Home > रिलेशनशिप > सासू vs सुना - न संपणारं मजेदार कोल्ड वॉर

सासू vs सुना - न संपणारं मजेदार कोल्ड वॉर

घरातल्या शांततेमागील शीतयुद्ध!

सासू vs सुना - न संपणारं मजेदार कोल्ड वॉर
X

घरातल्या दोन सर्वात मनोरंजक, नाट्यमय, आणि गमतीशीर व्यक्तिरेखा म्हणजे सासू आणि सून. जगात कितीही बदल झाले, समाज आधुनिक झाला, फॅशन बदलली, OTT वर नवीन सीरिज आली तरी एक गोष्ट मात्र कायमचीच ते म्हणजे सासू आणि सुनेच कोल्ड वॉर.

आजची सून मॉडर्न, कॉलेज-शिक्षित, इंस्टाग्राम-अपडेटेड, किचनमध्ये स्मार्ट गॅझेट्स वापरणारी असते, तर आजची सासूही काही कमी नाही—रोज व्हॉट्सअॅापवर “गुड मॉर्निंग” फुले पाठवणारी, यूट्यूबवर नवीन recipes पाहणारी, आणि शेजारणींना अपडेट देणारी!

म्हणूनच आजची सासू–सून नाती म्हणजे जुन्या परंपरांचा आणि आधुनिक विचारांचा एक भन्नाट मिक्स. दोघीही हुशार, दोघीही स्वच्छंद, दोघीही थोड्या हट्टी… आणि म्हणूनच घरातलं हे ‘क्यूट कोल्ड वॉर’ कधीच संपत नाही.

भारतीय घरांमधील एक अजब पण सुंदर नातं म्हणजे सासू आणि सुनेचं. हे नातं तसं बघायला गेलं तर काळानुसार बदलतं, पण त्यातला चटपटीतपणा, त्यातला मसाला मात्र कधीच कमी होत नाही. मॉडर्न जनरेशनमध्ये ही कोल्ड वॉर आता आणखी मजेदार झाला आहे. पिढ्या तर बदलल्या, पण घरातली नाट्यअजूनही तितकीच जिवंत आहे. आजच्या काळात सासू आणि सुनेचं नातं जरी हलकंफुलकं, मैत्रीपूर्ण झालं असलं तरी त्यांच्या छोट्या छोट्या लढाया—कधी किचनमधील निर्णयांवरून, कधी घरातील रुटीनवरून, तर कधी ‘कुणाचं मत योग्य?’ या प्रश्नावरून अजूनही सुरूच असतात आणि त्यातल्या त्यात गंमत म्हणजे या लढायांमध्ये दोघीही स्वतःला ‘विजेती’ समजतात.

आजची सासू आधीच्यापेक्षा खूप बदललेली असते. ती सुनेला सर्वकाही शिकवायला उत्सुक असते, पण तितक्याच काळजीपूर्वक तिला घरातील चक्र आपल्याच हातात ठेवायची असते, कारण तिनं उभं केलेलं घर सुनेनंही तितकंच प्रेमानं सांभाळावं अशी तिची इच्छा असते. दुसरीकडे, आजची सुन स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जागरूक असते, काम करणारी असते, स्वतःचा स्पेस जपणारी असते आणि निर्णयांबाबत ठाम असते. अशा दोन वेगळ्या स्वभावांच्या स्त्रिया एका छताखाली शांतपणे सह-अस्तित्व जगत असतात, पण आतून त्यांच्या मनातलं ‘माझं मत थोडं जास्त बरोबर आहे’ हे भान कायम असतं.

घरात सकाळ होत असते आणि दोघींच्या विचारांच्या दिशादेखील वेगळ्या असतात. सासूला घरातील कामं ठराविक लयीत व्हावीत, दिवसाची सुरुवात पद्धतशीर व्हावी असं वाटतं. तर सुनेला तिच्या गतीने दिवसाची तयारी करायला आवडतं. दोघींचा रिदम वेगळा, पण घराचं वादन मात्र त्याच दोघींच्या हातात असतं. आणि इथेच सुरू होतो शांत कोल्ड वॉर.

यामध्ये जेव्हा सुनेला एखादी गोष्ट नीट झाली नाही म्हणून सासू हलकेच सुधारणा करते, तेव्हा सुनेला तिच्या ‘माझ्या पद्धतीने मला करू दे’ या भावनेची टोचणी लागते. आणि एखाद्या वेळी सुनेनं एखादं मॉडर्न सोल्यूशन आणलं की सासूला तिच्या पारंपरिक सोल्यूशनचा अभिमान जागृत होतो. अशा छोट्या छोट्या क्षणांतून दोघींचं नातं तयार होतं. कधी हसतं, कधी रुसतं, तर कधी अतिशय गोड होतं.

कधी कधी सुनेला वाटतं की सासू तिच्या बद्धल सतत चौकश्या करते आणि सासूला वाटतं सुनेचं ‘स्वतंत्र’ कधी कधी जरा जास्तच आहे. पण या भावनांचा अर्थ कायमच वाईट नसतो, तर त्यात एकमेकांना समजून घेण्याची गरज दडलेली असते. या नात्यात दोघींनाही आतून वाटतं असतं की घरासाठी आपलचं कॉन्ट्रिब्यूशन जास्त आहे आणि याच भावनेतून निर्माण होते ती थोडीशी चुरचुरीत स्पर्धा. जिथे दोघीही एकमेकींचा मान राखतात, पण पुढाकार मात्र सोडत नाहीत.

या कोल्ड वॉरमधला एक मजेदार मुद्दा म्हणजे स्वयंपाकघर. किचन वर जिची पकड तिचीच घरावर सत्ता असा जणू नियमचं. सासू अनेक वर्षांपासून ते सांभाळत असते, हाताशी प्रत्येक गोष्ट असते, recipe तिच्या मनात कोरलेल्या असतात. सून एखादी नवी recipe घेऊन आली की सासू तिचं निरीक्षण करते जणू काही मास्टरशेफचं जजमेंट सुरू आहे. सुनेलादेखील हे माहित असतं त्यामुळे ती त्या तणावातही हसत खेळत आपलं काम करते. या छोट्याशा प्रसंगातूनही सासू-सुनेच्या नात्याचं जग किती रंजक आहे ते दिसून येतं.

कधी कधी सून घर सजवते आणि सासू तिने केलेल्या बदलांकडे संशयाने पाहते ‘हे आधी असं नव्हतं’ म्हणते. तर कधी सासू घरात काही बदल करते आणि सुनेला वाटतं की तिनं लावलेला स्टाइलिश सेटअप गेला. अशा छोट्या छोट्या कुरघोडी मध्ये कोण बरोबर आणि कोण चुकीचं हे कधीच ठरत नाही, कारण दोघीही घराला सुंदर करणाऱ्याच असतात.

एक मजेशीर बाब म्हणजे या नात्यात भांडणापेक्षा ‘उपहास’ जास्त असतो. पण तोही मनाला लावून न घेता, दोघीही एकमेकींवर नाही तर परिस्थितीवर हसल्या तर नात्यात अधिक मोकळेपणा येतो. दोघींना एकमेकींच्या सवयी कधीकधी आवडत नाहीत, पण त्यामुळे प्रेम मात्र कमी होत नाही आणि काळाबरोबर हे प्रेम इतकं दृढ होतं की कोल्ड वॉर नंतरची घरातली शांतता नेहमीच गोड वाटू लागते.

आजच्या नवीन पिढीच्या सुना शिक्षण, करिअर, आर्थिक स्वातंत्र्य याबाबत पुढे आहेत आणि नवीन पिढीच्या सासूही जुन्या सासूप्रमाणे कडक नसून त्या सुनेला मदत करणाऱ्या, मैत्रिणीसारख्या विचार करणाऱ्या आहेत. तरीही छोट्या छोट्या चकमकी कधी थांबतात का? नाही. कारण तेच तर नात्याचं सौंदर्यच आहे. दोन स्त्रिया जेव्हा एकाच घराची लगाम सांभाळतात, तेव्हा थोडी चुरशीची लढाई तर अनिवार्य आहे. यामुळेच नातं फक्त ‘managing relationship’ न रहाता ‘जीवंत नातं’ बनतं.

शेवटी सासू-सुनेच्या या नात्यात जिंकत कोण? तर दोघीही. कारण दोघींनाही घर चालवायचं असतं, प्रेम टिकवायचं असतं आणि दोघींनाही आपल्या कुटुंबाचं सुख सर्वात महत्त्वाचं असतं. कोल्ड वॉर असो किंवा शांतता, हे नातं कायमच उबदार असतं. कारण घराला दोघींचीही गरज असते एक परंपरेची आणि दुसरी बदलाची.

Updated : 11 Dec 2025 2:24 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top