Home > Uncategorized > ये हसीं वादियॉं..

ये हसीं वादियॉं..

ये हसीं वादियॉं..
X

लेहहून 'नुब्रा व्हॅली'ला जाताना 'खारदुंगला पास' क्रॉस करावा लागतो. 'लडाख' ह्या शब्दाचा अर्थच land of passes असा आहे. दोन भागांना जोडणार्या डोंगरातून जाणार्या रस्त्यांचा प्रदेश. हिमालयातल्या काराकोरम पर्वतरांगांमधून जाणारे हे पास. खारदुंगला पास हा one of the highest motorble roads म्हणजे माणूस वाहनाने प्रवास करू शकेल अशा सर्वात उंचावरच्या रस्त्यांपैकी एक. लेह जर समुद्रसपाटीपासून ११५००फुटावर आहे तर खारदुंगला पास १७९००फुटांवर आहे. म्हणजे साधारण ६००० फ़ुटाच्या वर चढण आपल्याला चढायची असते. 'बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन,ची कमाल आहे. त्यांनी अद्भुत कामगिरी केलेली आहे त्यामुळे ७५% रस्ता उत्तम आहे. तरीही माझ्यासाठी ते चॅलेंजिंग होतंच. एकतर मी रोज बुलेट चालवणारी नाही. बाईक मोशनमध्ये असते तेव्हा तिच्या वजनाचा त्रास होत नाही, पण पाय टेकवून ओढायची वेळ आली की देव दिसतात. त्यात संपूर्ण रस्ता डोंगरातला. single lane, ७०-८० अंशाची चढण, hairpin turns, खडी, खड्डे, बर्फ़ वितऴून रस्त्यावर आलेलं पाणी, पाण्याची खोली आणि त्याखालचा भाग कसा असेल हे कळत नाही.

अनेकदा इतका steep चढ किंवा उतार असतो की मागे बसलेल्याला उतरावंच लागतं. ऐन वळणावर असा खडबडीत किंवा निसरडा रस्ता असतो की थांबावंच लागतं आणि मग बुलेटसुद्धा दोघांना घेऊन चढू शकत नाही. त्या हवेत त्या चढावर चार पावलं पायी चढणंही फार कठीण असतं. मंजिरीला असं काही वेळा सपोर्ट व्हॅनमध्ये बसावं लागलं. एकूण सगळी थरारक मजा! आमच्या ग्रुपमध्ये ६ बाईक्स होत्या. मी आणि मंजिरी, व्यंकटेश आणि पूजा, हिरा आणि हिरी, शिफॉनची साडी आणि नवरा, आसामची दोन पोरं दोन बाईक्सवर एकेकटी. आमच्या मागे एका सपोर्ट व्हॅनमध्ये तीन लडाखी मुलं असायची. आमचं सगळं सामान त्या व्हॅनमध्ये असायचं. हिरा आणि हिरीला वर गेल्यावर त्रास झाला तेव्हा ते व्हॅनमध्ये बसले आणि त्यांची बाईक सपोर्ट व्हॅनमधल्या पोरानं चालवली. सुरुवातीला एकमेकांशी अोळख नसलेले लोक जसजसा रस्ता पुढे जातो तसतसे आपोआप एकमेकांच्या मागेपुढे रहायला लागतात. एकमेकांना खुणा करून पुढच्या रस्त्याची कल्पना देतात. ओव्हरटेक करू नका, समोरून गाडी येत्ये हे हातवारे आपोआप सुरू होतात. ह्या सीझनमध्ये असे अनेक ग्रूप्स तिथे येतात.

पंधरा वीस बायकर्सचे ग्रूप्स सुद्धा. दिल्ली, मनाली, कारगिलहून आलेले ग्रूप्स. त्यामानाने आम्ही फारच नवशिके होतो. परदेशी बायकर्स त्यांच्या त्या सगळ्या एकसारख्या वेशांमुळे तर फार स्मार्ट दिसतात. बायका रायडर्स खूप कमी असतात पण असतात. मी आणि दोन फॉरेनर बायका सगळे दिवस कुठेनंकुठेतरी एकमेकींना क्रॉस होत होतो. कुतुहलानं एकमेकींकडे बघत हसायचो. थम्स अप ची खूण करून पुढे जायचो. अगदी आपण सहज वाटेत थांबलो तरी कुणीतरी अनोळखीसुद्धा बाइकवरून जाताना थांबतो, हेल्मेटची flap वर करून all okay? असं मानेनं विचारून पुढे जातो. कारण इथे कुणालाही कधीही गरज लागू शकते हे सगळ्यांना कळत असतं. हा सगळा नं बोलता पण एकमेकांची काळजी घेत चाललेला प्रवास फार सुंदर वाटतो. साधारण ४-५ तास प्रवास केल्यावर खारदुंगला पासच्या शिखराची पाटी पाहिली आणि 'आता मी सुखाने डोळे मिटायला मोकळी' असं वाटलं, इतका हा प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय होता. but this was just the beginning हे नंतर कळलं. कारण उतार जास्त कठीण होता. उतरून आम्ही नुब्रा व्हॅलीमध्ये गेलो. साधारण १८० किमिचा प्रवास झाला हा. प्रथेप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी extra class-

1. संपूर्ण safety gear घातल्याशिवाय जाऊ नका. आपण काहीही सिद्ध करायला आलेले नाही आहोत, तो निसर्ग आहे, आपल्यापेक्षा खूप मोठा आहे आणि कुठल्याही क्षणी आपली जिरवू शकतो हे लक्षात ठेवा.

२. एकेक जागा ठरलेली असते. ही फॅशनसेन्स दाखवण्याची जागा नाही. हिरी आणि शिफ़ॉन साडी पहिल्या दिवशी हाय हील्स घालून आल्या. पण सगळाच अंदाज चुकल्याने बिचार्या नाराज झाल्या.

३. दर २५ किमी नंतर पाच मिनिटं थांबा. ह्या भागात २५ किमी अंतर पार करायला एक तासही लागू शकतो. हातांवर प्रेशर येतं. पाय दुखतात. बोटं आखडतात. छोटी दुखापतही ignore करू नका. शिवाय आपल्याला फक्त बाईकच नसते नं चालवायची. आजूबाजूचं डोळ्यांचं पारणं फेडणारं सौंदर्यही बघायचं असतं. कॅमेरात टिपायचं असतं. ह्या प्रवासात 'रहमान' पाठ सोडत नाही. 'ये हसीं वादियॉं ये खुला आसमां'..लूप मध्ये मनाच्या सीडीवर घुमत असतं. पुढच्यावेळी हेल्मेटला लावलेला कॅमेरा वापरणारे मी.

४. सतत पाणी पीत रहा, लिमलेट किंवा तत्सम गोळ्या चघळा, भीमसेनी कापूर किंवा व्हिक्स इन्हेलर श्वासांत भरून घ्या. बाकी थंडीपासून संरक्षण लागेलच. कारण खारदुंगला पास म्हणजे नजर जाईल तोपर्यंत बर्फ़. हात लावला तर कापेल असा. उघड्या डोळ्यांनी बघता येणार नाही, चेहर्यावरचा मास्क काढला तर स्किन भाजेल असा बर्फ़. हाडांत शिरणारी थंडी अशी की अंगावर एकावर एक पाच पाच कपड्यांचे लेअर्स घातले तरीही बाईक चालवताना गारठायलाच होतं. कधीकधी मी संपूर्ण एकटी असाही पाच दहा मिनिटांचा रस्ता. निसरडा. एका बाजूला बर्फ़ आणि दुसर्या बाजूला बर्फ़ाचीच खोल दरी. नजर हटी दुर्घटना घटी हेच १००% सत्य. so just be very very careful.

पण ह्या सगळ्या प्रवासात कुठेही unsafe वाटत नाही. आपण काही वेडेपणा केला नाही, तर आपल्याला कुणीतरी काहीतरी करेल, असं वाटत नाही. कारण आपण संपूर्ण वेळ Indian army च्या छत्रछायेत असतो. 'सियाचिन वॉरियर्स'च्या पाट्या आपल्या बरोबर असतात. भारत आणि त्यातला हा भूप्रदेश, ह्यांचं रक्षण करणार्या आपले सैनिकांबद्दल मनात क्रृतद्यता दाटून आली नाही असा एक तासही जात नाही. भारत पाकिस्तान बॉर्डरवरच्या 'त्याक्षी' गावाबद्दल उद्या..

मुग्धा गोडबोले रानडे

Updated : 22 July 2019 8:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top