Home > व्हिडीओ > परिस्थिती पुढं हार न मानणारी स्कुटीवाली बाई...

परिस्थिती पुढं हार न मानणारी स्कुटीवाली बाई...

परिस्थिती पुढं हार न मानणारी स्कुटीवाली बाई...
X

या आहेत सुनंदा मांदळे... शिरूर तालुक्यातील सविंदणे गावच्या... पंचक्रोशीत यांची ओळख बनली ती त्या चालवीत असलेल्या स्कुटीमुळे... ते म्हणतात ना ‘हर एक चीज के पीछे वजह होती है’ त्यांच्या या ओळखी मागचं कराणही तितकचं संघर्षमय आहे.

झालं असं की, सुनंदा यांचं अल्पवयातच लग्न झालं. पण त्यांच्या सासऱ्यांची त्यांच्यावर वाईट नजर असल्याने त्यांना सासरी रहाणं कठीण झालं. नवऱ्यानेही त्यांना साथ दिली आहे. शेवटी सुनंदा यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि माहेर गाठलं. पण माहेरी सुध्दा सर्व काही कुशल मंगल म्हणतात तसं काही नाही. सुनंदा आई सोबत मजूरी करायला जायला लागल्या. त्यातच 2005 सली वडीलांचं निधन झाल्याने सुनंदा यांचा मोठा आधार हरपला. याच काळाच त्यांच्या पोटात दिड महिन्याचं बाळ वाढत होतं.

वडिलांच्या मृत्यूचं दुःख कमी होतं की काय त्यांच्यासमोर आणखी एक संकट उभं राहिलं. वडिलांच्या वाटणीची जमीन चुलत्यांच्या नावे लागली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दहाव्याच्या दिवशीच चुलत भावांनी जमीनीसाठी भांडण उकरून काढलं पण सुनंदा यांनी जमीन द्यायला नकार दिला.

सुनंदा म्हणतात, ‘आमची जमीन गेली असती तर आम्हाला जगायला काही मार्गच उरला नसता. मला अजूनही त्या लोकांचे शब्द आठवतात, ते म्हणाले होते... तुझी जमीन आहे ना, मग कायद्याने घेऊन दाखव.’ इथुनच त्यांच्या कायदेशील लढाईला सुरुवात झाली.

कायदा म्हणजे काय? न्यायालईन लढाई कशी असते? याची कोणतीही माहिती नसताना त्यांना कुणीतरी एका वकिलाचं नाव सुचवलं. वकिलाच्या पहिल्याचं प्रश्नाने त्या गोंधळून गेल्या. प्रश्न होता ‘तुमची जमिनीची कागदपत्रं कुठे आहेत? सातबारा कुठेय?’ यावर सुनंदा यांनी ‘ते काय असंत?’ असा उलट प्रश्न विचारला. या उत्तराने अनेकांना हसायला येइल पण सुनंदा यांच्यासाठी तो अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष होता.

वकिलांनी एका कागदावर सुनंदा यांना सगळ्या दाखल्यांची नावं लिहून दिली आणि ते तलाठी कार्यालयात मिळतील असं सांगितलं. त्या दिवसापासून सुनंदा तलाठी कार्यालय, तहसीलदार कार्यालय अशा चकरा मारायला लागल्या. कागदपत्रं जमा होईपर्यंत त्यांना तीन वर्षं लागली. त्यानंतर त्यांनी कोर्टात जमिनीच्या दाव्याची केस दाखल केली.

आता सुनंदा यांना केससाठी सतत तालुक्याच्या गावी जावं लागत असल्याने त्यांना खुप वेळ गाडीची वाट पहात बसावं लागायचं किंवा एखाद्या पुरुषाला विनंती करून त्याला सोडायला सांगत. अशा असहायतेमुळे अनेकदा त्यांची कामे खोळंबून रहायची. मग त्यांनी एका त्यांच्या चुलत भावाला विनंती करून त्याच्या सात बाऱ्यावर कर्ज काढून अखेर गाडी घेतली.

सुनंदा यांचा चुलत भाऊ त्यांना कोर्टात सोडायला जायचा. मात्र एकदा कामाच्या वेळी त्याने यायला नकार दिला आणि या जिद्दीतूनच त्या अखेर दिवसभर स्कुटी चालवायची प्रॅक्टिस करत राहिल्या. त्यांच्या याच जिद्दीमुळे आज गावात स्कुटीवाली बाई नावाने लोक त्यांना ओळखतात.

सध्या त्यांची केस आता शेवटच्या टप्प्यात आहे. सुनावणी कोव्हिड दरम्यान पुढे ढकलली गेली पण आपण ही केस जिंकू असा त्यांना विश्वास आहे.

त्यांना परिस्थितीने इतकं शिकवल आहे की त्या आता इतर महिलांना प्रशिक्षण देतात. त्यांच्या आत्ताच्या बुद्धी चातुर्याच्या गोष्टी ऐकल्या तर त्या कधी काळी रडल्या होत्या... हतबल झाल्या होत्या यावर विश्वास बसत नाही. पुण्यातील यशदा संस्थेत त्या क्रांतीज्योती योजनेअंतर्गत नवनिर्वाचित सरपंच महिलांना प्रशिक्षण देतात. महिला राजसत्ता आंदोलनाच्या त्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत.

आज आपण आपल्या आजूबाजूला अनेक अशा महिला पाहतो ज्या परिस्थिती समोर हार मानून जगतात. पुरुष प्रधान संस्कृतीशी कसा आणि कितपत लढा द्यायचा म्हणून हातपाय गाळून बसतात.. पण सुनंदा मांदळे या महिलांसाठी सर्वोत्तम उदाहरण आहेत. ‘ठान लो तो जीत, मान लो तो हार’ हे वाक्य सार्थपणे त्या जगताहेत अस म्हटलं तर वावग ठरणार नाही...

Updated : 30 Sep 2020 9:40 AM GMT
Next Story
Share it
Top