Feminist आणि women-rights गप्पांमध्येही ट्रान्सविमेनला अनेकदा बाजूला केलं जातं, ‘खरी स्त्री कोण?’ या निरर्थक, भेदभावी प्रश्नात त्यांना अडकवलं जातं. स्त्रीत्व ही शरीराची नव्हे, अनुभवाची ओळख आहे पण हे सत्य स्वीकारायला समाजाला अजून पिढ्या जातील.
त्यांना प्रेम मिळण्यापेक्षा फसवणूक, हिंसा जास्त मिळते. त्यांच्या जोडीदारांनाही समाजाचा दबाव सहन करावा लागतो, त्यामुळे अनेक नाती तुटतात. ट्रान्सविमेनच्या भावनिक जगाकडे समाजाने कधीच प्रौढ नजरेने पाहिलं नाही.
मात्र या सगळ्या अंधाऱ्या चित्रातही उजेडाच्या रेषा दिसत आहेत. अनेक ट्रान्सविमेन आज कलाकार, मॉडेल, पत्रकार, पोलीस अधिकारी, राजकारणी, शिक्षक म्हणून चमकत आहेत. नागालँडपासून कोचीनपर्यंत, दिल्लीपासून पुण्यापर्यंत शिक्षित आणि आत्मविश्वासपूर्ण ट्रान्सवुमनचे नवे चेहरे भारतीय समाजाच्या नकाशावर उमटत आहेत. OTT प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया, साहित्य, पत्रकारिता यामध्ये ट्रान्सवुमनचे वास्तविक अनुभव स्थान मिळवू लागलेत. त्यांच्या कथा केवळ दया किंवा शोषणातून नाही तर ताकद, करिअर, प्रेम, आणि स्वप्नांच्या भाषेत सांगितल्या जात आहेत. हा बदल महत्त्वाचा आहे कारण जेव्हा समाज कथांचे फ्रेम बदलतो, तेव्हा स्वीकृतीची सुरुवात होते.
ट्रान्सविमेनच्या स्वीकाराकडे जाणारा प्रवास सरळ नाही, पण तो अपरिहार्य आहे. मानवता ही शरीराच्या चौकटीत नाही तर मनाच्या स्वातंत्र्यात असते. स्त्रीत्वाची ओळख आता जन्मापलीकडे गेली आहे; ती आता अनुभव, निवड, आणि आत्मस्वीकृतीचा प्रवास बनली आहे. ट्रान्सविमेन फक्त ‘संरक्षणाच्या’ पात्र नाहीत तर त्या सन्मान, संधी आणि समतेच्या पात्र आहेत.
समाजाला फक्त एकच गोष्ट शिकायची आहे ओळख बदलण्याची गरज नाही, विवेक बदलण्याची गरज आहे.
आणि त्या दिशेने घेतलेले प्रत्येक पाऊल कितीही छोटं असलं तरी एका स्त्रीला तिच्या खऱ्या ओळखीने जगण्याची मोकळीक देतं.






