Home > रिलेशनशिप > आईचं ते 'भयानक' रूप की तिच्या आतल्या घुसमटीचा स्फोट?

आईचं ते 'भयानक' रूप की तिच्या आतल्या घुसमटीचा स्फोट?

आईचं ते भयानक रूप की तिच्या आतल्या घुसमटीचा स्फोट?
X

सोशल मीडियावर व्हायरल तो व्हिडीओ केवळ एका मुलाला झालेली मारहाण नाही, तर तो एका स्त्रीच्या मानसिक संयमाचा झालेला चक्काचूर आहे. 'आई' म्हटलं की आपल्याला फक्त माया आठवते, पण जेव्हा हीच माया राग बनून पोटच्या गोळ्यावर तुटून पडते, तेव्हा प्रश्न पडतो "ती अशी का वागली?" हा प्रहार केवळ त्या मुलावर नव्हता, तर तो कदाचित त्या आईच्या आत वर्षानुवर्षे साचलेल्या घुसमटीचा, हतबलतेचा आणि एकटेपणाचा एक जिवंत ज्वालामुखी होता.

आपल्या समाजात 'आई' असणं हे जगातील सर्वात कठीण काम बनलं आहे. घर आवरण्यापासून ते मुलाला परीक्षेत 'मेरिट'मध्ये आणण्यापर्यंतची सर्व मदार तिच्यावर असते. "मुलाने अभ्यास केला नाही तर तुझा संस्कार कमी पडला" असं म्हणणारा हा समाज त्या आईच्या पाठीवर कधी मायेचा हात ठेवत नाही. दिवसभर स्वयंपाकघर, स्वच्छता आणि मुलांच्या गरजा पूर्ण करताना ती स्वतःला कुठेतरी हरवून बसते. जेव्हा एखादी स्त्री अशा प्रकारे हिंसक होते, तेव्हा समजावं की तिच्या सहनशक्तीचा बांध फुटला आहे. तो राग त्या अभ्यासावर नसून, तिच्या नशिबावर आणि तिला मदत न करणाऱ्या व्यवस्थेवर असतो.

मुलाने केस कापले नाहीत, या एका शुल्लक गोष्टीवरून आई इतकी हिंसक कशी होऊ शकते? इथे त्या स्त्रीचा 'इगो' आड येतो. ज्या घरात तिला स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसतं, तिथे ती मुलावर आपलं वर्चस्व गाजवून स्वतःचा 'कंट्रोल' सिद्ध करायचा प्रयत्न करते. "किमान या मुलाने तरी माझं ऐकलंच पाहिजे" हा अट्टाहास तिला क्रूर बनवतो. ही मुलं तिची मालमत्ता नसून स्वतंत्र जीव आहेत, हे ती विसरून जाते. तो मार केवळ शिस्त लावण्यासाठी नसून, स्वतःची हतबलता झाकण्यासाठी केलेला एक केविलवाणा प्रयत्न असतो.

अनेकदा ज्या महिला स्वतः घरात हिंसाचाराचा किंवा दुर्लक्षाचा बळी असतात, त्या आपल्या मनातील राग बाहेर काढण्यासाठी मुलाचा वापर करतात. पतीशी असलेलं बिनसलेलं नातं, सासरचा जाच किंवा आर्थिक विवंचना यांमुळे निर्माण झालेली 'फ्रस्ट्रेशन' जेव्हा ओसंडून वाहते, तेव्हा सर्वात सोपं लक्ष्य ठरतं ते म्हणजे— स्वतःचं मूल! मुलाला मारताना तिला कदाचित असं वाटत असावं की, ती त्या मुलाला नाही, तर तिला त्रास देणाऱ्या या जगाला मारतेय. हे तिचं वागणं अमानुष आहेच, पण त्यामागे तिची स्वतःची झालेली 'मानसिक मोडतोड' कारणीभूत असते.

'आई असं का वागते?' याचं उत्तर केवळ त्या मुलाच्या खोडकरपणात नाही, तर त्या आईच्या अस्वस्थ मनात दडलेलं आहे. ती आई नक्कीच चुकली आहे, तिला शिक्षा व्हायलाच हवी. पण तिला त्या टोकापर्यंत नेणारी परिस्थिती आणि समाजही तितकाच जबाबदार आहे. आईला देव्हाऱ्यात बसवण्यापेक्षा तिला थोडा मोकळा श्वास घेऊ द्या. आईचं हृदय हे प्रेमाचं मंदिर असायला हवं, छळछावणी नाही. प्रेमाचा हात जेव्हा प्रहाराचा हात बनतो, तेव्हा समजून जा की, माणुसकीचा अंत झाला आहे!

Updated : 6 Jan 2026 3:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top