Home > Uncategorized > " सुपर 30" शैक्षणिक जीवन संघर्षाचा सुपर आलेख.

" सुपर 30" शैक्षणिक जीवन संघर्षाचा सुपर आलेख.

 सुपर 30 शैक्षणिक जीवन संघर्षाचा सुपर आलेख.
X

गेल्या काही काळात हिंदी सिनेमा कात टाकत असल्याचे दिसत आहे. न्यूटन, मंटो, पिंक, मुल्क, आर्टिकल 15 असे काही ऑफ बिट सिनेमे पाहायला मिळाले जे आशयगर्भ होते. यातच सामील करता येईल असा " सुपर 30 " हा चित्रपट आहे.

शिक्षण क्षेत्रावर आधारित तारे जमीन पर, 3 ईडीयटस, शिक्षणाच्या आयचा घो, १0 वी फेल या सारखे चित्रपट आणि कोटा फैक्टरी सारखी वेब सिरीज असे काही मोजकेच पण उठावदार प्रयत्न यशस्वीपणे करण्यात आले आहेत. याच मालिकेत उल्लेखनीय भर पडली आहे "सुपर 30" या चित्रपटाची.

हा चित्रपट, जे सर्व शैक्षणिक संसाधनापासून वंचित आहेत, जे दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यांची हतबलता, अवहेलना यावर भाष्य तर करतोच पण शिक्षण क्षेत्रातील क्लास संस्कृतीची बजबजपुरी व शिक्षण माफिया यांचे मुखवटे टराटरा फाडतो.

सत्य घटनेवर आधारीत हा चित्रपट बिहारमधील आनंदकुमार या एका ध्येयवेड्या शिक्षकाचा संघर्षपूर्ण जीवनपट मांडतो. दारिद्र्य रेषेखालील, मागास वर्गातील विद्यार्थ्यांना विनामोबदला शिकविण्याच्या त्याने घेतलेल्या ध्यासापासून, त्याच्यावर खूपदा झालेले जीवघेणे हल्लेही त्याला परावृत्त करू शकत नाहीत. जीवघेण्या हल्ल्यात जर मला मृत्यू आला तर त्याला प्रसिद्धी देऊ नका असं हा आनंदकुमार पत्रकाराला सांगतो. कारण का? तर हे वाचून ज्यांना असं काम करण्याची इच्छा आहे त्यांचं खच्चीकरण होईल असं तो म्हणतो. समाजाप्रती इतका त्याग, आत्मीयता त्याला अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवते.

त्याने निवडलेल्या 30 मुलांमध्ये सफाई कामगार, हमाल, मजूर, भंगार गोळा करणारे, डोंबारी, वेटर अशा अप्रतिष्ठित वर्गातील मुलं-मुली आहेत. अशा आत्मभान विहीन मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्याने केलेली धडपड, ट्युशन माफियांशी दोन हात करून, प्रसंगी जीवावर उदार होऊन आनंदकुमार करत असलेलं काम पाहताना आपणही थरारून जातो. या मुलांनी साध्या साध्या गोष्टींतून प्रोजेकटर तयार करणे, वीज तयार करणे व गुंडांचा सामना करतानाचे प्रसंग 3 इडियट्सची आठवण करून देतात.

आनंदकुमारच्या अथक प्रयत्नांमुळे व जिद्दीमुळे ही ३0 ही मुले पहिल्याच प्रयत्नात आयआयटी ला प्रवेश मिळविण्यात यशस्वी होतात.

हा चित्रपट मा. फुले व डॉ. आंबेडकर यांचे जे स्वप्न होते की देशातील शेवटच्या व्यक्ती पर्यन्त शिक्षण पोहोचले पाहिजे याची पदोपदी आठवण करून देतो.

विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व आज समाजात जे असे अनेक आनंदकुमार काम करीत आहेत त्यांना आत्मिक बळ देणारा चित्रपट सादर केल्याबद्दल दिगदर्शक विकास बहलचे अभिनंदन!

- संगिता नरके

Updated : 25 July 2019 6:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top