अक्षरक्रांतीची जननी
चिखलफेक सोसून उद्याची स्वप्ने पेरणारी 'सावित्री'
X
आजच्या दिवशी १८३१ ला पुण्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर दूर असलेल्या नायगावच्या मातीत एक क्रांतीचा अंकुर फुटला. खंडोजी नेवसे पाटलांच्या घरी जन्मलेली ही कन्या, पुढे जाऊन भारतीय स्त्रीशक्तीचा आणि साक्षरतेचा असा काही मानदंड बनेल, याची कल्पना त्या काळातील जड आणि साचेबद्ध समाजाला नक्कीच नव्हती. सावित्रीबाईंच्या जन्माच्या वेळी भारतीय समाजाचे चित्र अत्यंत विदारक होते. जातीव्यवस्थेची पाळेमुळे खोलवर रुजलेली होती आणि स्त्रियांचे आयुष्य चूल आणि मूल या पलीकडे केवळ छळ सोसण्यासाठीच असल्याचे मानले जात असे.
सतीप्रथा, बालविवाह, पडदा पद्धती आणि विधवांची दयनीय अवस्था यामुळे समाज आतून पोखरलेला होता. अशा काळात नायगावच्या निसर्गरम्य वातावरणात वाढलेली सावित्री वयाच्या दहाव्या वर्षी जोतिबांची अर्धांगिनी झाली. पण हा केवळ विवाह नव्हता, तर तो दोन महान आत्म्यांच्या वैचारिक सहजीवनाचा प्रारंभ होता. सावित्रीबाई जोतिबांच्या विचारांपासून कधीच अलिप्त राहिल्या नाहीत. जोतिबांनी त्यांना अक्षरांची ओळख करून दिली आणि त्याच अक्षरांनी पुढे इतिहास लिहिला.
शिक्षणाचा पाया आणि संघर्षाची वाट ज्या समाजात शूद्र-अतिशूद्र आणि स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवणे हाच धर्म मानला जात होता, तिथे सावित्रीबाईंनी जोतिबांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षणाचे मैदान गाजवले. पुण्याच्या भिडेवाड्यात जेव्हा पहिली मुलींची शाळा सुरू झाली, तेव्हा तो केवळ वर्ग नव्हता, तर हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचा तो एक प्रयत्न होता. शाळेत जाताना त्यांच्या अंगावर शेण फेकले गेले, चिखल उडवला गेला, दगड मारले गेले. पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. त्यांनी निधड्या छातीने समाजाच्या विरोधाचा सामना केला. "हिम्मत असेल तर जोतिबांना हात लावून दाखवा," असे ठणकावून सांगणारी ती वीरनारी खऱ्या अर्थाने निडर सेनानी होती.
बहुआयामी सावित्री सावित्रीबाई केवळ शिक्षिका नव्हत्या, तर त्या एक उत्तम व्यवस्थापक, समाजसुधारक आणि संवेदनशील कवयित्री होत्या. त्यांनी केवळ शाळा चालवल्या नाहीत, तर स्त्रियांवरील अन्याय दूर करण्यासाठी 'बालहत्या प्रतिबंधक गृह' स्थापन केले. विधवांचे बाळंतपण सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. न्हाव्यांचा संप घडवून आणून त्यांनी सामाजिक बदलाची एक नवी दिशा दाखवली.
त्यांच्यातील मानवतावाद इतका प्रगल्भ होता की, दुष्काळ असो वा प्लेगची साथ, त्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता दीनदलितांची सेवा केली. एका प्लेगग्रस्त मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी त्याला खांद्यावर वाहून नेले आणि याच सेवेच्या काळात त्यांना स्वतःला प्लेगची लागण झाली, ज्यात त्यांचा अंत झाला. हा त्याग केवळ शब्दांत मांडता येण्यासारखा नाही.
सावित्रीची फिलॉसॉफी आणि आधुनिक काळ सावित्रीबाईंनी लिहिलेली 'काव्यफुले' आणि 'बावनकशी सुबोध रत्नाकर' हे काव्यसंग्रह त्यांच्या प्रगल्भ विचारांची साक्ष देतात. आजही आपण उच्चशिक्षित असूनही जातीपातीच्या भिंती तोडू शकलेलो नाही. पण सावित्रीबाईंनी त्याकाळी सत्यशोधक समाजाचे नेतृत्व केले, पुरोहितांशिवाय विवाह लावले आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. जोतिबांच्या निधनानंतर खंबीरपणे उभे राहून त्यांनी सामाजिक न्यायाची चळवळ पुढे नेली.
सावित्रीबाईंनी उपस्थित केलेला प्रश्न आजच्या पिढीलाही लागू होतो: "बुद्धी असुनि चालत नाही, तयास मानव म्हणावे का?" आज आपण साक्षर आहोत, पण आपण खरंच सुशिक्षित आहोत का? माईंनी पाहिलेले समतेचे आणि ज्ञानाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. आज त्यांच्या जन्मदिनी आपण केवळ त्यांची आरती ओवाळून चालणार नाही, तर त्यांच्यातील ती 'लढाऊ वृत्ती' स्वतःमध्ये जागृत करणे आवश्यक आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या केवळ एक व्यक्ती नसून ती एक अखंड ज्योत आहे, जी पिढ्यानपिढ्या स्त्री-मुक्तीचा आणि समतेचा मार्ग उजळत राहील.






