नवजात मुलीला जिवंत पुरलं?
X
नांदेड जिल्ह्यातील एका गावात एका महिलेनं आपल्या नवजात मुलीला जिवंत पुरल्याचा आरोप तिच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी केल्यानं खळबळ उडाली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी यासंदर्भातला एक व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. एका महिलेनं आपल्या नवजात मुलीला जिवंत पुरल्याचा संशय आसपासच्या लोकांना आल्यानंतर त्या मुलीचा मातीखालून पुन्हा बाहेर काढण्यात आले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इम्तियाज जलील यांनी तातडीने नांदेडच्या एसपींना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे. या महिलेची प्रसुती वेळेआधीच झाली होती आणि त्या मुलीची प्रकृती जन्मताच अत्यंत गुंतागुंतीची झाली होती अशी माहिती एसपींनी दिल्याचे इम्तियाज जलील यांनी आपल्या या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. पण असे असले तरी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जलील यांनी केली आहे. मुलींचा जन्मदर वाढावा आणि स्त्री भ्रूण हत्या रोखल्या जाव्यात असे वाटत असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि असा प्रकार घडला असेल तर जबाबदार व्यक्तींवर कारवाई झाले पाहिजे अशी मागणी जलील यांनी केली आहे.