भावनांचे ओझे एकटीचेच का?
स्त्री–पुरुषांतील भावनिक श्रमांचे असमान वाटप
X
भारतीय समाजात भावनांची जबाबदारी ही जणू स्त्रीच्या डीएनएमध्येच लिहून दिल्यासारखी मानली जाते. मुलगा रडला तर “मुलं रडत नाहीत” आणि मुलगी रडली तर “रडणं ठीक आहे, ती भावनाशील आहे” अशी शिकवण बालपणापासूनच दिली जाते. परिणामी, स्त्री म्हणजे भावनांची रखवाली करणारी आणि पुरुष म्हणजे भावना टाळणारा असा एक कालबाह्य पण मजबूत ढाचा तयार होतो. आणि इथूनच सुरू होते भावनिक श्रमांची असमान विभागणी.
भावनिक श्रम (Emotional Labor) म्हणजे नातेसंबंधातील भावनिक स्थिती, वातावरण, संवाद, संघर्ष व्यवस्थापन, दुसऱ्यांच्या गरजांची जाण, त्यांच्या भावनिक जखमा समजून घेणे या सर्वाचा भार.
घरातलं वातावरण शांत ठेवणं, मुलांचं वर्तन समजून घेणं, नवऱ्याचा ताण कमी करणं, सासर–माहेरातील भावनिक तणाव हाताळणं, ऑफिसमधील वादांनंतरही कुटुंबासाठी मानसिकदृष्ट्या उपलब्ध राहणं हे सर्व श्रम आहेत आणि हे काम समाजाने आपोआप स्त्रीच्या खात्यावर टाकलं आहे.
विवाहातही ही भावनिक व्यवस्थापनाची भूमिका ‘पत्नीकडे’ ढकलली जाते. भांडण झालं की समजुतीच पहिली पाऊल टाकणं तिचंच, शांतता राखणं तिचंच, निर्णय सुसंस्कृतपणे मांडणंही तिचंच. अनेक स्त्रिया सांगतात की, “तो काही बोलत नाही, त्यामुळे मलाच बोलावं लागतं” पण हा शांतपणा हा गुण नसून बोलण टाळणारा स्वभाव आहे, ज्याची किंमत स्त्री चुकवते. मानसिक श्रम हे कामाच्या ठिकाणी सुद्धा स्पष्ट दिसतात: टीममधील वातावरण न्यूट्रल ठेवणं, सहकाऱ्यांचे मनोबल वाढवणं, ऑफिसमधील छोट्या मोठ्या भावनिक तणावांना सांभाळणं हे सर्व अनौपचारिक काम बहुतेक वेळा महिला करतात, पण त्यांना यासाठी ना कौतुक, ना बढती, ना वेतन.
या भावनिक श्रमांचा सर्वात कठीण भाग म्हणजे त्यांची ‘अदृश्यता’. काम झाल्यावर त्याला काम म्हणून स्वीकारलं जात नाही. घर शांत आहे याचं श्रेय शांततेला दिलं जातं, त्या शांततेसाठी एखाद्या स्त्रीने केलेल्या असंख्य मानसिक बदलांना नाही.
स्त्रीच्या भावनांना, तिच्या ओढाताणीला, तिच्या शक्तीला जणू ‘बायका असतातच तशा’ या वाक्यात गिळून टाकलं जातं. त्यामुळे ती स्वतःची गरज, तिचं मानसिक आरोग्य, तिची भावनिक स्पेस सगळं मागे टाकते.
या भावनिक असमानतेचा स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. सतत उपलब्ध राहण्याचा ताण, आपल्यावर आरोप होऊ नये म्हणून शांत राहण्याची जबाबदारी, नातं तुटू नये म्हणून स्वतःच्या भावनांना दाबून ठेवणं यामुळे भावनिक थकवा (Emotional Burnout), चिंता (Anxiety), अपराधभाव (Guilt), आत्मसन्मान कमी होणे असे प्रश्न उद्भवतात. आत्मविश्वास ढासळतो, निर्णयक्षमता कमकुवत होते आणि स्त्री स्वतःच्या गरजा दुय्यम समजू लागते.
हे असमान वितरण फक्त व्यक्तिगत पातळीवर नाही, तर सांस्कृतिक पातळीवरही आहे. भारतीय कुटुंबव्यवस्था अजूनही ‘स्त्री घराचं हृदय’ या संकल्पनेवर टिकून आहे. पण घराचं हृदय असणं आणि घराचा भावनिक भार एकटीने उचलणं यात फरक आहे.
हृदय हे घराला जिवंत ठेवतं, पण ते कुणाचं गुलाम नसतं ही जाणीव समाजाला अजूनही पटकन स्वीकारता आलेली नाही.
मग उपाय काय?
प्रथम, पुरुषांनी भावनिक साक्षरता (Emotional Literacy) शिकली पाहिजे. ‘भावना व्यक्त करणं हे कमजोरीचं लक्षण’ हा भ्रामक विचार मोडून काढण्याची गरज आहे. गृहकृत्यांसारखीच भावनिक कामेही सामायिक व्हायला हवीत. भांडण झालं तर स्त्रीच पुढाकार घ्यायलाच हवा हे बदलायला हवं.
दुसरं म्हणजे, स्त्रियांनीही ‘सतत उपलब्ध राहणं’ किंवा ‘सगळं मीच सांभाळीन’ या शिकवणीतून बाहेर पडणं आवश्यक आहे. सीमारेषा (Boundaries), नकार देण्याची परवानगी आणि स्वतःच्या भावनांना जागा देणं हे केवळ शक्यच नाही, तर आवश्यकही आहे.
शेवटी, नात्यांमध्ये भावनिक समतोल हा लक्झरी नाही, तर गरज आहे.
बोलणं, ऐकणं, कामे वाटून घेणं आणि सामायिकपणे नातं सांभाळणं या दोघांच्याही जबाबदाऱ्या आहेत.
स्त्रीचे भावनिक श्रम नात्याला आधार देतात, पण त्या आधाराचा भार एकट्याने वाहून घेणे हे तिचं ‘कर्तव्य’ नाही ही सामूहिक जाणीव घडायला हवी.
नातेसंबंध टिकवायचे असतील, तर भावनांचा भार दोघांनीही उचलला पाहिजे. माणुसकीची किंमत समानतेत आहे, त्यागात नव्हे. प्रेमाची किंमत परस्पर सहकार्याने तयार होते, एकतर्फी समजुतीने नव्हे. आणि भावनिक समतोल मिळाला, तर स्त्रीच्या खांद्यावरील अदृश्य भार अखेर हलका होऊ लागेल.






