Home > Uncategorized > हिमा, आम्ही करंटे आहोत!

हिमा, आम्ही करंटे आहोत!

हिमा, आम्ही करंटे आहोत!
X

भारताचा झेंडा जगात फडकावणारी सुवर्णकन्या आहेस तू. अवघ्या तीन आठवड्यात तब्बल पाच सुवर्णपदके तू देशाला जिंकून दिलीस. सोनेरी अक्षरांनी लिहावी इतकी जबरदस्त ऐतिहासिक कामगिरी तू करुन दाखवलेली आहेस. तरीदेखील इथल्या प्रसार माध्यमांनी तुझी म्हणावी अशी दखल घेतलीच नाही. तुला उपेक्षित ठेवले आहे. तुला प्रसिद्धी देताना भरपूर कंजुषी केलीय. कोणी काहीही म्हणो. तुझे भरभरुन कौतुक करताना हात आखडता घेतलाय आम्ही, हेच खरेय!

व्यापारी माध्यमांच्या या बाजारू जगात वृत्तपत्राच्या पानांत कोणाला किती जागा द्यायची किंवा टिव्हीवरचा स्क्रीन टाइम किती वेळ द्यायचा याचेही हिशेब वेगळे असतात.

हिमा,

तू कशी दिसतेस?

तू कोठून आलीस?

तुझी जात कोणती?

(तुला पदक मिळाल्यानंतर लगेचच अनेक थोर भारतीयांनी गुगलून तुझी जात बघितलेली होती!)

याची व्यवस्थित आकडेमोड केली जाते. तेव्हा कोठे 'रेटिंग पॉइंट्स' ठरतात लेकी. तू या फ्रेममध्ये बसली असतीस तर सकाळ, दुपार, सायंकाळ तुला दाखवली असती!

तू या फ्रेममध्ये परफेक्ट फिट बसत नसल्याने राजकीय घरण्यांतल्या कर्तृत्वशून्य पोराटोरांच्या हालचाली टिपायला आमचे कॅमेरे त्या दिशेने रोखलेले असतात. हात हलवत पोज देणाऱ्या नेत्यांच्या आगमनाची 'चातक प्रतीक्षा' असते आमच्या कॅमेऱ्यांना! ते आले की लखलखाट होतो. नट- नट्यांच्या पेज थ्री पार्टीतही आम्हाला रस असतो. फॅशन वीकवर आमचे केवढं बारीक लक्ष असते.

शेती, शेतकरी आमच्या खीजगणतीत नसतात. त्यात तू पडली शेतकऱ्याची पोर. काळ्या आईच्या कुशीत जन्मलेली तू. तंतोतंत त्याच रंगाची त्वचा. अनाकर्षक वाटावी अशी! तू ना सेक्सी दिसते ना तुला 'समृद्ध सांस्कृतिक वारसा' लाभलाय! सेलेबल व्हॅल्यू असलेले काहीच नाही पोरी तुझ्याकडे. जीवाची बाजी लावून तू सेंकदाच्या भागाच्या गतीने वेड्यासारखी धावत राहिलीस आणि आमची माध्यमं राजकीय नेते, नट-नट्या, क्रिकेटर्स यांना मनोभावे पूजत, भजत राहिली...

'प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत, झगडत आभावावर मात करत सुवर्णपदकं मिळवणाऱ्या हिमाविषयी मुलांना काही सांगितले का?' असे मी विचारले शिक्षकांना. हिमाविषयी शिक्षकांना फारसे माहिती नसावे अशी माझी समजूत झाली. अनेक मुलांनाही विशेष काही नाही माहिती. हेही शक्य आहे. वृत्तपत्राच्या पानांत जे छापले जाते आणि टिव्हीच्या पडद्यावर दाखवले दिसते तेवढेच दुनियेत घडते, इतके माध्यमकेंद्री आहे सध्याचे जग. म्हणूनच हिमाचे यश भारतीयांनी साजरे केले नसल्याची तक्रार करायला पुरेसा वाव आहे. सुवर्णपदकांची लयलूट करणाऱ्या हिमाचे कौतुक करायचे सोडून तुल्यबळ प्रतिस्पर्धी स्पर्धेत नसल्यामुळे हिमाला हे यश मिळवता आले, असेही बोलले लोकं. हिमा या करंटयांकडे दुर्लक्ष केलेले बरे! तू खेळायची थांबली की कधीतरी सवडीने स्क्रिप्ट रायटर कथा लिहितील, दिग्दर्शक सिनेमा करतील, सिनेमा सुपरहीट होईल, इंडस्ट्रीला गल्ला भरता येईल!

संत कबीर महाराज म्हणतात-

जिंदे बाप को रोटी न देवेI

मरीयो फिर पछतावे|

मूठभर चावल छतपर फेक कर|

बाप को कव्वा बनावे|

यदाकदाचित पाठ्यपुस्तकांत तुझ्याविषयीचा पाठ आला की मग आम्ही शिक्षक सांगू मुलांना तुझ्याविषयी. यूट्यूबवर जाऊन व्हिडिओ दाखवू. आणि हो, प्रश्नोत्तरंही लिहून घेऊ. अर्थात पाठ्यपुस्तकांत पाठ येणे सोप्पे नसते पोरी. गरीब, आदिवासी कुटुंबातल्या पोरींना वाघाशी लढायला लागते, तेव्हा कुठे वृत्तपत्रे आणि पाठ्यपुस्तकांच्या पानांत त्यांच्या जीवन संघर्षाला जागा मिळते.

हिमा, तुझ्या गरीब आर्थिक स्थितीमुळे तुला सराव करताना धावायला पायातले बूट्स मिळत नव्हते. आता आदिदास #Adidas कंपनीने तुझ्या नावाने शूज बाजारात आणलाय!

हिमा, काहीही असू देत. नाउमेद न होता तू फक्त धावत रहा. तू थांबू नकोस. कारण एकलव्याकडे अंगठा मागणाऱ्या इथल्या अभिजनवादी समाज व्यवस्थेचे हे असे वागणे नवीन नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर तुला पदक मिळाले तेव्हा भारतीय माध्यमे तुझे इंग्लिश किती कच्चे आहे, याचीच चर्चा करताना दिसली. जणू तिकडे स्पिकिंग इंग्लिश कॉंपिटेशनसाठी गेली होतीस तू. याविषयी खेद, खंत यांच्या पुढे जाऊन आता राग येतो या हलकट वृत्तीचा.

याआधी अनेकांना उपेक्षेचे धनी व्हायला लागले आहे. असे असले तरीही अनेकांना आम्हाला तुझा अभिमान वाटतो. जिद्दीची धडक देऊन खडक फोडायची ताकद तुझ्या दुर्दम्य इच्छाशक्तीत आहे. गरीबीत जगतानाही भव्य स्वप्न बघणाऱ्या अनेक ग्रामीण मुलामुलींची तू आयडॉल आहेस. तुला धावत राहिले पाहिजे. पी. टी. उषा, मिल्खासिंग यांच्या पंक्तित जाऊन बसली आहेस तू!

आणि पाच सुवर्णपदकं मिळाल्यानंतर हुरळून न जाता तू पाय जमिनीवर रोवून उभी राहिलीस. बक्षीसाची अर्धी रक्कम आसाममधल्या पुरग्रस्तांसाठी दिलीस. ज्यांची गडगंज संपत्ती आहे त्यांच्याकडे इच्छाशक्ती नाहीये, तू मात्र लगेचच पुढे आलीस. किती मोठ्या मनाची माणूस आहेस तू. अशीच रहा. तुझा अभिमान वाटतो.

- भाऊसाहेब चासकर, अकोले.

Updated : 23 July 2019 9:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top