Home > पर्सनॅलिटी > मोठ्या मनाचे डॉ. लहाने अनेकांसाठी ‘देवदूत’  

मोठ्या मनाचे डॉ. लहाने अनेकांसाठी ‘देवदूत’  

मोठ्या मनाचे डॉ. लहाने अनेकांसाठी ‘देवदूत’  
X

क्षेत्र कुठलंही असो चारदोन वाईट लोकांमुळे त्या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. मात्र, अशा परिस्थितीतही काहीजण आपल्या कर्तृत्वाने क्षेत्रालाच एका विशिष्ट उंचीवर नेतात. होय, लहाने कुटुंबियांचं वैद्यकीय क्षेत्रातलं योगदानही असंच आहे. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे लहान बंधू डॉ. विठ्ठल लहाने यांनी वैद्यकीय व्यवसायातल्या अनेक चांगल्या संधी, ग्लॅमर सोडून लातूरसारख्या ठिकाणी ज्या पद्धतीनं वैद्यकीय सेवा द्यायला सुरूवात केलीय, त्यातून वैद्यकीय क्षेत्राकडे बघण्याचा अनेकांचा दृष्टिकोन सकारात्मक झाला आहे.

बीड जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. विठ्ठल लहाने यांनी वैद्यकीय शिक्षण मुंबईत घेतलं. त्यानंतर महागड्या वाटणाऱ्या वैद्यकीय सुविधा लातूरसारख्या छोट्या जिल्ह्यातल्या रूग्णांनाही मिळाल्या पाहिजे यासाठी त्यांनी लातूरमध्ये लहाने हॉस्पीटल सुरू केलं. १८ वर्षांच्या वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये डॉ. लहाने यांनी ८ हजारांपेक्षा अधिक मोफत सर्जरी या फक्त दुभंगलेले ओठ आणि टाळू यांच्याच केल्या आहेत. अजूनही सामाजिक जाणिवेतून अशा मोफत सर्जरी सुरूच आहेत. अशा महागड्या सर्जरी सामान्यांना मोफत उपलब्ध करून देत डॉ. लहाने यांनी वैद्यकीय सेवेत मोठं योगदान दिलं आहे. आजवरच्या अनुभवात चांगली लोकं भेटली हाच चांगला अनुभव असल्याचं डॉ. लहाने सांगतात.

वैद्यकीय संशोधनात मोठी संधी

विकसित देश हे संशोधनात पुढे आहेत. त्यातुलनेत आपला देश मागे आहे. संशोधनाला पूरक वातावरण आपल्या देशात आहे. मात्र, तरीही आपण संशोधनात मागे आहोत. वैद्यकीय संशोधन वाढण्यासाठी मनुष्यबळ, निधी या गोष्टींकडे गांभिर्यानं पाहण्याची गरज असल्याचं डॉ. विठ्ठल लहाने सांगतात.

चांगल्या आरोग्य सुविधांसाठी विम्याचं कवच घ्या

चांगल्या महागड्या आरोग्य सुविधा घेण्यासाठी विविध कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या विम्याच्या सवलती हा चांगला पर्याय आहे. व्यवसाय म्हणून सुरू केलेल्या रूग्णालयांकडून रूग्णांवर चांगले उपचार होतील पण ते महागडे असतील, त्यापेक्षा डॉक्टरांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या रूग्णालयातून चांगले आणि किफायतशीर उपचार मिळू शकतील, असा विश्वास डॉ. विठ्ठल लहाने यांनी व्यक्त केला.

प्लॅस्टिक सर्जरी आता सामान्यांच्या आवाक्यात

आपल्या पाल्यांच्या प्लॅस्टिक सर्जरीसाठी प्रत्येक पालकाला चिंता असते. त्यातही अशा सर्जरी या मोठ्या शहरांमध्ये आणि खर्चिक असल्यानं पालकांची चिंता वाढते. अशा चिंताग्रस्त पालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा काम गेल्या १८ वर्षांपासून डॉ. विठ्ठल लहाने करत आहेत. अधिक पैसे दिल्यास अधिक चांगले दिसता येते, हा समज डॉ. लहानेंनी आपल्या कृतीतून खोटा ठरविला आहे. कमी पैशातही अशा महागड्या प्लॅस्टिक सर्जरी करता येतात, फक्त याबाबत जनजागृती होण्याची गरज असल्याचं मत डॉ. लहानेंनी व्यक्त केलं. सरकारी रूग्णालयांमध्येही अशा सर्जरी करणारे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत. महाराष्ट्रातल्या सहा मोठ्या शासकीय रूग्णालयात असे तज्ज्ञ सर्जन्स आहेत, त्यांच्या मदतीनं सरकारी रूग्णालयात प्लॅस्टिक सर्जरी झाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा डॉ. लहाने यांनी व्यक्त केली.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मुला-मुलींच्या शारीरिक व्यंगावर माफक आणि प्रसंगी मोफत प्लॅस्टिक सर्जरी करून डॉ. लहाने यांनी हजारो कुटुंबांमध्ये हास्य फुलवलेलं आहे. त्यांची ही वैद्यकीय सेवा आजही बिनदिक्कतपणे सुरूच आहे. त्यांच्या smile pinky या माहितीपटातून देशभरात प्लॅस्टिक सर्जरी विषयी मोठ्या प्रमाणावर जागृती झाली आहे.

Updated : 7 March 2019 8:29 AM GMT
Next Story
Share it
Top