Home > Political > राहुल गांधी जगातील सर्वांत मोठा नेता - ॲड यशोमती ठाकूर

राहुल गांधी जगातील सर्वांत मोठा नेता - ॲड यशोमती ठाकूर

राहुल गांधी जगातील सर्वांत मोठा नेता - ॲड यशोमती ठाकूर
X

इंदिराजींचा खून झाला तेव्हा सोनियाजी त्यांना गाडीतून हॉस्पीटल ला घेऊन गेल्या. इंदिराचींजं डोकं सोनियाजींच्या मांडीवर होतं. राहुलजी आणि प्रियाकांजी शाळेतून घरी आले होते, आणि त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांच्या आजीचा खून झालाय. त्यांच्या सुरक्षेसाठी कोणी सुरक्षा रक्षकही तिथे नव्हतं. त्यानंतर राजीवजींची हत्या झाली. सोनियाजींसोबतच राहुलजी आणि प्रियांकाजी एका मोठ्या आघाताला सामोरे गेले. देशाच्या राजकारणातल्या इतक्या महत्वाच्या परिवाराला पाठोपाठ दोन आघात सहन करावे लागले. एखादा दुसरा परिवार असता तर राजकारणातून बाहेर पडून संन्यस्त जीवन जगला असता, मात्र गांधी परिवाराने संन्यस्त भावनेने जनहिताचं राजकारण केले आणि त्याचमुळे आज हा परिवार अतिशय सक्षमपणे आपली मूळं इथल्या मातीत रूजवून उभा आहे.

काळ बदलला आणि या परिवारावरील हल्ल्याचं स्वरूप ही बदललं. आज ही सर्वांत जास्त आघात-हल्ले या परिवारावर होतात. त्यातल्या त्यात आता या हल्ल्यांचा रोख राहुल गांधी यांच्यावर जास्त आहे. आपल्या संपूर्ण राजकीय जीवनात सोनिया गांधी यांनी त्यांच्यावरील सर्व हल्ल्यांना मोठ्या धीराने तोंड दिले. कधीही आपला संयम ढळू दिला नाही, कधी सूडाचं राजकारण केले नाही, कधी विरोधकांना नामशेष करायची भाषा केली नाही. सातत्याने क्षमाशील राहून राजकारण केले, विरोधकांशी संवाद साधण्याचं काम केले. हेच बाळकडू राहुल गांधी यांना ही मिळालंय. आपल्यावरील इतके हल्ले राहुल गांधी यांनी हसत हसत झेललेयत की आता विरोधकांना त्यांच्यावर हल्ला करताना नवनवीन आयुधे शोधावी लागतायत. विरोधकांनी त्यांच्या भाषणातील तुकडे इकडे-तिकडे चिटकवून त्यांची एक उच्छृंखल प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला. या कामात भारतीय जनता पक्षाने शेकडो कोटी रूपये खर्च केले. मात्र राहुल गांधी ढळले नाहीत. जे शाश्वत आहे, जे लोकशाहीसाठी आवश्यक आहे, जे भारतातील जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी गरजेचं आहे त्या त्या विषयांवर राहुल गांधी यांनी धीरोदात्त पणे आपल्या भूमिका मांडल्या. आपल्या भूमिका जगणारा हा जगावेगळा नेता आहे, त्यांच्या या नेतृत्वाचं मूल्यांकन काळ करेन. त्यांना वगळून आताच्या भारताचा इतिहास लिहिता येणार नाही.

लोकशाहीचा संकोच होत असताना आणि मागच्या दाराने हुकूमशाही प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू असताना राहुल गांधी यांचे कुठलीही तडजोड न करता उभं राहणं, लढणं हे व्यावहारिक जगात तोट्याचा विषय असू शकतो, मात्र हा देश कुठल्याही नफा-तोट्याच्या पलिकडे जाऊन जपला पाहिजे, सांभाळला पाहिजे या तत्वावर राहुल गांधी राजकारण करत आले आहेत. निवडणूका जिंकण्यासाठी काहीही तडजोड करण्याचे त्यांनी जाणीवपूर्वक टाळले आहे. देशातील हुकूमशाहीचा चेहरा बनत असलेल्या नरेंद्र मोदींना सभागृहातच जादू की झप्पी देणारा हा नेता आजच्या काळातील जगाच्या इतिहासातील सर्वांत मोठा नेता आहे.

कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा करून भारत जोडो चा संकल्प केवळ आखलाच नाही, तर तो पूर्णत्वास नेऊन दाखवणं हे काही सोपं काम नाही. महात्मा गांधी यांच्यानंतर सत्याग्रहाचा असा निग्रह केवळ राहुल गांधी यांनी करून दाखवला. राहुल गांधी हे महात्मा गांधी यांच्याप्रमाणेच हट्टी आहेत. मिष्कील आहेत. प्रयोगशील आहेत. जे आपण सर्वज्ञानी असल्याचा अविर्भाव आणत नाहीत. ते आसपासच्या लोकांशी स्वतःला जोडून घेतात, त्यातून शिकतात आणि मग आपली दिशा आखतात. कितीही दबाव येवो, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य काही कमी होत नाही, आणि इथेच विरोधकांचं खच्चीकरण होतं. द्वेषाच्या वातावरणात मोहब्बत की दुकान सुरू करणं यालाच म्हणतात.

आज देशात हिंदू-मुस्लीम तणाव निर्माण करून देश तोडण्याचं काम केलं जातंय. याला अखंड भारत जोडण्याचं नाव देऊन देशातील तरूणांना भडकवलं जातंय. देशातील बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई, शेती-मातीचे प्रश्न, नागरिकरणाचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, राहणीमान-जीवनमान, स्वातंत्र्य, महिलांचे प्रश्न, लोकशाही परंपरा अशा सर्वच प्रश्नांवर धर्माचा उतारा देण्याचा प्रयत्न केला जातोय. जागतिक महासत्ता बनत असलेल्या देशाला धर्मसत्ता बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा परिस्थितीतही कुठल्याही लोकप्रिय अजेंड्याच्या मागे न जाता राहुलजी देशासमोर एक कणखर विचारधारा ठेवत आहेत. राहुलजींच्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक दोष असतील, ते दोष राहुलजींनी स्वतः लोकांसमोर मांडले आहेत. कधी स्वतःचे दोष नाकारले नाहीत, दोष लक्षात आणून देणाऱ्याला देशद्रोही ठरवले नाही, माणूस असण्याचं यापेक्षा आणखी वेगळं काय लक्षण असू शकतं. राहुलजींच्या व्यक्तिमत्वातला हा मोकळे पणा इतर कुठल्याही नेत्यांमध्ये तुम्हाला दिसणार नाही.

राहुल गांधी यांचा विविध विषयांवर अभ्यास आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, न्याय, जागतिक परिस्थिती याबाबत त्यांचे आकलन आणि अभ्यास वाखाणण्याजोगं आहे. तरीही ते आपला बराचसा वेळ माणसं वाचण्यात घालवतात. अनेक तज्ज्ञांशी चर्चा करून आपली मते तपासून घेत असतात. राहुल गांधी आजच्या तरूण भारतासाठी आवश्यक असं नेतृत्व आहे. त्यांना मित्र-मैत्रिणी आहेत. त्यांना स्वतःचा परिवार आहे. ते सार्वजनिक ठिकाणी ही आपल्या बहिणीशी मस्ती करू शकतात. ते आपल्या कार्यकर्त्यांना आलिंगन देऊन बोलू शकतात. स्त्री-पुरुष, लहान मुले, तृतियपंथी, अपंग अशा सर्वांचा हात हातात घेऊन ते चालू शकतात. महिला त्यांना आपला मित्र मानू शकतात, त्यांच्यापाशी आपलं मन मोकळं करू शकतात. त्यांच्या नजरेत निर्मळता आहे. देशाच्या राजकारणात आपल्या आसपास आपल्याला जे नेते दिसतात त्यांच्यापैकी किती जण अशा निर्मळ भावनेने समाजातील सर्व घटकांशी आपलेपणाने मिसळू शकतात, बोलू शकतात. मला वाटतं नवा भारत राहुलजींच्या व्यक्तीमत्वासारखा असावा... शुद्ध, निर्मळ, शांत, संयमी, कणखर, अभ्यासू, सर्वसमावेशक, प्रगतीशील, कठोर परिश्रम करणारा, आणि जगाला प्रेम अर्पावे या भावनेवर श्रद्धा असणारा.

Updated : 19 Jun 2023 11:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top