मराठवाडा वाचवा ...
X
सामाजिक भान असणाऱ्या ज्या काही ठराविक लेखिका महाराष्ट्रात आहेत त्यात रेखा बैजल यांचं नाव आवर्जून घ्यावं लागतं. रेखा बैजल यांची विकासाच्या बाबतीत काही सूक्ष्म निरिक्षणं आहेत. खास करून मराठवाड्याच्या विकासाबाबत त्या खूप चिंतीत असतात.मराठवाड्याच्या प्रश्नांवर त्या पोटतिडकीने बोलतात, पाऊस हा इथला मुख्य प्रश्न आहे, इथली लोकं पुण्या-मुंबईकडे स्थलांतर करू लागलीयत. त्यामुळे येत्या काळात पाण्याच्या मुद्द्यावर बरंच काम करावं लागणार आहे. काही एनजीओ, सुशिक्षित तरूण-तरूणी पाण्याच्या विषयावर काम करतायतय. पावसाचं पाणी अडवण्याची गरज निर्माण झाली आहे. जर पावसाचं पूर्ण पाणी अडवलं तर नद्या जोडण्याची गरज राहणार नाही. नाल्यांनाच आता नद्या बनवायला हवं. गोदावरीचं पाणी नाशिकलाच अडवलं जातं, त्यामुळे मराठवाडा वेगळा करण्याची राजकीय भाषा बोलण्यात अर्थ नाही, आमच्याकडे आहेच काय..? परिस्थिती बदलायची असेल तर युद्धपातळीवर काम करावं लागणार आहे.पावसाची स्थिती आणि वाढती लोकसख्या पाहता दोन टप्प्यांमध्ये नद्या जोड प्रकल्प करावा लागणार आहे. लोकांच्या सहभागाशिवाय हे शक्य होणार नाहीय. प्रत्येक गावानं किमान पाच किलोमीटर चा कालवा बनवायला हवा, तरच हे काम पुढे जाऊ शकतं, हे काही राजकीय पक्ष किंवा नेत्याचं काम नाहीय, असं रेखा बैजल आवर्जून सांगतात. रेखा बैजल लिखाणासोबत सामाजिक कार्यातही सक्रीय असतात. मराठवाड्यातील अनाथालयांसाठी त्या पुण्या-मुंबईतून जुने कपडे, शैक्षणिक साहित्य गोळा करायचं काम करतात. अनाथालयांची परिस्थितीही फार दयनीय असल्याचं रेखा बैजल सांगतात. अनाथालायातील एक बाई १०० मुलांच्या पोळ्या करते, तिला ३ हजार पगार मिळतो. ही परिस्थिती बदलली पाहिजे. समाजानेही संवेदनशीलतेने या सगळ्याकडे बघण्याची गरज आहे असं रेखा बैजल यांचं म्हणणं आहे. लेखिका म्हणून रेखा बैजल आपल्या सर्वांनाच माहित आहेत, पण मराठवाड्याच्या एकूणच राजकीय, सामाजिक, आर्थिक प्रश्नांवर त्यांची सूक्ष्म निरिक्षणं आहेत. मॅक्सवुमन रेखा बैजल यांच्या वेगळ्या पैलूची ही छोटीशी ओळख