Latest News
Home > सावित्री उत्सव > 'माझा मुलगाच माझा जोतिबा' अभिनेत्री विशाखा सुभेदार

'माझा मुलगाच माझा जोतिबा' अभिनेत्री विशाखा सुभेदार

माझा मुलगाच माझा जोतिबा अभिनेत्री विशाखा सुभेदार
X

सावित्रीच्या लेकी म्हणून घेण्यात मला प्रचंड अभिमान वाटतो, मुळात बाईचा जन्म हेच " पुण्य "वाटतं.

सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांनी नांगरले, आम्ही तर फक्त पेरलेले खातोय. महिलांना शिक्षण मिळवून देणे, त्यांना त्यांचा हक्क मिळवून देणे यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातल. सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी आत्मविश्वासाने समाजरचनेची संघर्ष केला आणि स्त्री शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली. गेल्या वर्षी आपण सावित्रीबाईचा जन्म दिवस सावित्री उत्सव म्हणून साजरा केला. ह्यावर्षी आपण आणखीन एक गोष्ट करायची ती म्हणजे, सावित्री आहे घरोघरी... जोतिबाचा मात्र शोध जारी ही मोहीम राबवत आपल्या अवती भवती असलेले अनेक जोतिबा समोर आणायचे आहेत.

सावित्रीबाईना महात्मा ज्योतिबा फुले यांची साथ लाभली तसेच अनेक जोतिबा आपल्याला वडील, नवरा, मित्र, भाऊ, काका, मामा, दीर, ह्यांच्या रूपात आपल्याला आसपास दिसतील.. तर माझ्या आयुष्यातला माझा जोतिबा.. म्हणजे माझ्या मांसाचा गोळा आहे. माझा मुलगा अभिनय.

वडिलांनी मार्गदर्शन केलं, नवऱ्याने पाठबळ दिल आणि माझ्या अभिनयने मला संपूर्ण सहकार्य, साथ, भक्कम आधार दिला. माझा मानसिक आधार आहे माझा मुलगा, त्याच्यासमोर मी आणि माझ्या समोर तो आम्ही संपूर्ण मोकळे होतो. काहीही गोष्ट लपवण्याची गरज भासत नाही, कुठलीही गोष्ट discuss करुन निर्णय घेतो अगदी दोघंही, तो माझ्यासाठी कायमचा एक ड्रॉपबॉक्स आहे, मी त्यात सगळं मनातलं बोलत असते आणि तो ते सगळं फाईलिंग करतो आणि save करतो. तुला ज्यात आनंद आहे ते तू कर, माझ्यासाठी म्हणून तुझ्या आनंदाला फाटा देऊ नकोस, आम्ही भांडतो रुसतो तरी एकेमकांच्या पोटात मायेने घुसतो.. पूर्वी तो माझ्या हाताचा टेकू घ्यायचा, आणि झोपताना कुशीत शिरायचा, आत्ता मी त्याच्या हाताचा टेकू घेऊन त्याच्या कुशीत शिरते. हा माझा जोतिबा म्हणजे माझी प्राणज्योत आहे.

सावित्रीबाईची आठवण म्हणून 3 जानेवारीला मी दारात रांगोळी काढेन, उंबऱ्यावर पणती लावेन, आणि कपाळी आडवी चीर लावून माझ्या लेकराला, माझ्या ज्योतिबाला मानाचा फेटा जरूर बांधेन. माझ्या सगळ्या बायांना आवाहन आहे त्यांनी सुद्धा 3 जानेवारीला सावित्रीचा उत्सव नक्की साजरा करावा..!

- विशाखा सुभेदार, अभिनेत्री

Updated : 31 Dec 2020 11:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top