Home > W-फॅक्टर > स्त्रियांना होणाऱ्या कर्करोगावरील उपचार मोफत, ग्रामीण भागातील महिलांसाठी उपक्रम

स्त्रियांना होणाऱ्या कर्करोगावरील उपचार मोफत, ग्रामीण भागातील महिलांसाठी उपक्रम

स्त्रियांना होणाऱ्या कर्करोगावरील उपचार मोफत, ग्रामीण भागातील महिलांसाठी उपक्रम
X

महाराष्ट्राच्या विशेषतः ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण प्रकर्षाने वाढताना दिसून येतं आहे. पण या आजाराबद्दल जागरूकतेचा अभाव महिलांमध्ये आहे. वेळीच निदान व उपचार न मिळाल्याने जीवावर बेतू शकतं. या अनुषंगाने कॅन्सर रूग्णांसाठी अहोरात्र काम करणाऱ्या ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर व्दारे गावखेड्यातील महिलांमध्ये स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाचे अचूक निदान आणि उपचारासाठी निधी उभारण्यासाठी इँम्पक्ट गुरू च्या माध्यमातून ही मोहीम राबविली जात आहे.

ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर याद्वारे कर्करोगाचे रुग्ण शोधण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि नागपूर या जिल्ह्यांसह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात ही मोहीम राबवली जाणार आहे. जेणेकरून कर्करोगाचे वेळीच निदान करुन या आजारावर यशस्वी मात करता येऊ शकेल. इम्पेक्ट गुरूच्या सहाय्याने ९० दिवसांत निधी उभारणी मोहिमेची घोषणा केली आहे. या मोहिमेतंर्गत कर्करूग्ण शोधण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक गावखेड्यात मेमोग्राफी चाचणी व्हॅन फिरणार आहेत.

साधारणतः आठ वर्ष ही मोहिम सुरू राहणार असून या आठ वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील २,५०० हून अधिक गावांत पोहचण्याचा प्रयत्न असून अंदाजित ९०,००० ते ९५,००० महिलांची मेमोग्रॉफी चाचण्या करणार आहेत. १,३०,००० – १,५०,००० पेक्षा जास्त पॅप स्मिअर चाचण्या केल्या जाणार आहेत. गर्भाशयाच्या कर्करोगाच्या तीन लाख चाचण्या करण्यात येणार आहेत. तसेच महिलांमध्ये आढळून येणाऱ्या या कर्करोगाच्या चाचण्या विनामुल्य उपलब्ध करून दिल्या जातील.

भारतात स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या १० वर्षांपासून स्तनाचा कर्करोग प्रथम क्रमांकावर आहे आणि गर्भाशयाच्या कर्करोगाच्या सर्वाधिक रुग्णसंख्येत भारताचा तिसरा क्रमांक आहे. महत्त्वाचं म्हणजे, ग्रामीण भागातील महिलांमध्ये या कर्करोगाबाबत जागरूकतेचा अभाव पाहायला मिळत आहे. कारण, सर्वसाधारणपणे ग्रामीण स्त्रिया वेळेवर स्तन आणि गर्भाशयाच्या, मुखाच्या कर्करोगाची तपासणी करण्यास टाळाटाळ करतात आणि जेव्हा वेदना असह्य होतात तेव्हा डॉक्टरांकडे उपचारासाठी जातात.

डॉक्टरांच्या मते, आजाराची भिती, अज्ञान, आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि वाहतुकीचे प्रश्न इत्यादी विविध कारणांमुळे ग्रामीण भागातील महिला स्वतःच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा असं दिसून आले आहे की, काही महिला उशीरा उपचारासाठी येतात. त्यामुळे अशा महिलांवर उपचार करणं अवघड होतं. परंतु, काही महिला वेळेवर उपचारासाठी आल्यानं त्यांना या कर्करोगातून सुखरूप बाहेर काढणं सोपं होतं.

याबाबत माहिती देताना ओन्को लाइफ कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक सचिन देशमुख म्हणाले की, “दुर्गम भागात राहणाऱ्या महिला वेळेवर आमच्यापर्यंत पोहोचत नसल्याने आजार बळावतो. म्हणून आम्ही प्रत्येक गावखेड्यात मेमोग्राफी व्हॅनद्वारे महिलांची कर्करोग चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्करोगाची सुविधा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे. या मोहिमेद्वारे २,५०० पेक्षा जास्त गावांमध्ये जाऊन ९०,००० ते ९५,००० महिलांची मेमोग्रॉफी चाचण्या करणार आहोत. याशिवाय १,३०,००० ते १,५०,००० पेक्षा जास्त पॅप-स्मिअर आणि तीन लाख गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान करण्यात येणार आहे. यासाठी आम्ही आवाहन करतोय की, प्रत्येकाने पुढाकार घेऊन या मोहिमेसाठी निधी जमा करण्यास मदत करावी.”

Updated : 7 Aug 2020 4:14 AM GMT
Next Story
Share it
Top