लॉकडाऊनच्या काळात काम बंद झाले, त्यामुळे आवक बंद, लॉकडाऊनच्या काळात स्वतःसकट कुटुंबाच्या उदर निर्वाहाचा प्रश्न या घर कामगार महिलांच्या समोर उभा ठाकला. त्यात नवऱ्यालाही काम नाही, अनेकींच्या नवऱ्यांना दारूचे व्यसन असल्याने त्रास आणखीनच वाढला. ज्यांच्या पतीचे निधन झाले आहे त्यांच्यावर मुलाबाळांची किंवा आई वडील, सासू सासरे यांची जबाबदारी होती. यातील 90% घर कामगार महिलांना स्वतःचे घर नाही. त्यामुळे घर भाडे थकले. काही दिवस आधार दिल्यानंतर किराणा दुकानदाराने किराणा देणे बंद केले. रेशन कार्ड नसल्याने सरकारी धान्य मिळाले नाही. अशा चौफेर संकटांनी घर कामगार महिला घेरल्या गेल्या होत्या. पण ना त्या आंदोलन करू शकत होत्या ना कुठे दाद मागू शकत होत्या.
लॉकडाउनच्या काळात आयुष्यातील सर्वात हालाखीची परिस्थिती आम्ही अनुभवली असे या महिलांनी आपली व्यथा मांडताना सांगितले मधू बिरमोळे या कष्टकरी महिला संघटनेच्या अध्यक्ष आहेत आणि घर कामगार महिला कल्याण मंडळाच्या माजी सदस्या आहेत.. त्यांनी सांगितले की, घर कामगार महिलांचे कल्याण मंडळ आहे ते फक्त नावाला आहे. त्याचा काडी मात्र फायदा या घरकामगार महिलांना होत नाही. आम्ही याबाबत शेकडो वेळा या मंडळाकडे विविध मागण्या घेऊन गेलो. मात्र कुठलेही प्रश्न मंडळाच्या माध्यमातून सुटलेले नाही.
कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशाचा कारभार ठप्प झाला होता. या लॉकडाऊनचा सगळ्यात मोठा फटका असंघटित क्षेत्रातील कामगारांना बसला. रोजंदारीवर पोट असलेले मजूर, घरकामगार यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. लॉकडाऊन संपल्यानंतर काम पुन्हा सुरू होईल अशी आशा या लोकांना होती. पण अनलॉक झाल्यानंतरही अनेकांच्या हाताला रोजगार मिळालेला नाही. अनेक ठिकाणी घरकाम करणाऱ्या महिलांना अजूनही कामावर बोलावण्यात आलेले नाही. आर्थिक संकटात सापडलेल्या घरकाम कऱणाऱ्या महिलांना आता सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे.